esakal | हसण्यासाठी जगा : दिखाऊपणाचा आभास, वास्तवाचा ध्यास!
sakal

बोलून बातमी शोधा

Live to Laugh

हसण्यासाठी जगा : दिखाऊपणाचा आभास, वास्तवाचा ध्यास!

sakal_logo
By
मकरंद टिल्लू

वास्तविक जग आणि आभासी जग यांची आजकाल सरमिसळ व्हायला लागली आहे. किंबहुना ‘मिसळ’ खात असताना कुठं थांबावं हे कळत नाही, तसंच या दोनही जगांना कुठं थांबावं हे कळेनासं झालंय! यामुळं अनेक बदल घडायला लागले आहेत. ‘आभासीपणा’तला पोकळपणा जेव्हा जगाला कळतो, तेव्हा नकारात्मकता निर्माण होते. याउलट दिखाऊपणा टाळणाऱ्या लोकांना समाज ‘चिरंतन आदराचं’ स्थान देतो. अर्थात, आभास निर्माण करण्याची ही पद्धत नवी नाही. ती वेगवेगळ्या प्रकारात सुरू आहे.

सध्या ‘ऑनलाईन व्हिडिओ कॉल’द्वारे बोलण्याचं प्रमाण वाढलं आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ करताना देखील व्हिडिओ कॉल होतात.  व्यक्तीच्या पाठीमागं असणारं वातावरण दिसू नये यासाठी एखाद्या फोटोद्वारे आभासी पार्श्वभूमीचा उपयोग केला जातो. नीटनेटक्या ‘पॉश’ ठिकाणी असल्याचं चित्र इतरांपुढं मांडलं जातं. अर्थात, त्या व्यक्तीच्या घरी गेल्यानंतर आभास आणि वास्तव यातला फरक आपोआप कळतो. 

पदाचा वापर करून लोकांना, ऑफिसमधल्या सहकाऱ्यांना त्रास देणारी व्यक्ती पायउतार झाल्यावर लोक त्याचा सन्मान करत नाहीत.  कारण आभास आणि वास्तव यातला फरक लोकांना कळलेला असतो. ‘पदा’चा वापर करून माणसांना आनंद दिला, तर ‘पावला पावला’वर लोकं मदतीला येतात.

नोकरीच्या इंटरव्ह्यूला जात असताना लोक नीटनेटके कपडे करून जातात. प्रत्यक्ष प्रश्नोत्तरं सुरू झाल्यानंतर आभास कोणता आणि वास्तव काय आहे हे चतुर मालकाला आपोआप कळतं.

लग्नापूर्वी ‘तो’ आणि ‘ती’ भेटतात, तेव्हा अतिशय हसतमुख असतात. आदबीनं वागतात. एकमेकांची क्षणाक्षणाला काळजी घेतात. दुसऱ्याला असणारी अडचण समजावून घेतात. त्यात मदतीसाठी लगेच पुढाकार घेतात. अर्थात, लग्नानंतर आभास कोणता आणि वास्तव काय आहे, हे आपोआप कळतं. त्यातून वाद होतात.

सतत स्वतःबद्दलची विचार करणारी एखादी व्यक्ती, कधीतरी सामाजिक उपक्रमात भाग घेते. एखाद्या ठिकाणी देणगी देते. त्यानंतर आयुष्यभर वेगवेगळ्या ठिकाणी त्यानं दिलेल्या देणगीचा उल्लेख करत, दातृत्ववान असल्याचा समाजात आभास निर्माण करते. काही काळानंतर लोकांना आभास कोणता आणि वास्तव काय, हे कळतं.

आयुष्यभर प्रत्येक जण अशा कोणत्या ना कोणत्या आभासाचा वापर करत जगत असतो. यासाठी लोक वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग करतात पद, प्रतिष्ठा, पैसा, जात, धर्म, गाव अशा अनेक गोष्टी उपयोगात आणतात. या सर्वांचा परिणाम इतर लोकांवर होत असतो, पण त्या व्यक्तींचा अप्पलपोटेपणा लक्षात आला. की हा आभास नाहीसा होतो. वास्तव बाहेर येतं.  

आभासी जग आणि वास्तव यात तफावत निर्माण झाली, की मानसिक द्वंद्व तयार होतं. ताणताणाव वाढायला लागतात. चेहऱ्यावर मेकअप करणाऱ्या व्यक्तीला, आपण कोण आहोत हे नक्की माहीत असतं. प्रत्येक व्यक्तीकडं स्वतःच्या कोणत्या ना कोणत्या गुणांचा पिसारा असतोच.

म्हणून भाडोत्री दिखाऊपणा पेक्षा स्वतःतल्या गुणांचा अभ्यास करून त्याचा पिसारा फुलवता आल्यास कौतुकाचा पाऊस नक्की पडतो!!!

loading image