योग- जीवन : आरोग्याचे महत्त्व | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

urdhva prasarit padasan

मानवी जीवनाचे ध्येय काय आहे, हे सांगताना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांचा विचार आहे. संपन्न, परिपूर्ण जीवन जगण्यासाठी ह्या चारही पुरुषार्थांची आवश्यकता असते.

योग- जीवन : आरोग्याचे महत्त्व

- किशोर विष्णू आंबेकर, अय्यंगार योग शिक्षक

आरोग्य हा जीवनातील यशाचा पाया आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, कला, क्रीडा इत्यादी सर्वच क्षेत्रांत यशस्वी होण्यासाठी, शांती- समाधानासाठी, व्यसनांपासून लांब राहण्यासाठी आरोग्य उत्तम असावे लागते.

मानवी जीवनाचे ध्येय काय आहे, हे सांगताना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांचा विचार आहे. संपन्न, परिपूर्ण जीवन जगण्यासाठी ह्या चारही पुरुषार्थांची आवश्यकता असते. त्यांच्यात संतुलन असावे लागते, म्हणजे अर्थ-काम यांनाच अति महत्त्व आणि धर्म- मोक्ष यांचा पूर्ण विसर याला परिपूर्ण जीवन म्हणता येत नाही.

धर्म म्हणजे कर्तव्यशास्त्र. कर्तव्य, अधिकार, नियम, वर्तणूक, नैतिकता, योग्य जीवनशैली, सत्याचा मार्ग असे अनेक अर्थ धर्म ह्या शब्दाचे आहेत. धर्माचे आपण रक्षण केल्यास तो आपले रक्षण करतो. अर्थ आणि काम ह्या पुरुषार्थांना धर्मांचे कुंपण असावे लागते. अर्थ म्हणजे जगण्याची साधने, समृद्धी, संपत्ती आणि पैसा. पैशाशिवाय जगात कोणतेही काम होत नाही. अर्थप्राप्तीसाठी आरोग्य, कार्यक्षमता चांगली असावी लागते. तुकाराम महाराज म्हणतात, ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे.’ धनप्राप्तीचा पाया नैतिकता, प्रामाणिकपणा हाच असावा. उत्तम आरोग्यातून अशी नैतिकता निर्माण होते. आरोग्य उत्तम असल्यास जास्त पैशांची गरज भासत नाही आणि पैशांसाठी लबाड्याही कराव्या लागत नाहीत.

काम म्हणजे सुख, उपभोग. सर्व काही आहे पण इंद्रियांमध्ये उपभोग घेण्याची क्षमता नाही तर काय उपयोग? त्यासाठी आरोग्य उत्तम हवे. धर्माच्या चौकटीत राहून; धन प्राप्त करावे आणि विषयांचा उपभोग घ्यावा यासाठी आरोग्य उत्तम पाहिजे.

मोक्ष म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यांपासून, संसारिक बंधनांपासून मुक्ती. म्हणजेच आत्मसाक्षात्कार. मुंडकोपनिषदात सांगितल्याप्रमाणे- ‘नायमात्मा बलहीनेन लभ्यो.’ हा परमात्मा बलहीनाला, अदक्षाला किंवा ध्येय हीनाला लाभणे शक्य नाही.

अय्यंगार गुरुजी म्हणतात, ‘नीट न भाजलेले, कच्चे मडके ज्याप्रमाणे पाण्यात विरघळून जाते, त्याचप्रमाणे शरीरही नाहीसे होते. योगसाधनेच्या अग्नीमध्ये ते मडके पक्के भाजावे म्हणजे ते टिकाऊ आणि शुद्ध होईल.’

सतत प्रगतीकडे वाटचाल करण्यासाठी, उत्तम इच्छाशक्तीसाठी, भयमुक्त, निरामय जीवन जगण्यासाठी आणि प्राणायाम शिकण्यासाठी उत्तम आरोग्य महत्त्वाचे आहे. आरोग्य आणि समाधान ही सर्वोच्च संपत्ती आहे.

आजचे आसन आहे ऊर्ध्व प्रसारित पादासन

 • पाय लांब पसरून, गुडघे ताठ, पाय जुळवलेले असे उताणे निजा.

 • हात पायांच्या बाजूला तळवे जमिनीकडे वळलेले ठेवा.

 • श्वास सोडा. दोन्ही गुडघे वाकवून, कंबर न उचलता दोन्ही मांड्या व गुडघे पोटाच्या दिशेने आणा व हाताने नडग्यांना पकडा. मांड्यांचा दाब पोटावर येऊद्यात.

 • हात धडाच्या बाजूस ठेवून, श्‍वास सोडीत पाय आढ्याच्या दिशेने शरीराशी काटकोनात ताठ करा. हात डोक्याच्या दिशेने वर ताणा. श्‍वास न पकडता पाच ते दहा सेकंद थांबा.

 • श्‍वास सोडा हात धडाच्या दिशेने व गुडघे मुडपून पावले जमिनीवर ठेवा.

 • उजवीकडे किंवा डावीकडे कुशीवर वळून हाताच्या आधाराने उठून बसा.

उपयोग

 • पोटाच्या बाजूंचा मेद कमी होतो.

 • उदरावयवांना टवटवी येते.

 • पाठीच्या स्नायूंमध्ये ताकद वाढते.

 • पोटातील वात कमी होतो.

 • प्रसूतीनंतर स्नायू सैल पडणे, चरबी वाढणे, कंबरदुखी यांवर गुणकारी.

(हे आसन मासिक पाळीच्या काळात करू नये.)

टॅग्स :yogahealth