डॉक्‍टर-रुग्ण संबंधाची नवी दिशा

deshpande
deshpande

कोरोना महामारीची दहशत संपूर्ण जगभर पसरली आहे. "स्पॅनिश फ्लू'नंतर अशाप्रकारचे मोठे संकट विश्व अनेक वर्षांनंतर अनुभवत आहे. अदृश्‍य शत्रूशी युद्ध करताना पोलिस, सैन्य, सफाई कर्मचारी, प्रशासनाचे अधिकारी "कोरोना योद्धा' म्हणून सामाजिक बांधीलकी जपून आपली भूमिका निभावताहेत. मात्र, या सर्वांत डॉक्‍टरांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे.

कोरोना महामारीचा काळ सुरू आहे. ज्यावेळी सामूहिक संकट ओढवते, तेव्हा समाजातील सर्व घटक त्यावर मात करण्यासाठी एकत्र येत असतात. आतादेखील तसेच झाले आहे. मात्र, या दरम्यान अनेक ठिकाणी आपल्या सुरक्षेचा विचार न करता ज्यांनी स्वत:ला झोकून दिले त्याच डॉक्‍टरांवर शासन कडक कारवाई करण्याची धमकी देत आहे. कोरोनाबाधित रुग्ण असल्यास त्यांचे क्‍लिनिक, रुग्णालय सील केले जात आहेत. सोसायटीचे लोक कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी काही ठिकाणी त्यांना येऊ देत नाहीत, हे खरं तर दुर्दैवी आहे. त्यांच्यावर हल्ले होत आहेत, या पूर्वीदेखील असे हल्ले होत होते. त्याचे समर्थन अर्थातच करता येत नाही; पण कोरोना काळातही होणारे हल्ले ही अधिक चिंताजनक बाब आहे.

आसाममध्ये एका इस्पितळात डॉ. दत्ता निवृत्तीनंतरही स्वयंसेवक म्हणून वैद्यकीय सेवा देत होते. एकदा एक रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेत इस्पितळात आला. त्यावेळी डॉ. दत्ता इस्पितळात नव्हते. त्यांना येण्यास थोडा विलंब झाला. दरम्यान, त्या रुग्णाचे निधन झाले आणि त्याच्या नातेवाइकांचा व मित्रपरिवाराचा उद्रेक झाला. इस्पितळात तोडफोड तर केलीच; मात्र, डॉ. दत्तांवरही हल्ला केला. ते जखमी अवस्थेत उपचारासाठी विव्हळत होते. त्यांना नातेवाइकांनी उपचारासाठीही जाऊ दिले नाही. त्यातच डॉ. दत्तांना मृत्यूने गाठले. एक डॉक्‍टर स्वयंसेवक म्हणून वैद्यकीय सेवा प्रदान करीत असताना त्यास असा मृत्यू येणे, याहून दुर्दैव काय असेल? ही परिस्थिती प्रत्येक ठिकाणी नसली, तरी हे डॉक्‍टर आणि रुग्ण यांच्यातील बिघडलेल्या संबंधांचे प्रकटीकरणच होय.

पन्नासच्या दशकात तर डॉक्‍टर-रुग्ण संबंध अतिशय सलोख्याचे होते. डॉक्‍टर कुटुंबाचा घटकच होता. केवळ आरोग्यांसंबंधीच नव्हे, तर कुटुंबांच्या अन्य निर्णयांमध्ये त्याचा सल्ला घेतला जात असे, त्यांचा शब्द प्रमाण मानला जात असे. डॉक्‍टर खऱ्या अर्थाने मार्गदर्शक होता. त्या काळी डॉक्‍टर हे फॅमिली फिजिशियनच होते. आरोग्यासंबंधीच्या प्राथमिक समस्या, किरकोळ आणि अन्य आजारांवर तो उपचार आणि मार्गदर्शन करीत असे. डॉक्‍टरांनी केलेल्या औषधोपचारावर त्यांच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका-कुशंका नसे. हा काळ डॉक्‍टरांना खऱ्या अर्थाने देव मानण्याचा होता, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

...आणि परिस्थिती बदलली
कालांतराने ही परिस्थिती बदलली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशिवाय खासगी महाविद्यालयांचे पीक आले. त्यामुळे डॉक्‍टरांची संख्या वाढली. विज्ञानाच्या प्रगतीसोबतच विशेषज्ञ डॉक्‍टर्सही आलेत आणि त्यांच्याकडे जाण्याचा कल वाढू लागला. दरम्यान, जगालाच आधुनिकीकरण, शहरीकरण आणि व्यावसायिकतेची स्वप्ने पडू लागली. त्यामुळे फॅमिली डॉक्‍टर ही संकल्पना हळूहळू कमी होत जाऊन मोडकळीत निघाली. शेवटी वैद्यकीय व्यवसायातही चढाओढ सुरू झालीच. खासगीकरणानंतरच्या काळात तर खासगी रुग्णालयांनी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली. परिणामी मानवी भाव-भावनांचा विचारही कमी होऊ लागला.
फॅमिली डॉक्‍टर्स रुग्णांना परवडणाऱ्या दरात उपचार करीत असत. वेळ आली, तर स्वतःच्या खिशातून पैसे काढण्यास मागे-पुढे पाहत नसत. खासगी रुग्णालयांच्या वाढत्या संख्येबरोबरच उपचाराच्या किमतीही वाढू लागल्या. पर्यायाने रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाइकांच्या अपेक्षा वाढू लागल्या. अर्थात उपचारांसाठी किंमत मोजली असल्याने शंभर टक्के सकारात्मक परिणामच मिळावा, अशी अपेक्षा वाढली. मात्र, वैद्यकीय शास्त्राची मर्यादा आणि आजाराची गंभीरता या दोन बाबी आजारांचा उपचार करण्यात महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे अपेक्षा आणि वास्तविकता यामध्ये तफावत निर्माण झाली, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मात्र, यामुळे डॉक्‍टर आणि रुग्णांमधील संबंध कमालीचे ताणल्या गेले आणि त्यास तडा जाऊ लागला. असे म्हणता येईल की, डॉक्‍टर खात्री देऊ शकतो प्रयत्नांची. परिणामाची नव्हे. ही बाबच रुग्णांच्या विस्मृतीत गेली. उपचारादरम्यान नकारात्मक परिणाम स्वीकारण्याची मानसिकता नसल्यामुळे भावनांचा उद्रेक होऊन डॉक्‍टरांवर आणि त्यांच्या प्रतिष्ठानांवर हल्ले होणे सुरू झाले. ज्यावेळी रुग्णावर उपचार सुरू असतात त्यावेळी उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांवर पूर्ण विश्‍वास ठेवणे अतिशय गरजेचे असून, डॉक्‍टरांवर विश्‍वास ठेवण्यातच उपचाराचे रहस्य दडले आहे, ही गोष्ट नाकारता येत नाही. हा विश्‍वास कालांतराने कमी झाल्यानेही डॉक्‍टर व रुग्णांमधील संबंध खराब होऊ लागले.

सामाजिक घटक
डॉक्‍टर-रुग्ण संबंध एका दिवसात बिघडलेले नाहीत. मात्र, ही प्रक्रिया सुरू असताना समाजावर प्रभाव पाडणारे ओपेनियन मेकरदेखील चूप होते. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांनी या हल्ल्यांचे समर्थनदेखील केले. सोबतच डॉक्‍टरांना लुटारू, दरोडेखोर अशी विशेषणे लावण्यात धन्यता मानली.
नीतीमत्ता सोडून वागणारे सर्वच क्षेत्रांत असतात. काही मोजकी डॉक्‍टर मंडळी उपचारादरम्यान शोषण करीत असतील, त्याचे समर्थन कधीही केल्या जाऊ शकत नाही. मात्र, ही मूठभर डॉक्‍टर मंडळी एकूणच वैद्यकीय क्षेत्राला अपवाद आहेत. आजही डॉक्‍टर प्रामाणिकपणे आपले कार्य करीत असतात. अशावेळी समाजाने ते गंभीरपणे घेण्याची आणि पुनः एकदा संवाद प्रस्थापित करण्याची आवश्‍यकता आहे. सुसंवाद साधून त्यातून मार्ग काढून समाजाला योग्य दिशा देणे आवश्‍यक आहे.

स्टोरी ऑफ सोल्युशन
बिघडत्या डॉक्‍टर-रुग्ण संबंधांचा ऊहापोह आपण केला. मात्र, यावर उपायही आपल्यालाच शोधून काढायचे आहेत. अशावेळी रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाइकांनी वैद्यकीय क्षेत्रातील किचकटता आणि गुंतागूंत समजून घेतली पाहिजे. त्याचप्रकारे डॉक्‍टर जे औषधोपचार करीत आहेत, ज्या चाचण्या व परीक्षण करण्यास सांगत आहेत त्यावर विश्‍वास ठेवून परीक्षण करून घेतले पाहिजे. लवकर निदान आणि त्वरित उपचार, हे यशस्वी उपचाराचे गमक आहे. हे लक्षात घेतले, तर पुढील गुंतागुंत टाळता येईल.

वैद्यकीय क्षेत्राने आणि डॉक्‍टरांनीदेखील आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. एकेकाळी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक डॉक्‍टरांचा शब्द प्रमाण मानत असत. दरम्यान, असे काय झाले की, डॉक्‍टरांकडे संशयाच्या दृष्टीने बघीतले जाऊ लागले. त्यामुळे आत्मपरीक्षण अत्यावश्‍यकच आहे. सोबतच सामान्य डॉक्‍टर आणि कॉर्पोरेट हॉस्पिटल यांच्या दरम्यानचा फरक समजून घेणेदेखील आवश्‍यक आहे. कॉर्पोरेट हॉस्पिटल हे व्यवसाय म्हणून चालवण्यात येतात. सोबत तेथे संसाधने अधिक आहेत. त्यामुळे होणाऱ्या खर्चाची तुलना सामान्य नर्सिंग होमशी करता येणार नाही. त्यामुळे येथे जाण्यापूर्वी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी विवेकी विचार करणे आवश्‍यक आहे. शिवाय डॉक्‍टरी हा व्यवसाय नसून ही सेवा आहे, हे भान ठेवणेदेखील तेवढेच आवश्‍यक आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी आपली तुलना अन्य व्यवसायिकांशी करू नये; कारण अशी तुलना होणे शक्‍यच नाही.

आधुनिकतेच्या काळात सुसंवाद कमी झाला आहे. हा संवाद पुनःस्थापित होणे गरजेचे आहे. शिवाय उपचारादरम्यान पारदर्शकताही तितकीच महत्त्वाची आहे, याची जाणीव डॉक्‍टरांनी ठेवावी. शेवटी असे सांगावेसे वाटते की, बदललेली परिस्थिती आणि वैद्यकीय क्षेत्रातील किचकटता समजून रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाइकांनी डॉक्‍टरांवर विश्‍वास ठेवून उपचार करवून घेतल्यास डॉक्‍टरांवर हल्ले होणार नाही आणि त्यांना सर्वोत्कृष्ट उपचार मिळू शकतील. पर्यायाने डॉक्‍टर आणि रुग्णांचे पवित्र नाते पुन्हा प्रस्थापित होईल व नव्या दिशेने वाटचाल करेल.

का वाढताहेत गैरसमज
रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक वैद्यकीय समस्येबद्दल गुगलच्या माध्यमातून माहिती घेतात आणि त्यामुळे उपचारादरम्यान त्यांच्या मनात डॉक्‍टरांबद्दल संशय निर्माण होतो. पूर्वग्रहदूषित असेल, तर डॉक्‍टरांनी सांगितलेल्या चाचण्या आणि परीक्षण याबद्दलही संशय घेतल्या जातो. त्यामुळे गैरसमज वाढत आहेत. हेदेखील संबंध खराब होण्याचे एक महत्त्वाचे कारण होय.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com