हसण्यासाठी जगा : विचारांचा पाक, मनाचा गुलाबजाम!

आजूबाजूची अस्थिर परिस्थिती माणसांच्या मनात गोंधळ निर्माण करते. या गोंधळावर मात करण्यासाठी लोक सल्ला घेतात, ‘इंटरनेट, पुस्तकं, व्याख्यानं, लेख यांतून मनाचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करतात.
Laugh
LaughSakal

आजूबाजूची अस्थिर परिस्थिती माणसांच्या मनात गोंधळ निर्माण करते. या गोंधळावर मात करण्यासाठी लोक सल्ला घेतात, ‘इंटरनेट, पुस्तकं, व्याख्यानं, लेख यांतून मनाचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण कृती करताना भलतीच होते. ‘एवढं करूनही कळतंय पण वळत का नाही?’ असा प्रश्न निर्माण होतो.

  • ‘डायबेटिस वर मात कशी करावी?’ या विषयावर प्रसिद्ध डॉक्टरांचं व्याख्यान असतं. अभ्यासपूर्ण व्याख्यानातील मुद्दे लोकांना पटतात. माना हलतात. व्याख्यान ऐकून बाहेर पडलेली माणसं, चहा प्यायला थांबतात.  ‘जीवनशैली बदलायला हवी.  खाण्यात बदल करायला हवा,’ अशी चर्चा करताना वडापाव खातात. गप्पा रंगतात म्हणून जाता जाता पुन्हा एकदा गोड चहा पिऊन मगच निघतात! 

  • सोशल मीडियाच्या अतिवापरामुळं होणारे शारीरिक व मानसिक परिणाम या विषयावर अत्यंत प्रभावी लेख लोकांच्या वाचण्यात येतात. ‘स्क्रीन टाइम कमी करा, माणसांशी प्रत्यक्ष संवाद साधा,  रात्री झोपण्यापूर्वी सोशल मीडियाचा वापर करू नका,  हे व असे अनेक मुद्दे वाचणाऱ्यांना पटतात.  मग ही माहिती लोकं जास्तीत जास्त जणांना ‘फॉरवर्ड’ करतात.  ‘मेसेज पाहिल्याची निळी टिक दिसते आहे, पण त्यावर लाईक किंवा कॉमेंट का आली नाही?’ याची चिंता करत बसतात.

  • ‘सकारात्मक विचार करावा, रागावर नियंत्रण ठेवावे,  दररोज व्यायाम करायलाच हवा, प्राणायाम करावा, ‘तेलकट, साखर, मैदा असलेले खाद्यपदार्थ टाळायला हवेत, दररोज सकस विचार देणारं वाचन करायला हवं, ट्रॅफिकचे नियम पाळायला हवे,’ हे व असे अनेक विचार लोकांना पटतात. ‘प्रत्यक्ष बदल का घडतं नाही अथवा का घडतो,’ हे उदाहरणातून समजावून घेऊया.

  • सरकारी कार्यालयाबाहेर हातात कागदपत्र घेतलेल्या लोकांची प्रचंड मोठी रांग असते. वैतागलेल्या लोकांच्या तावडीत दरवाजावरचा पहारेकरी, शिपाई सापडतो. कोणी शांतपणे, कोणी चिडून त्याच्याशी बोलतात. ‘लवकर काम होण्यासाठी काय करायला हवं,’ हे त्याला सांगतात. तोही ‘तुमचं बरोबर आहे,’ म्हणत, सगळं फक्त ऐकून घेतो. पण बदल घडतच नाही. कारण आतल्या साहेबांपर्यंत कोणी विषय पोहोचवतच नाही!

  • आपल्या मनाच्या बाबतीत हेच घडतं. मनाच्या दरवाजावर बसलेल्या पहारेकऱ्याला आपण विविध माध्यमातून ‘जगण्यात काय बदल करायला हवे,’ हे पोहोचवतो.  अंतर्मनाच्या प्रेरणेतूनच आपल्या बहुसंख्य कृती घडतात. पण अंतर्मनाच्या गाभाऱ्यात विचार पोहोचत नाहीत आणि बदल घडतं नाहीत. त्यामुळं सगळ्या गोष्टी वरच्या वरच राहतात.

  • नवीन लग्न ठरलेलं  जोडपं टेकडीवर फिरायला जातं. टेकडीवर चढताना तो श्वासातून ‘हाफ हाफ’ करत ‘फुल्ल’ दमलेला असतो!  ती काहीही बोलत नाही.  पण, तिच्या नजरेतून त्याला ‘फिटनेस वाढवायला हवा. वजन कमी करायला हवं,’ असा संदेश मिळतो. दुसऱ्याच दिवशीपासून ‘लग्नापर्यंत वजन कमी करण्याचा निश्चय करून तो कृती करायला लागतो.’  कारण शब्द न वापरताही मनाच्या पहारेकऱ्याऐवजी तिच्या नजरेतून अंतर्मनाच्या गाभाऱ्यात विचार पोहोचतात.

‘गुलाबजाम’मध्ये पाक आतपर्यंत मुरण्यासाठी तो चांगला तळावा लागतो. त्याहीपेक्षा जास्त चांगला मळावा लागतो! म्हणूनच चांगले विचार अंतर्मनावर नीट मळता आले, तर  सकारात्मक बदल नक्की घडतो !!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com