esakal | आयुष्यातील तिसरे महत्त्वाचे वळण आणि वैद्यकीय सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

check up.

वयाचा ४५ ते ५५ वर्षाचा कालावधी हा ऋतुनिवृत्तीचा (Menopause) असतो. यामध्ये स्त्रीहार्मोन्सच्या चढउतारामुळे स्त्रीला शारिरिक व मानसिक बदलांना सामोरे जावे लागते.

आयुष्यातील तिसरे महत्त्वाचे वळण आणि वैद्यकीय सल्ला

sakal_logo
By
डॉ. सुषमा देशमुख

आज निलाताई एकट्याच आल्या होत्या. मी त्यांना विचारले, 'आज एकटयाच दिसताय?' कारण दरवेळी वेगवेगळे पेशंटस् घेऊन येणे व त्यांचे उपचार करवणे हे त्यांना खुप आनंद द्यायचे. त्या हसुन म्हणाल्या, 'डॉक्टर, आता मीच पन्नाशीच्या पुढे आहे. तुम्ही खुपदा सांगून पण मी माझी तपासणी कधीच करून घेतली नाही. माझी लहान बहीण अमेरिकेत असते. ती तर वयाच्या तीस वर्षांपासूनच तिचा चेकअप नियमित करत असते. काल मला ती खुप रागावली. खरच डॉक्टर तपासून घ्या. पण जरा समजाऊन सांगा ना.’

आजकाल बऱ्याच स्त्रिया स्वत:हून तपासणीसाठी येतात. पण त्याचे प्रमाण अजुनही कमी आहे. आम्ही नेहमीच आमच्या प्रौढावस्थेतल्या पेशंटसना सांगतो की हे आता त्यांचे तिसरे महत्त्वाचे वळण आहे. संकोच न करता स्त्रीरोगतज्ज्ञांकडून तपासणी करा.

आता या वयातच इतकी काळजी का? तसे पाहिले तर कुठल्याही वयात जर त्रास असेल तर त्याप्रमाणे त्याच्याकडे लक्ष देऊन त्याची तपासणी करून घेतली पाहिजे. पण चाळिशी आल्यावर प्रत्येकीने तब्येतीबाबत सतर्क राहिले पाहिजे.
कारण
* जोखमीचे वय (High risk age) : याच वयात शरीराचे वेगवेगळे आजार (रक्तदाब, मधुमेह) व प्रजननसंस्थेशी निगडित रोग जास्त प्रमाणात आढळून येतात. त्याचप्रमाणे कर्करोगाचाही प्रादुर्भाव वयाच्या चाळिसाव्या वर्षानंतरच्या कालावधीत जास्त आढळतो. गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेचे प्रमाण या वयातच जास्त दिसून येते.

* वयाचा ४५ ते ५५ वर्षाचा कालावधी हा ऋतुनिवृत्तीचा (Menopause) असतो. यामध्ये स्त्रीहार्मोन्सच्या चढउतारामुळे स्त्रीला शारिरिक व मानसिक बदलांना सामोरे जावे लागते. मासिक पाळी अनियमित होते व शेवटी पूर्णपणे बंद होते. पण या कालावधीतच जर जननेंद्रियाचा कुठला आजार असेल तर त्यामध्ये सुद्धा मासिक पाळी अनियमित होते. बऱ्याच स्त्रिया या अनियमित रक्तस्त्रावाकडे ऋतुनिवृत्तीचा कालावधी म्हणून दुर्लक्ष करतात. यामुळे जर काही आजार असेल तर तो वाढू शकतो. म्हणूनच स्त्रीरोगतज्ज्ञांकडून एकदा तपासणी केलेली आवश्यक असते.

ऋतुनिवृत्तीच्या कालावधीत स्त्रियांमध्ये मानसिक व शारिरिक बदल चालू होतात
अ) मानसिक 

कधी कारण नसतांना घाम फुटतो, छातीत धडधड होते. आत्मविश्वास कमी होतो. स्वभाव चिडचिडा होतो. विसरभोळेपणा वाढतो. या वयात स्त्रीच्या घरच्या जबाबदाऱ्या थोड्या कमी झालेल्या असतात. मुले व पती आपापल्या कामात व्यस्त असतात. त्यामुळे तिला एकाकीपणा जाणवतो. (यालाच आम्ही Empty Nest Syndrome म्हणतो.)

ब) शारिरिक
पाळीमधील अनियमितता व पाळी बंद होणे.
योनीमार्गात कोरडेपणा येतो. शरीर, चेहऱ्याची त्वचा कोरडी होणे.
पोटावरील व कमरेवरील चरबी वाढणे.
थकवा येणे. पाठदुखी, कंबरदुखी, हाडे ठिसूळ होणे
हृदयविकाराची शक्यता वाढते.
स्त्रीरोगांचे प्रमाण वाढते, कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते.
आता तपासण्यांची सुरूवात कुठून करायची?
सर्वसाधारण तपासण्या

१. यामध्ये प्रथमतः होणाऱ्या त्रासांविषयी आम्ही माहिती मिळवतो. त्याचप्रमाणे वैयक्तिक कौटुंबिक, पूर्वीच्या त्रासांविषयी माहिती घेतली जाते. उदा. काही कर्करोग हे काहीप्रमाणात अनुवांशिक असतात. जसे स्तनाचा कर्करोग. तसेच काही जोखमीच्या घटकांविषयी माहिती घेतो.
२. त्यानंतर पूर्णतः शारिरिक तपासणी केली जाते. यामध्ये आम्ही रक्तदाबापासून ते आतील भागापर्यंत (internal examinations) तपासणी करतो.
३. नंतर काही ठराविक रक्त, लघवीच्या तपासण्या उदा. हिमोग्लोबिन, शुगर व कांही विशेष रक्ताच्या तपासण्या उदा. थायरॉईड, लीपीड प्रोफाईल. तसेच आजकाल आम्ही Vit D ची रक्त तपासणी करण्यास सांगतो. कारण भारतीय लोकांमध्ये विटॅमिन D चा अभाव आढळून आलेला आहे.

४. काही विशिष्ट तपासण्या
अ) सोनोग्राफी : सोनोग्राफीमुळे आपल्याला शरीराच्या आतील भागांची व्यवस्थित तपासणी करता येते. कधी कधी जो त्रास पेशंटलाही नसतो, किंवा आम्हालाही तपासणीत आढळत नाही, तो सोनोग्राफीमध्ये लक्षात येतो. सोनोग्राफी खरोखरच अतिशय महत्त्वाची तपासणी आहे.
ब) मॅमोग्राफी : ही तपासणी, ज्या पेशंटना त्रास आहे किंवा काही जोखमीचे घटक असतील तर जरूर करण्यास सांगतो. यामध्ये स्तनांची एका विशिष्ट उपकरणाने व्यवस्थित तपासणी केली जाते.
क) पॅप स्मिअर : ही तपासणीसुद्धा आम्ही चाळीस व चाळीसच्या पुढे असणाऱ्या सर्व स्त्रियांना सांगतो. यामध्ये योनिमार्गातील स्त्राव काचपट्टीवर घेऊन त्यामध्ये काही विशेष द्रव्य टाकून सुक्ष्मदर्शक यंत्रात तपासला जातो. ही अतिशय साधी पण महत्त्वाची तपासणी आहे. यामध्ये योनिमार्गातील पेशींची तपासणी होते व जर कुठे आजार असेल तर आपल्याला त्याबद्दल थोडीफार सूचना मिळू शकते. पॅपस्मियर तपासणी साधारणपणे दर दोन ते तीन वर्षांनी करतात.
ड) बायोप्सी : ही तपासणी जरूरीप्रमाणेच करतात. प्रत्येक पेशंटला करण्याची गरज नसते.
इ) बोन डेन्सीओमेट्री : हे एक महत्त्वाचे उपकरण आहे. ज्यामुळे (पेशंटला काहीही त्रास न होता) आपल्याला पेशंटच्या हाडांच्या सध्याच्या परिस्थितीची कल्पना येते. कांही पेशंटची हाडे कमकुवत व ठिसूळ होतात. विशेषतः ऋतुनिवृत्तीनंतर. त्याप्रमाणे मग आम्ही पेशंटसना योग्य ते उपचार देऊ शकतो.

या सर्व तपासण्यांबरोबर काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
१) नियमित व्यायाम, प्राणायाम व कोवळा सूर्यप्रकाश रोज सकाळी अंगावर घ्यावा. लट्ठपणा वाढू देऊ नये.
२) आहार : तुप, तळलेले, चमचमीत पदार्थ व अति तिखट व मसाल्याचे, मीठाचे प्रमाण असलेले पदार्थ टाळावेत. हिरव्या पालेभाज्या, फळे, सलाद यांचा आहारात मुबलक वापर करावा. कॅल्शियमयुक्त पदार्थांचे (नाचणी, मेथी, राजगिरा) सेवन करावे.
३) आनंदी, क्रियाशील रहावे. मित्रमैत्रिणींचा सहवास असावा. पुढील आयुष्याचा वार्धक्याचा खुप विचार न करता आहे तो क्षण आनंदी करावा. नवनवीन गोष्टी सतत शिकत राहाव्या.
यामुळे आपलं शरीर हे आपल्याला आपल्या उतारवयात व्यवस्थित साथ देईल व आपण आयुष्य चांगल्या त-हेने उपभोगू शकू. आणखी काय हवय? Health is Wealth.

आली ही चाळीशी.पन्नाशी
आयुष्याचे तिसरे पर्व रहा दक्ष
नका करू तब्येतीकडे दुर्लक्ष
जाणून घ्या स्त्री शरीररचना कशी, आली ही चाळीशी पन्नाशी...
वय असे हे ऋतुनिवृत्तीचे पण आहे मात्र जोखमीचे
तपासा आपणच आपले वक्ष
डॉक्टरांच्या सुचनांकडे असावे लक्ष
करून घ्या योग्य आरोग्य तपासणी
नका विसरू papsmear चाचणी
पळवून लावा कर्करोगाचा राक्षस
विविध तपासण्या आहेत उपलब्ध
नका राहू आता स्तब्ध, निःशब्द
संसाराचा तुम्हीच महत्त्वाचा घटक
सकस आहार सोयाबिनयुक्त, व्यायाम माफक
तब्येतीविषयी रहा जागरूक
जीवनात आनंद, वेळेचे नियोजन
जोपासा छंद, आवड, असावे मानसिक समाधान
रहावे हसत सदाफुलीसमान
आहे ही नवी पर्वणी
ऐन उमेदीची वर्षे ही अशी
आली ही चाळीशी पन्नाशी...
याच वयात तुम्ही होता हळूहळू व्यापमुक्त
वेळ, तन, मन, धन, नियोजन तुम्हीच ठरवा फक्त
स्त्री असण्याचा ठेवा सार्थ अभिमान मनाशी
आली ही चाळीशी.पन्नाशी...