योग-जीवन : सालंब विपरीत करणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

salam viparita karani asana

आजच्या लेखात मी मोजक्या शब्दांत पतंजली महामुनी यांच्या जन्माची कथा सांगणार आहे. आपल्या पुराणात पतंजली यांना आदिशेषाचा अवतार मानले आहे.

योग-जीवन : सालंब विपरीत करणी

- मुकुंद मावळंकर, अय्यंगार योग शिक्षक

आजच्या लेखात मी मोजक्या शब्दांत पतंजली महामुनी यांच्या जन्माची कथा सांगणार आहे. आपल्या पुराणात पतंजली यांना आदिशेषाचा अवतार मानले आहे. असे मानले जाते, की ते इसवीसनाच्या ३०० ते ५०० वर्षांपूर्वी स्वयंभूपणे पृथ्वीवर अवतरले. आदी काळात एकदा भगवान शंकरांनी सर्व देवांना आपले तांडव नृत्य बघावयाला आमंत्रित केले. मध्यभागी विष्णू शेषनागावर आसनस्थ होते. शंकराचे नृत्य रंगात आले, तसे विष्णू भगवानांचे शरीर कंपायमान होऊन जड होत गेले. त्यामुळे शेषनागाचा श्वास गुदमरायला लागला. तेवढ्यात नाच संपला आणि विष्णू भगवानांचे शरीर पूर्ववत हलके झाले. हा चमत्कार अनुभवल्यावर शेषनाग म्हणाले, ‘मला असाच नाच शिकायचा आहे.’ प्रसन्न होऊन विष्णू म्हणाले, ‘मी तुझी इच्छा भगवान शंकरांना कळवली आहे. ते तुला अजून एक काम देणार आहेत व त्यासाठी तुला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल.’ शंकरांनी आदिशेषाला संस्कृत व्याकरणाचा ग्रंथ लिहावयाची जबाबदारी दिली. 

पृथ्वीवर एकेकाळी एक सर्वगुण संपन्न पारंगत योगिनी राहत होती. तिचे नाव होते गोनिका. तिला मुल-बाळ किंवा कोणी शिष्य नव्हते. उतार वयात तिने निश्चय केला, मला सूर्य देवाकडून जे योगाचे ज्ञान प्राप्त झाले आहे, ते मी त्यांना परत करणार. दुसऱ्या दिवशी सूर्यास्तापूर्वी उठून, नदीवर स्नान करून ओंजळीत पाणी घेतले आणि उगवत्या सूर्य देवाची प्रार्थना केली आणि आदिशेषाने हीच संधी साधून ओंजळीत अवतार घेतला. गोनिकाला हा संकेत समजला. त्या अर्ध सर्प बाळाचे प्रेमाने पालनपोषण केले. स्वर्गातून ओंजळीत पडल्यामुळे तिने त्याचे नाव पतंजली (पत + अंजली) असे ठेवले. या दैवी बालकाने गोनिकाकडून सगळी योगविद्या आत्मसात केली व चिदंबराकडून नृत्यकला अवगत केली. पुढे जाऊन ते महामुनी झाले आणि त्यांनी तीन अति महत्त्वाचे ग्रंथ लिहले. १) महाभाष्य- संस्कृत व्याकरणावर २) चारक संहिता - आयुर्वेदावर ३) पातंजल योगदर्शन- १९६ सूत्रांचा अद्भुत योगसारांश. समस्त मानवजातीला देवांकडून लाभलेल्या सहा दर्शनांपैकी सर्वांत महत्त्वाचे दर्शन. 

आज आपण सांलब विपरीत करणी आसन पाहूया. ही योगाच्या १० महत्त्वाच्या मुद्रांपैकी एक.

  • दोन लोड एकमेकांवर ठेवून लोडाच्या एका बाजूचे टोक भिंतीला टेकवून ठेवा. भिंतीकडे तोंड करून घोड्यावर बसल्याप्रमाणे बसा. पाय वाकवले आणि तळपाय जमिनीवर असुद्या. हातांचा आधार घेत आडवे व्हा. नितंबाचा भाग लोडावर ठेवून, डोके आणि खांदे जमिनीवर टेकवा, दोन्ही हात बाजूला जमिनीवर पसरून ठेवा.

  • श्वास सोडून, पाय उचलून मांड्या एकमेकांना जुळवून जमिनीच्या काटकोनात घ्या. गुडघे ९० अंशात ठेवल्याने दोन्ही नडग्या जमिनीला समांतर असतील आणि पावले भिंतीवर टेकवून ठेवा, सामान्य श्वास घेत २ ते ३ मिनिटे थांबा. ही आहे मधली सोपी स्थिती.

  • गेल्या आठवड्यात शिकलेल्या सेतुबंध सर्वांगासनाचा सराव जसजसा चांगला होईल व पाठीचा कणा लवचिक होईल, तसे भिंतीवरून एकानंतर एक पाऊल उचलून पाय गुडघ्यातून सरळ करून जमिनीच्या काटकोनात आकाशाकडे लांब करता येतील. हे आहे सालंब विपरीत करणी.

सेतुबंध सर्वांगासन आणि विपरीत करणी या दोन्ही आसनात हृदय लयबद्ध आणि मेंदू शांत राहतो. आजच्या आसनामध्ये पोटाला खळगा तयार होऊन पोटातील सर्व व ग्रंथींना रक्तपुरवठा चांगला होतो आणि ते सशक्त होतात. ही दोन्ही आसने नियमितपणे केल्याने इच्छाशक्ती व आत्मविश्वास वाढतो, बुद्धीचा दृढनिश्चय होतो आणि सर्व स्मृती जागृत होऊन नवचैतन्य प्राप्त होते.

Web Title: Mukund Mavalkar Writes Salam Viparita Karani Asana Yoga

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :health newsyoga
go to top