हसण्यासाठी जगा : मनाच्या सुसुत्रतेचे सूत्र!

‘मला काहीच सुचत नाहीये!’, ‘ माझं डोकं नुसतं भणभणतं आहे’, ‘अर्धा तास कोणी माझ्याशी बोलू नका’ असं म्हणणाऱ्या व्यक्ती तुम्ही पाहिल्या असतील किंवा तुम्हीदेखील हे वाक्य कधीतरी म्हटलं असेल.
Study
StudySakal

‘मला काहीच सुचत नाहीये!’, ‘ माझं डोकं नुसतं भणभणतं आहे’, ‘अर्धा तास कोणी माझ्याशी बोलू नका’ असं म्हणणाऱ्या व्यक्ती तुम्ही पाहिल्या असतील किंवा तुम्हीदेखील हे वाक्य कधीतरी म्हटलं असेल.  विचारांचा गदारोळ  उठला, की असं घडतं. प्रत्यक्ष जगातही अशा गोष्टी बघायला मिळतात.

1) बस आल्यावर ‘स्टॅन्ड’ वरील प्रत्येक जण त्यात घुसण्याचा प्रयत्न करतो.  कोणी पूर्ण आत,  कोणी दोन पाय आत पण शरीर बाहेर,  कोणाचा एक पाय पायरीवर,  कोणी ‘बस’ला एक हात लावून पाठीमागच्याला अडवत उभा असतो. या रेटारेटीत प्रत्येकाला पुढं जायचं असतं, पण कुणालाच नीटपणे आत जाता येत नाही.  कंडक्टर मोठ्यांदा ओरडतो.  सगळ्यांना बाहेर काढतो. रांगेत आलात, तरच ‘बस’मध्ये घेईन म्हणतो. मग प्रत्येकजण एका मागोमाग एक येऊन बसमध्ये बसतो.

2) एसटी स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर, चित्रपटगृहाच्या तिकीट खिडकीवर लोकं रेटारेटी करून  तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करतात.  कोणाला तिकीट दिलं जातंय,  कोणाला राहिलेले पैसे मिळतायेत याचा गोंधळ व्हायला लागतो.  तिकीट देणारी व्यक्ती वैतागते. ‘रांगेत आलात तरच तिकीट देईन,’ म्हणते. सगळेजण मुकाट्यानं रांगेत येतात. प्रत्येकाला तिकीट मिळतं.

3) रस्त्यातल्या चौकात ‘सिग्नल’चे लाइट जातात.  प्रत्येकजण गाडी घुसवायचा प्रयत्न करतो. चौकात ‘ट्रॅफिक जॅम’ होतो. अचानक आजूबाजूचे काही कार्यकर्ते पुढं येतात.  चौघेजण चार रस्ते थांबवतात. पाचवा माणूस मध्यभागी उभा राहून, हातवारे करत ट्रॅफिकला दिशा देतो.  रस्त्यावरची वाहतूक सुरळीत होते.

आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अशा अनेक घटना तुम्हाला निश्चित आठवतील. आपल्या मनातल्या विचारांच्या बाबत वरीलप्रमाणंच घटना घडत असतात.  गर्दीतल्या माणसांप्रमाणंच अनेक विचार, कामं... दुसऱ्या विचारांच्या येत ‘मना’मध्ये घुसत राहतात. यातून ‘ट्रॅफिक जॅम’प्रमाणंच ‘मन जॅम’ होतं.  काहीही सुचेनासं होतं. हातातली कामं पूर्ण होत नाहीत. अशा वेळेला खालील गोष्टी जरूर करा.

१) काही काळ काम करणं थांबवा.

२) आदल्या दिवशी रात्री दुसऱ्या दिवशीच्या कामांची यादी कागदावर, मोबाईलच्या अॅपमध्ये लिहून काढा. आज-काल त्याला ‘टू डू लिस्ट’ म्हणतात.

३)  कामांना एका रांगेत आणण्यासाठी त्याचं वर्गीकरण करा. उदा.  ऑफिसचं काम, घराशी निगडित काम, मुलांशी निगडीत काम आदी.

४)  बाहेर खरेदीला गेल्यावर यादीप्रमाणे एक एक गोष्ट पूर्ण केली, तर कामं अपूर्ण राहणार नाहीत. जे काम पूर्ण होईल त्याला टिकमार्क करा.  

५) काम पूर्ण झाल्यावर ‘टिकमार्क’ करताना आनंद व्यक्त करा. म्हणजे मनाला समाधान मिळेल. 

६) यादीतली अपूर्ण कामं पाहताना दडपण येईल.  कोणी तुम्हाला ‘नुसतंच लिहिता, प्रत्यक्षात काही करत नाही,’ असंही म्हणेल. पण त्याचा विचार  करू नका. कारण पूर्वीसुद्धा अपूर्ण कामं राहायचीच.  फक्त ती मनात असायची, आता कागदावर! मनात असल्यामुळं इतरांना कळायची नाहीत.  आता समोर दिसतात. पण लिहिल्यामुळं विसरणं होणार नाही. रात्री झोप लागेल.

७) सातत्यानं हे केल्यास त्याचं सवयीत रुपांतर होईल. गोंधळलेली अवस्था कमी होईल.

विचार आणि कामाच्या ‘सुसूत्रते’च्या धाग्यानं, मन: शांती आणि समाधानी जगण्याचं ‘सूत्र’ नक्की सापडेल !!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com