esakal | गर्भवती महिलांना कोविड झाल्यास खाबरू नका घ्यावी खबरदारी; स्‍त्रीरोग तंज्‍ज्ञांचा सल्‍ला

बोलून बातमी शोधा

pregnant women

गर्भवती महिलांना कोविड झाल्यास खाबरू नका घ्यावी खबरदारी; स्‍त्रीरोग तंज्‍ज्ञांचा सल्‍ला

sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : गर्भवती महिलेस कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून मास्क, सॅनिटायझर आणि शारीरिक अंतर या त्रिसूत्रीचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, सकस व संतुलित फलहार घ्यावा. कोविड झाल्यास घाबरून न जाता डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्यावा. वेळोवेळी आवश्यक असलेल्या चाचण्या कराव्‍यात आणि अत्यावश्यक असेल तरच दवाखान्यात डॉक्टरांची वेळ घेऊन जावे, असा सल्ला जळगाव शहरातील स्त्रीरोग तज्ज्ञांनी दिला.

आयएमए जळगावतर्फे 'कोविड आणि गर्भावस्था' या विषयावर मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. चर्चासत्रात स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुदर्शन नवाल, डॉ. अंजली भिरुड, डॉ. विलास भोळे, डॉ. जितेंद्र कोळी हे सहभागी झाले होते. उपक्रमासाठी आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ. सी. जी. चौधरी, सचिव डॉ. राधेश्याम चौधरी यांनी परिश्रम घेतले.

कोविडमुळे संपूर्ण कुटुंब चिंतेत

डॉ. राधेश्याम चौधरी यांनी कोविडचा मातेसह गर्भस्थ बाळावर काय विपरीत परिणाम होईल; अशा शंका-कुशंका येत असतात. त्यामुळे कोविडचा गर्भावर व गर्भावस्थेचा कोविडवरील विविध परिणामांची शक्यता, शोध निबंध व वैद्यकीय मार्गदर्शक तत्वे याद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न या चर्चासत्रात करीत आहोत. गर्भावस्थेच्या पहिल्या तीन महिन्यात गर्भाच्या विविध संस्थाच्या निर्मितीचा पाया ठेवला जातो. तर दुसऱ्या तीन महिन्यात या संस्था स्वतंत्र काम करायला सुरुवात करतात आणि शेवटच्या तीन महिन्यात गर्भावस्थेतील बाळाच्या सर्व संस्था परिपक्वतेकडे जाऊन मातेशिवाय गर्भाचे स्वतंत्र अस्तित्व बाहेरच्या जगात स्थापित करण्याच्या दृष्टीने विकसित होतात. म्हणून या वेगवेगळ्या टप्प्यात कोविडच्या संक्रमणाच्या उपचारांमधील मार्गदर्शक तत्वांमध्ये देखील काहीसा बदल होतो, असे डॉ.चौधरी यांनी सांगितले.

कोरोनामुळे गर्भधारणा रोखू नये

डॉ. सुदर्शन नवाल म्हणाले, की आपल्यामुळे समस्या वाढल्या. कोरोना काळात त्रिसूत्रीचा अवलंब करा. प्रतिकार शक्ती मजबूत ठेवा. आपल्या शरीरात अनेक व्हिटॅमिन, प्रोटीनची कमतरता आहे. पुरेशी झोप घ्या, नियमीत व्यायाम करा. भावनिकदृष्ट्या, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम असल्यास गर्भधारणा रोखू नये. कोविड केव्हा जाणार हे कुणालाही माहिती नाही. आपला संसर्ग कुणालाही दान करू नये. व्यंधत्व निवारणचे उपचार सुरू असतील तर ते सुरूच ठेवावे. रुग्णालयांचे सर्व नियम पाळावे. घाबरू नये, असा सल्ला डॉ.नवाल यांनी दिला.

गर्भाला संसर्ग होण्याची शक्यता कमी

डॉ. अंजली भिरुड म्हणाल्या, की थायरॉईड, रक्तदाब, अस्थमा, डायबेटीस, वजन जास्त असलेल्या गरोदर महिलांना कोरोनाचा धोका अधिक असतो. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत गर्भवती महिलांना कोरोनाचा संसर्ग अधिक आहे. कोरोना संसर्ग झालेल्या महिलांच्या डिलेव्हरीत धोका उद्‌भवल्याचे प्रमाण कमी आहे. गर्भवती महिलेपासून पोटात असलेल्या गर्भाला कोविड होण्याची शक्यता ४ ते ६ टक्के आहे. कोरोनाची लक्षणे नाहीत किंवा अतिसौम्य लक्षणे असलेल्या गर्भवती महिलांनी गृहविलगीकरणात राहून उपचार घ्यावे.

बाळाला स्तनपान करावे

डॉ. भोळे म्हणाले, की गर्भावस्था २० ते २४ आठवड्यापर्यंत असल्यास आणि बाळाला व्यंग असल्यास गर्भपात करता येतो. गर्भवती स्त्री आणि कोरोना याबाबत अद्यापही सविस्तर माहिती उपलब्ध नाही. एखाद्या महिलेला कोरोना झाल्यास तिची कोविड टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच गर्भपाताचा निर्णय घ्यावा. २० आठवड्यापर्यंत गर्भपात करता येतो. कोरोनाग्रस्त महिलेने प्रसूतीनंतर बाळाला स्तनपान करावे, मास्क वापरावा आणि हात स्वच्छ ठेवावे, असे डॉ.भोळे यांनी सांगितले.

कोविडग्रस्त महिलांना मानसिक आधार द्या

डॉ.जितेंद्र कोळी म्हणाले की, जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात प्रसूती करताना पीपीईचा योग्य वापर, डोळ्यांना गॉगल, कमीत कमी लोकांमध्ये लवकरात लवकर प्रसुतीची प्रक्रिया पूर्ण करावी अशा पद्धतीने आम्ही काम केले.गर्भवती महिलेने फार घाबरून जाण्याची गरज नाही. ४ महिलांचा मृत्यू झाला त्या गंभीर अवस्थेत उपचारार्थ दाखल झाल्या होत्या. कोविडग्रस्त गर्भवती महिलेला मानसिक आधार देणे फार गरजेचे असते.