हसण्यासाठी जगा...: आनंदाची शंभर रुपयाची नोट!

मकरंद टिल्लू 
Tuesday, 12 January 2021

काही लोक असे असतात, ज्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण येतोही. त्यांना तो दिसतोही. पण इतरांना काय वाटेल असा विचार करत राहतात. ते त्या क्षणाचा आनंद, न घेताच निघून जातात. 

तुमच्या आमच्या आयुष्यात घटना त्याच घडतात, पण त्यावरच्या प्रतिक्रिया मात्र बदलतात. आनंदाच्या बाबतीतही तेच घडतं! हे समजावून घेण्यासाठी, एक गंमतीदार गोष्ट करा.... 

प्रचंड गर्दी असलेल्या एखाद्या ठिकाणी जा. उदाहरणार्थ एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, लग्न समारंभ इत्यादी. त्या ठिकाणी गेल्यावर एक शंभर रुपयाची नोट काढा. ती नोट हळूच एका ठिकाणी ठेवून द्या...आणि लांब जाऊन लोक कसं वागतात ते पाहा. या उदाहरणातील ‘शंभर रुपयाची नोट’ हे एक ‘आनंदाचे प्रतीक’ आहे. 

- पहिल्या प्रकारचे लोक इतक्या धावपळीत असतात की, त्यांना ती नोट पडलेली दिसतच नाही. ते त्या नोटेला ओलांडून पलीकडे निघून जातात. 

काही लोक इतक्या धावपळीत असतात की त्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण येतोही, पण त्यांना तो दिसतच नाही. ते त्याला ओलांडून पलीकडे निघून जातात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- दुसऱ्या प्रकारच्या लोकांना शंभर रुपयाची नोट दिसतेही. घ्यावीशी वाटतेही. पण ते ‘घेऊ का नको,’ असा विचार करत राहतात आणि निघून जातात. 

काही लोक असे असतात, ज्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण येतोही. त्यांना तो दिसतोही. पण इतरांना काय वाटेल असा विचार करत राहतात. ते त्या क्षणाचा आनंद, न घेताच निघून जातात. 

- तिसऱ्या प्रकारचे लोक चतुर असतात. त्यांना शंभर रुपयाची नोट दिसल्यावर ते हळूच नोटेपाशी जातात, त्यावर पाय ठेवतात. आजूबाजूला  बघत, खाली वाकतात. पाय  खाजवल्यासारखं करतात...आणि कुणाचं लक्ष नाही असं बघत, ती नोट स्वतःच्या खिशात घालतात व निघून जातात.  

ही लोकं कोणताही आनंदाचा क्षण इतरांची नजर चुकवून हळूच जगण्याचा प्रयत्न करतात. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

- चौथ्या प्रकारची लोकं धूर्त असतात, राजकारणी असतात. त्यांना  शंभर रुपयाची नोट घ्यायची असते, पण ती घेताना कोणी पाहिलं, काही  आळ आला  तर? तो टाळण्यासाठी ते शक्कल लढवतात. स्वतःच्या खिशात हात घालून शोधाशोध केल्यासारखे करतात. जरा मोठ्याने ओरडतात, ‘‘माझी शंभर रुपयाची नोट कुठेतरी पडलीये. कोणी पाहिली का?’’ कार्यकर्ते धावाधाव करतात. ‘साहेबांची नोट, साहेबांची नोट,’ करत शोधत राहतात. ज्याला ती नोट मिळते, तो अतिशय उत्साहानं... आदबीनं साहेबांसमोर येतो. नोट त्यांना देतो. 

ही लोकं दुसऱ्याचा आनंद, तिसऱ्याच्या हातानं घेऊन...स्वतःच्या खिशात घालतात! 

-  पाचव्या प्रकारच्या लोकांना नोट दिसते, ते आजूबाजूच्या लोकांना विचारतात. कोणीच हक्क सांगत नाही म्हटल्यावर, ती नोट घेऊन जातात.  त्यानंतर ‘हे पैसे कसे सापडले,’ याचा आनंद मित्रमंडळींमध्ये सांगत सुटतात. हे सांगताना लोकांना खायलाही घालतात.. त्यामध्ये दोनशे रुपये खर्च होतात. हे लोक आनंद पसरवणारे असतात... 

...चला आपणही आनंदाचा प्रसार करूया! कारण आयुष्य थाटात जगायचं असेल, तर आनंद ताटात वाढून घ्यावा लागतो!!! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: makarand tillu write article about moment of joy in life