esakal | हसण्यासाठी जगा : आत्मचरित्र, आत्मबळाची खाण! | Live to Laugh
sakal

बोलून बातमी शोधा

Autobiography
हसण्यासाठी जगा : आत्मचरित्र, आत्मबळाची खाण!

हसण्यासाठी जगा : आत्मचरित्र, आत्मबळाची खाण!

sakal_logo
By
मकरंद टिल्लू

आयुष्यात क्षणाक्षणाला नवनवीन अनुभव येत असतात. काही अनुभव आपल्याला आनंदी तर काही वेदना निर्माण करतात. जगण्यावरचा विश्वास कमी झालेली लोक, आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही अशा विचाराने जगायला लागतात. सर्वसामान्य माणसापासून दिग्गज माणसांपर्यंत प्रत्येकाला विविध अनुभवांना सामोरं जावं लागतं. स्वतःच्या प्रश्नांना उत्तर मिळवायची असतील तर दिग्गज लोकांची आत्मचरित्र प्रेरणादायी ठरतात. प्रत्यक्ष घडलेल्या घटना, त्याला सामोरं जात असताना केलेला विचार, प्रश्नाची उकल करताना टाकलेली पावलं, यशाचं शिखर गाठत असताना करावा लागणारा त्याग, आयुष्याच्या छोट्या छोट्या घटनात सापडणारे आनंद... अशा अनेक गोष्टी आपल्याला आत्मचरित्रं शिकवत असतात.

आजपर्यंत आपण लोकांची आत्मचरित्रं वाचली असतील. आज मात्र तुमचं आत्मचरित्र तुम्हाला लिहायला घ्यायचं आहे. लिखाण करताना अनेकदा कंटाळा येतो. ते टाळण्यासाठी, वाचल्यानंतर प्रसंग लगेच आठवेल अशा मोजक्या शब्दांत अथवा वाक्यात दररोज एकतरी आठवण लिहून ठेवा.

सुरुवात तुम्हाला तुमच्या लहानपणापासून करायची आहे. लहानपणचे खेळ, मित्रांबरोबरच्या आठवणी, खेळतानाचं खरचटणं, गुडघे फुटणं, तसंच लहानपणापासून कोणकोणते चांगले संस्कार मिळाले याबाबतच्या घटना लिहून काढा.

शाळा-कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणीं सोबत तुम्ही केलेली मस्ती, त्याबद्दल झालेली शिक्षा, त्यातून मिळालेली शिकवण त्यामुळे बदललेलं आयुष्य लिहून काढा.

खेळ, कला, क्रीडा, नाटक, वक्तृत्व, साहित्य या व अशा क्षेत्रात आपण घेतलेला सहभाग, त्याबद्दल मिळालेलं पारितोषिक, ते करत असताना व्यक्तिमत्त्वात घडलेले बदल, शिक्षकांकडून नातेवाइकांकडून झालेलं कौतुक याबाबत घडलेल्या घटना लिहून काढा.

नोकरी अथवा व्यवसाय सुरू करताना आलेल्या अडचणी, त्यावर केलेली मात, त्यासाठी लोकांनी केलेले सहकार्य, पहिल्या दिवशी काम सुरू करतानाची आठवण, पहिल्या उत्पन्नाचा आनंद, त्यावेळी केलेली खरेदी, नोकरी किंवा व्यवसायात प्रगती करत असताना आपण केलेल्या कष्टांचा आढावा याबाबतच्या आठवणी लिहून काढा.

आयुष्यात आपल्याला अनेकांकडून प्रेम लाभतं. भाऊ बहीण, आई वडील, आजी-आजोबा, मित्रमंडळी, मुलं, कौटुंबिक नाती, सहकारी यांनी आत्मीयतेने तुमच्यासाठी केलेल्या विविध गोष्टींचं साठवणीत रूपांतर करा.

आयुष्य जगताना कोणीतरी तुमचा केलेला अपमान, त्याचा तुमच्या मनात निर्माण झालेला सल, त्यावर मात करण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न, त्यातून तुम्हाला मिळालेले यश याबाबतच्या आठवणी लिहून काढा.

एखाद्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवण्यासाठी तुम्ही केलेली धडपड, दिवस-रात्र कष्ट घेऊन केलेला अभ्यास, शिक्षकांकडून किंवा गुरूकडून मिळालेलं मार्गदर्शन, क्षमतावृद्धीसाठी घेतलेले कष्ट, त्यातून मिळालेलं यश किंवा अपयश अशा अनेक आठवणी लिहून काढा.

माणसाच्या चांगुलपणावर विश्वास निर्माण करणाऱ्या माणसांचे अनुभव, अडचणीच्या काळात तुमच्या पाठीशी उभी राहिलेली माणसं सारं लिहून काढा.

निसर्गाचं सान्निध्यापासून ते खाल्लेले चवदार पदार्थांपर्यंत जे जे चांगलं ते आपलं म्हणत लिखाण करून आपल्या विचारांना सकारात्मक करा. हळूहळू नवनवीन विचार तुम्हाला सुचायला लागतील.

दुसऱ्याचं आत्मचरित्र जगण्याला दिशा देतं. स्वतःचे आत्मचरित्र आत्मबळ देतं. जेव्हा जेव्हा मनात निराशा निर्माण होते, तेव्हा तुमचं आत्मचरित्र जगण्याची आशा देईल. लिखाण करायचे आहे असा विचार करून आयुष्याकडे पाहताना अनुभवांचा खजिना सापडेल. मनाच्या समृद्धीसाठी ही अनुभवांची खाण नक्कीच उपयोगी पडेल!

loading image
go to top