esakal | हसण्यासाठी जगा : कंटाळ्याला टाळा, जगण्याला कवटाळा!
sakal

बोलून बातमी शोधा

I Cant

हसण्यासाठी जगा : कंटाळ्याला टाळा, जगण्याला कवटाळा!

sakal_logo
By
मकरंद टिल्लू

मनाची अवस्था आपण शब्दाद्वारे किंवा कृतीद्वारे व्यक्त करत असतो. एखाद्या व्यक्तीला समजून घ्यायचं असल्यास या दोनही गोष्टी त्याचा ‘आरसा’ बनतात. असे अनेक आरसे एकत्र केले, की ‘समाज मन’ समजतं. सध्याच्या काळात ‘कंटाळ्याला’ कवटाळलेली अनेक लोकं दिसतात ! ‘बोअर’ झालेली असतात.

  • शाळा किंवा कॉलेजमधील विद्यार्थी अंथरुणातूनच ‘लेक्चर’ला उपस्थित राहतात. उशीला किंवा लोडला टेकून अर्धवट डोळे मिटलेल्या लहान मुलांना ताठ बसायला सांगितलं, की लगेच म्हणतात ‘कंटाळा आलाय’.

  • घरामध्ये वाळवलेले कपडे खाली काढून गादीवर अस्ताव्यस्त पसरलेले असतात, त्याच्या घड्या केलेल्या नसतात. नाश्त्यापासून जेवणापर्यंतची छोटी-मोठी भांडी ढिगारा करून एकत्र ठेवलेले असतात. नवीन ताट किंवा भांडं त्यातच ठेवलं जातं. हे सगळं पाहिल्यावर लक्षात येतं घरातल्या गृहिणीला ‘कंटाळा आलाय’.

  • ऑफिसमध्ये  व्यक्ती कामावर जाते. जेवणाच्या सुट्टीत प्रत्येकाने वेगळं बसून जेवायचं. काम संपल्यानंतर कटिंग चहा न पिता, गप्पा न मारता घरी निघायचं. याचा परिणाम म्हणून त्या व्यक्तीच्या मनात येतं ‘कंटाळा आलाय’.

  • ‘मॉर्निंग वॉक’ला न गेल्याने, उद्यानात, भाजी बाजारात गप्पा मारायला मित्रमैत्रिणी भेटत नसल्याने ज्येष्ठ नागरिक म्हणतात ‘कंटाळा आलाय.’

अशा अनेक घटना सध्या तुमच्या आजूबाजूला नक्कीच घडत असतील.  मनाच्या या अवस्थेत आजूबाजूच्या जगात घडणाऱ्या गोष्टीत सहभागी होण्याचा उत्साह, स्वारस्य कमी झालेलं असतं. प्रत्येकाला जगण्यासाठी मेंदूला उत्तेजना आणि मनाला प्रेरणा लागते! कंटाळलेल्या अवस्थेत या दोन्ही गोष्टी कमी झालेल्या असतात.  सोप्या उदाहरणातून सांगायचं झालं तर, ‘तुमच्याकडे आगपेटी आहे, गुल असलेली काडीपण आहे. पण अनेक वेळेला पेटवण्याचा प्रयत्न केला तरी ती  पेटतच नाही. तसंच आजूबाजूला जगही आहे. तुमचं मनही आहे. पण काही करावंसं वाटतच नाही. हीच ती कंटाळ्याची अवस्था!’ एखाद्याला भूक लागल्यास तो ‘हेल्दी फूड’ मिळेपर्यंत थांबत नाही, जे सापडतं ते पोटात घालतो.  तसंच कंटाळा घालवण्यासाठी लोकं सोशल मीडियाचा वापर करतात. पण तिथंही तेच तेच सुरू असलेले दिसलं, की त्याचाही कंटाळा येतो.  अनेक मुलं या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी व्हिडिओ गेम्स खेळताना दिसतात. कोणी मालिका, सिनेमे पाहत बसतात. या अवस्थेचा परिणाम म्हणून अस्वस्थता वाढते. राग येतो.  लोकं समाजापासून तसंच स्वतः पासूनही अलिप्त व्हायला लागतात.

 कंटाळाही सकारात्मक

कंटाळा एका अर्थानं सकारात्मकपण आहे. कंटाळ्याची अवस्था ‘काहीतरी कर’ असं सांगणारी असते.  योग्यरित्या उपयोग केल्यास ती  सर्जनशीलता निर्माण  करायला मदत करते.  आपण ‘बोअर’ झाले असाल, तर त्यातून बाहेर पडण्यासाठी क्षणभर थांबा. दीर्घ श्वास घ्या. आपल्या आयुष्यात सर्जनशीलपणे  अजून काय करता येईल याचा विचार करा. घरातले, मित्र मंडळी यांच्याशी संवाद साधून नव्या कल्पना घ्या. ‘काय केलं तर तुमचा कंटाळा जाईल?’  या प्रश्नाचं उत्तर शोधा. या उत्तरात तुमच्या सुख, समाधान, आनंद याच्या प्रेरणा सापडतील. कंटाळ्याची पाऊल वाट स्वच्छ करत पुढं जात राहिला, तर ‘जगण्याच्या ध्येयाचा’ गाभारा तुम्हाला नक्की सापडेल!!!