esakal | हसण्यासाठी जगा : आयुष्याची भरारी, कल्पनाशक्तीचे पंख!
sakal

बोलून बातमी शोधा

Laughting

हसण्यासाठी जगा : आयुष्याची भरारी, कल्पनाशक्तीचे पंख!

sakal_logo
By
मकरंद टिल्लू

माणसाला मिळालेली अद्भुत देणगी म्हणजे कल्पनाशक्ती! लहान मुलांमध्ये ती मोठ्या प्रमाणावर असते. मोठं  होत असताना ती मारली गेली, तर माणसं नीरस होत जातात.

दोन चिमुरड्या मुलांचे भांडण सुरू असतं.  एक जण  दोन पंजे वर घेऊन दुसऱ्याला घाबरवत म्हणतो, ‘मी माझ्या ‘घरातले’ सिंह तुझ्या अंगावरती सोडेन.’ त्यावर दुसरा म्हणतो, ‘‘मी त्या सिंहावर माझे हत्ती सोडेन!’ पण घरातली एखादी वयस्कर व्यक्ती मुलांना ओरडते, ‘घरामध्ये कोणीही प्राण्यांना आणायचं नाही! जे काही असेल ते घराबाहेर!' बहुसंख्य वेळेला कल्पनाविश्वात रमलेल्या मुलांना आजूबाजूची मोठी माणसं ‘काहीतरी बोलू नकारे,’ असं म्हणत गप्प करतात. त्याचा परिणाम मुलांमधील सर्जनशीलता कमी होते.  सकारात्मक आयुष्यासाठी उत्तम कल्पनाशक्ती व तिला सकारात्मक दिशा देणं महत्त्वाचं असतं. जगण्याचा अनुभव नीट घेतला असल्यास सहा प्रकारांतून कल्पनाशक्ती तुम्हाला  विश्वात संचार घडवते. आपल्यामध्ये असलेल्या कल्पनाशक्तीची चाचणी खालील काही उदाहरणातून आपण  करूया. त्यासाठी खालील गोष्टी सावकाश वाचा.

  • ‘पावसाळी वातावरणात हिरव्यागार डोंगरावरती फिरताना मजा येते.  कोकणातल्या या डोंगरावर पाऊलवाटेने चालताना, लाल मातीची ढेकळं जागोजागी पडलेली असतात. बुटाचा पाय ढेकळावर पडला, की पायाचं वजन वाढतं. चिकटलेल्या मातीलासुद्धा तुमच्या सोबत फिरायला यायचं असतं...’ हे वाचताना तुमच्यासमोर चित्र असेल, तर तुमची दृश्य स्वरूपातील कल्पनाशक्ती चांगलं काम करत आहे.

  • ‘खळाळत्या  झऱ्याचा आवाज,  भाजीविक्रेत्यांचे आवाज, करकचून ब्रेक लावल्यानंतर गाडीच्या चाकांचा आवाज, कोकिळेचा आवाज,  भिंतीवरच्या ड्रिलचा आवाज, नळातून पडणाऱ्या पाण्याचा आवाज...’ या आवाजांची कल्पना तुम्ही करू शकत असल्यास कानाद्वारे आलेली शक्ती तुमच्याकडं आहे.

  • ‘गुलाबाचा सुवास,  अरुंद रस्त्यावरून जाताना गटाराचा येणारा वास,  बटाटेवडे तळतानाचा घमघमाट,  मोगऱ्याचा सुगंध...’ हे वाचताना तुम्हाला गंध जाणवले, तर त्याची कल्पनाशक्ती तुमच्याकडं  आहे.

  • ‘असह्य उन्हाळ्यातल्या घामाच्या धारा, मित्रांनी मानेवरून पाठीवर बर्फाचा खडा सोडल्यामुळं येणारी शिरशिरी, वेलवेटच्या कापडाचा स्पर्श,  गवतावरती अनवाणी पावलांनी  चालतानाचा स्पर्श...’ हे तुम्हाला आठवत असल्यास  स्पर्शाद्वारे आलेली कल्पनाशक्ती तुमच्याकडं आहे.

  • ‘कडक उन्हाळ्यात प्यायलेलं पन्हं, चटकदार भेळ, गाभुळलेली चिंच, तिखट जाळ मिसळीचा रस्सा...’ हे वाचताना जिभेच्या आजूबाजूला पाणी सुटलं असेल, तर ही शक्ती आपल्यात जागृत आहे.

वरील गोष्टी वाचताना तुमच्या मनात काही जाणीवा निर्माण झाल्या असतील, तर त्या महत्त्वाच्या आहेत. पण एखादी गोष्ट जाणवली नसल्यास पंचेंद्रियांतील त्या अनुभूतीवर काम करणं गरजेचं आहे. किंबहुना जाणीव निर्माण होणं ही कल्पनाशक्तीची मोठी गरज आहे. अनेकांना कंटाळा येतो, जगण्यात नीरसता येते,  उदासपणा वाटतो कारण आपण रटाळपणे जगायला लागतो. कल्पनाशक्तीचे जगण्याला पंख लावल्यास आयुष्यात सुंदर भरारी घेता येते!!!

loading image