योग- जीवन : आरोग्य चिंतन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yoga ardha matsyendrasana

एखादी व्यक्ती काही वाईट नाही असे आपण म्हणतो आणि दुसरी एखादी व्यक्ती चांगली आहे असे आपण म्हणतो. यावेळी त्या दोन व्यक्तींमध्ये गुणात्मक फरक असतो.

योग- जीवन : आरोग्य चिंतन

- किशोर विष्णू आंबेकर

एखादी व्यक्ती काही वाईट नाही असे आपण म्हणतो आणि दुसरी एखादी व्यक्ती चांगली आहे असे आपण म्हणतो. यावेळी त्या दोन व्यक्तींमध्ये गुणात्मक फरक असतो. आपण चांगल्या व्यक्तीला नेहमीच प्राधान्य देतो, याचे कारण त्या व्यक्तीमध्ये काही सकारात्मक गुण असतात.

मला कोणताही रोग नाही. मी निरोगी आहे म्हणजे मी आरोग्य संपन्न, निरामय, स्वस्थ आहे असे म्हणता येत नाही. आरोग्यसंपन्न असण्यासाठी निरोगी असणे आवश्यक असते, पण पुरेसे नसते. मी निरोगी आहे म्हणजे परिस्थिती काही वाईट नाही. चांगली परिस्थिती निर्माण करण्यासाठी काही सकारात्मक गुण प्रयत्नपूर्वक कमवावे लागतात. तेव्हाच आपण आरोग्यसंपन्न आहोत असे म्हणता येते. आयुर्वेदाप्रमाणे आरोग्य म्हणजे रोगाचा अभाव, हलके शरीर, कार्यक्षम शरीरावयव, सप्तधातू व त्रिदोषांची संतुलित अवस्था आणि त्यांचा परिणाम म्हणून आनंदी जीवन होय. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थ प्राप्तीसाठी अशा उत्तम आरोग्याची आवश्यकता असते.

शाक्त तत्त्वज्ञानाप्रमाणे आरोग्य संपन्नता म्हणजे, ‘जो निरोगी, निर्भय, कठीण काळात विचलित न होणारा, सहनशील आहे, इतरांच्या गैरहजेरीत त्यांच्या गुणांची स्तुती करणारा आणि प्रगल्भ असा आहे.’ अय्यंगार गुरुजी म्हणतात, ‘‘शरीर, मन, बुद्धी, आत्मा यांच्यामधील संतुलन आणि सुसंवाद म्हणजे आरोग्य. जिथे शारीरिक मर्यादा आणि मनाचे चांचल्य नाहीसे होते आणि आध्यात्मिक साधनेसाठी पुढील मार्ग मोकळा होतो. स्थिर मन, भावपूर्ण हृदय, विचारी मेंदू आणि क्रियाशील हात यांचा संयोग म्हणजे आरोग्य. मन हे विचार, भावना, इच्छा, प्रेम, भक्ती आणि धैर्य यांची बैठक असते (योग). मेंदू हा संवेदना, विचार, स्मृती आणि कल्पकता यांची बैठक असतो (ज्ञान). हृदय हे प्रेम, भक्ती आणि धैर्य यांची बैठक असते (भक्ती). त्याचप्रमाणे हात ही क्रियाशीलतेची बैठक असते (कर्म).

 • रक्ताभिसरण, पचन, उत्सर्जन अशा विविध शारीरसंस्थांच्या कार्यांतील परिपूर्ण संतुलन, त्याचप्रमाणे निर्दोष संतुलित मन म्हणजे आरोग्य.

 • दुःखाला कारणीभूत असणाऱ्या सर्व बंधनांपासून जागृत स्वातंत्र्य म्हणजे आरोग्य.शरीर- मनाची शुद्धी आणि पावित्र्य म्हणजे आरोग्य.

 • आरोग्य म्हणजे दुसरे काही नसून विश्वचैतन्य शक्तीची जाणीव होय. तिचा प्रवाह नेहमी प्रगतीच्या दिशेने होत असतो त्या प्रवाहात आरोग्याचे पैलू विकसित होतात."

आपली सर्व धडपड गरजा भागवण्यासाठी चाललेली असते. ज्या गरजा आपल्याला महत्त्वाच्या वाटतात त्यांना प्राधान्य देऊन आपण आपले निर्णय घेत असतो. ही सर्व प्रक्रिया आपली समज, आवडीनिवडी, माहिती, अनुभव, ज्ञान इत्यादी बाबींवर अवलंबून असते. मूलभूत गरजांप्रमाणे शारीरिक व मानसिक आरोग्य ही आजच्या काळाची महत्त्वाची गरज आहे. ह्या गरजेच्या पूर्ततेसाठी अष्टांगयोगाचा अभ्यास समर्थ आहे.

आजचे आसन आहे अर्धमत्स्येंद्रासन (आधीचा टप्पा)

 • दंडासनात बसा.

 • डावा गुडघा विरासनात वाकवून डाव्या पाऊलावर बसा.

 • उजवा गुडघा मरीच्यासनात वाकवून, उजवे पाऊल डाव्या मांडीच्या आतल्या बाजूपाशी ठेवा. शरीर स्थिर करा.

 • उजव्या मांडीच्या बाहेरच्या बाजूला डावी बगल स्पर्श करील अशा बेताने धड ९० अंशांनी उजवीकडे वळवा. बगल उजव्या गुडघ्यावर आणा.

 • श्वास सोडा. खांद्यापासून डावा हात ताणा आणि तो उजव्या गुडघ्याभोवती लपेटा. उजवे कोपर वाकवा आणि डावे मनगट कमरेच्या मागे न्या.

 • दीर्घ श्वास सोडा. खांद्यापासून उजवा हात पाठीमागे न्या. उजवे कोपर वाकवा आणि उजवा पंजा कमरेमागे नेऊन उजव्या पंज्याने डावा हात पकडा.

 • मान डावीकडे वळवून अर्धा मिनीट थांबा.

 • हेच आसन दुसऱ्या बाजूसही करा.

फायदे

 • पोटाच्या खालच्या भागाला व्यायाम घडतो.

 • प्रोस्टेट ग्रंथींची वृद्धी थांबते.

टॅग्स :yogahealth