योग-जीवन : ऊर्ध्वमुख श्वानासन

आजच्या लेखात आपण पतंजलीच्या योगदर्शनाच्या दुसऱ्या पादाची अर्थात ‘साधनपादा’ची ओळख करून घेणार आहोत.
urdhwamukha svanasana
urdhwamukha svanasanasakal
Updated on
Summary

आजच्या लेखात आपण पतंजलीच्या योगदर्शनाच्या दुसऱ्या पादाची अर्थात ‘साधनपादा’ची ओळख करून घेणार आहोत.

- मुकुंद मावळंकर, अय्यंगार योग शिक्षक

आजच्या लेखात आपण पतंजलीच्या योगदर्शनाच्या दुसऱ्या पादाची अर्थात ‘साधनपादा’ची ओळख करून घेणार आहोत. साधनपादात पतंजली महामुनींनी साधकाला योगाच्या आठही अंगांची ओळख करून दिली आहे. यातली  पहिली दोन सूत्रे समजून घेऊ या...

तपःस्वाध्यायेश्वरप्रणिधानानि क्रियायोगः॥१॥

अर्थात तप, स्वाध्याय, आणि ईश्वरावर संपूर्ण श्रद्धा व विश्वास ठेवून केलेली साधना म्हणजेच क्रिया योग. तात्पर्य असे की, क्रिया केल्याशिवाय योग होत नाही. किती स्वच्छ आणि थोडक्या शब्दात पतंजली त्यांचे विचार मांडतात. 

समाधिभावनार्थः क्लेशतनूकरणार्थश्च॥२॥

समाधी मिळवण्यासाठी योगाचा अभ्यास आणि सराव करावयाचा असतो. तसेच, योगाचे आचरण केल्याने जीवनातले सगळे क्लेश कमी होतात. पुढच्या ५-६ सूत्रांत पतंजली सांगतात, की एकूण क्लेश पाच आहेत आणि त्या सगळ्यांना कमी करायचा मार्ग ते दाखवतात. 

कर्ममार्ग, ज्ञानमार्ग आणि भक्तीमार्गाचा आधार घेऊन साधक समाधीपर्यंत पोहोचू शकतो. पुढच्या काही सूत्रात ते म्हणतात, की अविद्येच्या सुपीक जमिनीतच बाकीचे चार क्लेश पोसले जातात. म्हणूनच आधी अविद्येवर मात  करूनच पुढे  जायचे असते. पुढचं एक महत्त्वाचे सूत्र आहे.

योगाङ्गाऽनुष्ठानादशुद्धिक्षये ज्ञानदीप्तिराविवेकख्यातेः॥२८॥

अर्थात योगाच्या आठ अंगांची सातत्यपूर्ण, समर्पित, अखंडित, आणि भक्तिभावाने साधना केल्याने अशुद्धींचा समूळ नाश होतो. तेवढेच नव्हे, तर ज्ञान मिळवून देदीप्यमान होऊन साधक विवेकी होतो तेव्हा त्याची ख्याती सर्वत्र पसरते. पुढच्या पाच सूत्रांत पतंजली योगाच्या आठही अंगांची विस्तृत ओळख करून देतात. ही आपण आधीच्या लेखातून मिळवली आहेच. त्यानंतर यम आणि नियमाच्या प्रत्येक महाव्रताच्या आचरणाने प्राप्त होण्याचे फायदे आणि त्यातून मिळणाऱ्या सिद्धी ते सूचित करतात. त्यानंतरच्या सूत्रातून आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा आणि ध्यानाची व्याख्या करून ते साधनपाद समाप्त करतात.

आता वळूया ऊर्ध्वमुख श्वानासनाकडे ...

मॅटच्या पुढच्या टोकावर समस्थितीत उभे राहा. पायात थोडे अंतर घ्या. हाताचे पंजे जमिनीवर टेकवा व उत्तानासनात या. आता आधीच्या लेखात शिकल्याप्रमाणे एक एक पाय मागे घ्या आणि अधोमुख श्वानासनात या. या स्थितीत दोन-तीन वेळा सामान्य श्वासोश्वास घेत थांबा.

श्वास घ्या आणि हात व पाय ताठ ठेवून नितम्ब खाली आणा. छाती उचला आणि समोर बघा. पोटऱ्या, मांड्या आणि पाठीचा कणा पूर्णपणे ताणा. पाय जमिनीला समांतर असले पाहिजेत. पायाची बोटे मॅट वर रुतवून ठेवा. पावले जमिनीच्या काटकोनात असली पाहिजेत.

कोपरे ताठ ठेवून हात सरळ ठेवून जमिनीच्या काटकोनात आणा. छाती पुढच्या बाजूला रुंद झालेली असली पाहिजे. मान ताणून डोके जास्तीत जास्त मागे न्या व छताकडे बघा. या स्थितीत दीर्घ श्वास घेत अर्ध ते एक मिनीट थांबा. हे आहे ऊर्ध्वमुख श्वानासन.

हाताचे पंजे जमिनीवर दाबलेले ठेवून कुल्ले उचलून अधोमुख श्वानासनात या. श्वास घ्या व उत्तानासनात या. श्वास सोडा. श्वास घेत समस्थितीत या.

या आसनाचा नियमित सराव केल्याने पाठीचा कणा लवचिक आणि सशक्त होतो. कडक पाठ असलेल्या लोकांसाठी हे आसन उपयुक्त आहे. सायटिका असेल, पाठीत उसण असेल किंवा पाठीच्या कण्याच्या चकत्या सरकलेल्या असतील तर हे आसन लाभकारी आहे. या आसनाच्या सरावाने फुफ्फुसे सुदृढ होतात. ओटी पोटाच्या भागात रक्तपुरवठा वाढून पोटातले अवयव निरोगी होण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com