हसण्यासाठी जगा : उत्सुकता आणि उत्साहाचे सामर्थ्य!

Child
Child

लहान मूल तुमच्या कडेवर आहे. दीड ते दोन  वर्षाचं वय!  तुम्ही त्याला ‘स्वीच बोर्ड’ वरती बटन दाबायला सांगता. बटन दाबल्यावर ट्यूब लागते. फॅन सुरू होतो. त्याचे डोळे उत्सुकतेने लुकलुकतात. चेहऱ्यावर हसू येतं. तुम्ही बटन बंद करता. लहान मूल पुन्हा उत्साहाने बटन दाबतं. पुन्हा तेच घडतं.  त्या मुलाला पुन्हा आनंद होतो. तुम्ही त्या लहान मुलाला खाली ठेवता. ते एक हात वर करून अं.. अं.. करत  कडेवरती घ्यायला सांगतं.  त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता असते. प्रत्येक वेळी ते लहान मूल लाइट लागण्याचा, फॅन सुरू होण्याचा नव्यानं आनंद घेतं... तुमच्या आयुष्यातही लहानपणी असंच घडलं असेल... काही वर्षांनी मोठं झाल्यावर, ट्यूब किंवा फॅन लावताना तुम्हाला लहान मुलाप्रमाणं आनंद होतो का? एखादी व्यक्ती नव्यानं व्यवसाय करायला लागते. नारळ फोडून, फीत कापून उद्‍घाटन करताना उत्साह असतो. एवढंच कशाला, नवी नोकरी सुरू करताना, तिथल्या टेबलवर बसताना नव्या अनुभवाची उत्सुकता असते...काही वर्षांनी सोमवारच्या दिवशी कामाच्या ठिकाणी जाताना तुम्हाला पहिल्या दिवसाप्रमाणंच आनंद होतो का? लग्न ठरतं. साखरपुडा होतो. लग्न होतं. नव्या आयुष्याची सुरुवात करताना दोघांनाही एक उत्सुकता असते. या संपूर्ण काळात मनात आनंद असतो... काही वर्षानंतर लग्नापूर्वीप्रमाणंच आनंद होतो का?

आपलं उत्तर ‘हो’ असेल तर आपलं हार्दिक अभिनंदन!... आणि कोणत्याही प्रश्नाला ‘नाही’ असं उत्तर असल्यास त्याचं कारण शोधायला हवं. यासाठी आपल्याच आयुष्याकडं त्रयस्थपणे पाहायला हवं. ते पाहताना लक्षात येईल, जेव्हा आपण नवीन अनुभवाचं स्वागत ‘उत्सुकतेनं आणि उत्साहानं’  केलं, तेव्हा आपलं आयुष्य ‘आनंदी आणि समृद्ध’  होत गेलं. कारण या दोन्ही गोष्टीत विलक्षण सामर्थ्य आहे! टप्प्याटप्प्यानं आपण प्रत्येक गोष्टीचं रूपांतर नित्यक्रम अर्थात ‘रुटीन’मध्ये करायला लागतो. मग काही वर्षांनंतर आपणच तक्रार करतो. ‘आयुष्य अगदी रुटीन झालंय!’  

सकारात्मक आयुष्यासाठी दररोजच्या जगण्यातील अनुभवांना, लहान मुलाच्या उत्सुकतेनं सामोरे जाण्याची सवय लावून घेणं महत्त्वाचं आहे. तसंच दररोजच्या दिनक्रमात उत्सुकतेनं, उत्साहानं नवीन काय करता येईल याचा विचार केल्यास जगणं नीरस होत नाही. खरं तर जगणं तेच असतं , पण त्यात उत्सुकता आणि उत्साह ‘जिवंत’ ठेवले, तर ते ‘रसदार’ व्हायला लागतं. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गायक तेच गाणं दररोज गातो. नव्या जागा शोधत राहिला, तर गायनाचा आनंद कायम राहतो! नाटकात काम करणारा नट दररोज तेच ‘डायलॉग’ बोलतो, पण त्यात नवे ‘पंच’, जागा शोधल्या की काम करण्याचा आनंद मिळतो! यासाठी आज दिवसभरात नवा कोणता अनुभव मिळाला हे दररोजच  रात्री आठवून बघा. तो इतरांना सांगा. हळूहळू आपली दृष्टी बदलेल.

आयुष्याच्या रंगमंचावर जन्म आणि मृत्यू म्हणजे स्वीच बोर्डावरील ‘चालू आणि बंद’चं  बटन!  लहान मुलाप्रमाणं या ‘चालू-बंद’कडं, लुकलुकणाऱ्या डोळ्यांतील उत्सुकतेनं आणि उत्साहानं पाहायला सुरुवात केली, तर ‘आनंदाचा दिवा’ नक्की लागेल!!!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com