योग-जीवन : कैवल्यपाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yoga

आज आपण पतंजली महामुनींच्या योगदर्शनच्या चौथ्या आणि शेवटच्या ‘कैवल्यपादा’ची ओळख करून घेणार आहोत. हा सर्वांत छोटा; पण सर्वांत कठीण आहे.

योग-जीवन : कैवल्यपाद

- मुकुंद मावळंकर, अय्यंगार योग शिक्षक

आज आपण पतंजली महामुनींच्या योगदर्शनच्या चौथ्या आणि शेवटच्या ‘कैवल्यपादा’ची ओळख करून घेणार आहोत. हा सर्वांत छोटा; पण सर्वांत कठीण आहे. यात फक्त ३४ सूत्रे आहेत. विभूतीपादात पतंजलींनी नमूद केले आहे, की वर्षानुवर्षाच्या योग तपश्चर्ये नंतर साधकाला अमाप शक्ती आणि अगणित सिद्धी प्राप्त होतात. कैवल्यपादात पतंजली सांगतात, की साधक जेव्हा या सगळ्यांच्या पुढे जाऊन आपली साधना सातत्याने चालू ठेवतो, तेव्हा त्याला कैवल्याकडे जाण्याचा मार्ग गवसतो. आपली प्रकृती, शरीर, क्रिया, आचरण आणि विचार हे त्रिगुणांच्या (सत्त्व गुण, रजो गुण आणि तमो गुण) यांच्या मिश्रणातून तयार होत असतात. समाधी अवस्थेत योगी या सगळ्यातून मुक्त होतो. त्याचे आचरण व विचार तटस्थ होतात. समाधी अवस्थेत भूतकाळातल्या स्मृतींपासून सुटकारा तर मिळतोच; पण भविष्याच्या चिंतेतूनही साधक मुक्त होतो.

त्याचे आचरण व विचार गुणातीत होतात. पतंजली पुढे म्हणतात, की योगतपश्चर्येने मिळवलेले संस्कार पुढच्या जन्मात पण प्रगट आणि अभिव्यक्त होतात. पुढच्या ३ सूत्रांत पतंजली तिन्ही काळ आणि त्रिगुण कसे एकमेकात गुंफले जाऊन प्रकृतीचे कालचक्र निरंतर चालू राहते, याची समज आणि शिकवण देतात. त्याच्या पुढच्या सूत्रांतून वस्तू आणि विषय यावर चर्चा करतात. वस्तू जरी एक असली, ती वेगवेगळ्या लोकांनां कशी दिसेल, ती बघून कोणाच्या चित्तात काय विचार येतील, त्यावर कोण कसा वागेल, यात मात्र अमाप भिन्नता असते. पण या सगळ्याचा स्वामी जो द्रष्टा आहे तो अचल असतो. तो बदलत नाही आणि तो स्वयंप्रकाशी असतो. तो सर्वज्ञानी असतो. जसे हे साधकाला उमगायला लागते, तसे चित्ताचे विसर्जन होते आणि परमात्माचे दर्शन आपोआप घडू लागते. चित्तलहरी शांत होऊन उगमाकडे ओढल्या जातात व द्रष्ट्यामध्ये विलीन होतात. पतंजली म्हणतात,

तदा विवेकनिम्नं कैवल्यप्राग्भारं चित्तम् ॥२६॥

अर्थात: चित्ताची ही सर्वांत वरची स्थिती होय. याला ‘दिव्यचित्त’ असे म्हणतात. या स्थिती विवेकबुद्धीचा सतत प्रवाह चालू होतो आणि साधक मोक्ष प्राप्त करतो.

पुढच्या दोन सूत्रांत पतंजली साधकाला परत सावध करतात, की आधीच्या उरल्यासुरल्या सूक्ष्म वाईट संस्कारांमुळे चित्त विचलित होऊन साधना भंग होऊ शकते. तरी सावधान, अजूनही पुढे कैवल्याकडे पोचायचे आहे. आता बघूया कैवल्यापादाच्या शेवटच्या सूत्रात पतंजली महामुनी काय म्हणतात.

पुरुषार्थशून्यानां गुणानां प्रतिप्रसवः कैवल्यं स्वरूपप्रतिष्ठा वा चितिशक्तिरिति॥३४॥

अर्थात: चित्तवृत्ती निरोधापासून सुरु झालेली योग साधना, चित्त विसर्जन होऊन द्रष्ट्यात एकरूप होईपर्यंतची आहे. साधक त्रिगुणांच्या विळख्यातून मुक्त होतो. चित्त त्याच्या कायमस्वरूपी जागेवर पोचते. हेच आहे योगाचे ध्येय आणि हाच आहे योगाचा अर्थ. एवढे सांगून मी माझा लेख संपवतो.

गेले सहा महिने कसे झपाझप निघून गेले हे कळलेच नाही. वाचकांनी रसपूर्वक हे लेख वाचले त्यांचे आभार. अय्यंगार गुरुजी, गीताताई, प्रशांतजी, सुनीताताई, अभिजता आणि रमामणि अय्यंगार स्मृती संस्थेचे सर्व शिक्षक ज्यांनी मला घडविले आणि ज्यांच्यामुळे माझ्या जीवनात योगा कल्पवृक्ष रुळाला, त्या सर्वांनां माझे साष्टांग प्रणाम. ही लेखमाला लिहण्याचे आव्हान पेलण्याचे मनोबल आणि वेळोवेळचे मार्गदर्शन सुनीताताईंनी दिले, राजलक्ष्मीताईंनी मला साथ दिली, स्वप्नीलनी संपादन साह्य दिले, प्राची, राजेंद्र आणि विलासनी त्यांची सुंदर छायाचित्रे दिली, त्याबद्दल या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानून मी रजा घेतो.

या सहा महिन्यांत आपण सुरवातीच्या वीसेक आसनांचा अभ्यास केला आणि ती कशी घालायची हे समजून घेतले. आपण अष्टांग योग म्हणजे काय हे पण शिकलो आणि त्याच्या आठही अंगांची माहिती करून घेतली. ही आसे तशी घालायला सोपी आहेत; पण ती तेवढीच महत्त्वाची आहेत. पुढच्या लेखातून आपण योगाचा जास्त सखोल अभ्यास करणार आहोत आणि अशीच पुढची २०-२२ आसने शिकणार आहोत. पुढचे लेख अनुभवी अय्यंगार शिक्षक किशोर आंबेकर आपल्यापर्यंत पोचवणार आहेत.

Web Title: Mukund Mavalkar Writes Yoga

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :yogahealth
go to top