तणावमुक्तीसाठी,आनंदाच्या क्षणांत कृतीनं नक्की गुंतवणूक करण्याचा संकल्प करा! 

तणावमुक्तीसाठी,आनंदाच्या क्षणांत कृतीनं नक्की गुंतवणूक करण्याचा संकल्प करा! 

आपलं जगणं सुसह्य होण्यासाठी लोक पैसे बँकेच्या ‘फिक्स डिपॉझिट’, जमीन व शेअर बाजारात गुंतवतात. आता वेळ आली आहे जगण्याच्या क्षणांमध्ये गुंतवण्याची! वस्तू आणि विचारांशी खेळताना ताण निर्माण होतात; पण क्षणांबरोबर खेळकरपणे खेळलो तर मनं प्रसन्न होतात. लहान मुलाला एखादी गोष्ट उद्या देतो म्हटलं, तर पटत नाही. कारण, त्यांच्या लेखी फक्त आज आणि आत्ताच असतो. मोठे  झाल्यानंतर आपण उद्याचं टेन्शन आज घेतो आणि आजचा आनंद  उद्यावर टाकतो.

...सुमारे २५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझं नुकतंच लग्न झालं होतं.  सोलापूरला कार्यक्रमासाठी आमंत्रण आलं होतं. आयोजक म्हणाले, ‘‘इथून तुळजापूर जवळ आहे. तुम्ही दर्शनाला जाऊन येऊ शकता.’’ मी आणि बायको एसटी स्टँडवर गेलो. बसमध्ये बसलो. खुरट्या दाढीचा कंडक्टर कट्ट, कडकट्ट असं तिकीट पंच वाजवत बसमध्ये शिरला. तिकीट एकोणीस रुपये लोकांना सांगायचा. लोक वीस रुपये काढायचे त्याच्या हातात द्यायचे. कंडक्टर म्हणायचा, ‘सुट्टे  द्या.’  

लोक म्हणायचे, ‘तुम्हाला सुट्टे ठेवायला काय जातं?’  

एकंदरीत वादावादी सुरू होती. कंडक्टरकडं सुट्टे आले, की ते मागण्यासाठी प्रत्येकजण त्याच्यावर लक्ष ठेवून होता. तो माझ्यापाशी आला. मी चाळीस रुपये काढले.  त्यानं ‘सुट्टे नाहीत’ असे  शब्द बोलण्याच्या आतच मी त्याला म्हणालो, ‘दोन तिकीट द्या आणि राहिलेले दोन रुपये  राहू द्या. तुम्हाला टीप  म्हणून!’  

नुकतंच लग्न झालेलं. बायकोला कळेना. हा कसला नवरा आपल्या नशिबी आलाय, जो कंडक्टरला टीप देत सुटलाय.  ती खालून हातानं  ढुशी द्यायला लागली.  दोन रुपये मागा खुणवायला लागली.  कंडक्टर पुढं गेल्यावर मी तिला म्हणालो,  ‘‘सध्या नवरात्रीचा काळ आहे. नुकत्याच होऊन गेलेल्या पावसामुळं बाहेर सगळीकडं हिरवंगार आहे.  या सुंदर निसर्गाचा पुढचा तासभर आपण आनंद घ्यायचा, की दोन रुपये मिळवण्यासाठी खुरटी दाढी असलेल्या कंडक्टरकडं पाहत वेळ वाया घालवायचा? चॉइस आपल्या हातात आहे!… आणि तसंही आपण हॉटेलमध्ये सर्व्हिस दिल्यानंतर वेटरला टीप देतोच. कधीतरी कामाचं कौतुक करण्यासाठी कंडक्टरला टीप द्यायला हरकत काय?’’

...आम्ही पुढचा तासभर त्या क्षणांचा आनंद घेत काढला.  

दोस्तहो, तुमची  ॲक्शन बदलली, तर समोरच्याची रिॲक्शन देखील बदलते.  ज्या वेळी त्या कंडक्टरकडं सुट्टे आले,  तो पहिल्यांदा माझ्याकडं आला आणि म्हणाला, ‘साहेब तुमचे दोन रुपये घ्या.’ आम्ही तिघे प्रसन्नपणे हसलो. नव्या वर्षात तणावमुक्तीसाठी, आनंदाच्या  क्षणांत कृतीनं नक्की गुंतवणूक करण्याचा संकल्प करा! 

हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा !!!

(लेखक एकपात्री कलाकार व लाफ्टर योगा ट्रेनर आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com