esakal | आई होण्याचा मंतरलेला नऊ महिन्यांचा काळ
sakal

बोलून बातमी शोधा

pregnancy.

गर्भसंस्काराबरोबरच गर्भवतीच्या तब्येतीची काळजी, वैद्यकीय-प्रसूतीविषयी, बाळाविषयी माहिती अशा विविध विषयांचे तिला ज्ञान मिळणे आवश्‍यक आहे. असा हा शास्त्रोक्त संस्कार घडत जातो आणि गर्भवतीला हे संस्कार देता देताच या संस्काराची मुहूर्तमेढ आपोआपच गर्भावर, बाळावर रुजवली जाते. वैद्यकीय ज्ञान व गर्भसंस्कार यांची सांगड कशी घालायची?

आई होण्याचा मंतरलेला नऊ महिन्यांचा काळ

sakal_logo
By
डॉ. सुषमा देशमुख

दोन-तीन वर्षांपूर्वी आमच्या गर्भसंस्कार केंद्राचा दहावा वार्षिक कार्यक्रम होता. दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वैद्यकीय संस्कार गर्भवतीवर रुजवण्याचा प्रयत्न करतो. यावेळी ठरवले आपल्या दहा वर्षांतील गर्भसंस्कारित बालक व आईवडिलांचा मेळावा घेऊ. या कार्यक्रमाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि आमची चमू बालकांचा उत्कृष्ट सहभाग पाहून अचंबित झाली.

वैद्यकीय गर्भसंस्कार म्हणजे काय?
वैद्यकीय व्यवसायात, विशेषतः स्त्री आरोग्य शास्त्रात प्रत्येक ठिकाणी चांगली सुरुवात गर्भवती स्त्रीपासून होते. कारण तिच्या मार्फतच एक नवी पिढी उदयास येत असते.
आता बघूया संस्कार म्हणजे काय? संस्कार म्हणजे पूजा करणे, शिक्षण देणे किंवा विविध क्रियांनी पदार्थात नवा गुण विकसित करणे. यामध्ये पहिला संस्कार हा खुद्द गर्भवतीवर होतो. हा संस्कार कुठल्याही धर्माशी निगडित नाही. हा संस्कार मानवतावादी आहे. हा फक्त गर्भ व गर्भवती स्त्रीसाठी नाही तर पूर्ण कुटुंबासाठी आहे. असे हे वैद्यकीय, आध्यात्मिक, बौद्धिक, सामाजिक, भावनिक, कौटुंबिक, योग प्राणायाम, सकारात्मक संस्कार आहेत.

गर्भसंस्काराबरोबरच गर्भवतीच्या तब्येतीची काळजी, वैद्यकीय-प्रसूतीविषयी, बाळाविषयी माहिती अशा विविध विषयांचे तिला ज्ञान मिळणे आवश्‍यक आहे. असा हा शास्त्रोक्त संस्कार घडत जातो आणि गर्भवतीला हे संस्कार देता देताच या संस्काराची मुहूर्तमेढ आपोआपच गर्भावर, बाळावर रुजवली जाते. वैद्यकीय ज्ञान व गर्भसंस्कार यांची सांगड कशी घालायची?

गर्भवतीला सज्ञान करणे, गर्भावस्थेचे वैद्यकीय ज्ञान गर्भवती स्त्रियांना प्रसूतीपूर्व काळजी, प्रसूतीची तयारी, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरचा आहार, स्तनपान, Dos and Don'ts in pregnancy म्हणजे थोडक्‍यात गैरसमजुती यावर विशेष लक्ष देणे जरूरी आहे. होणाऱ्या बाळाविषयी माहिती. याविषयी गर्भवतीला शास्त्रशुद्ध माहिती मिळाली तर ती आपल्या होणाऱ्या बाळाची एखाद्या डॉक्‍टरप्रमाणे काळजी घेईल व पुढेही त्याची निकोपदृष्टीने वाढ होईल.

योग प्राणायाम व व्यायाम
प्रत्येक गर्भवती स्त्रीचे प्रश्न, त्रास वेगवेगळे असतात. त्यात कुटुंबकलह, नोकरीतील ताणतणाव, जबाबदाऱ्या असे बरेच प्रश्‍न असतात. त्यामुळे सर्वप्रथम गर्भवती स्त्रीचे चित्तं शांत असणे यासाठी तिने गायत्री मंत्र, ओंकार, प्राणायाम केले तर त्याचा तिला तिहेरी फायदा होईल. सकाळची सूर्याची कोवळी किरणे अंगावर घेऊन जर गायत्री मंत्र म्हटला तर नकळत गर्भवतीची मानसिक शक्ती वाढते, आत्मबळ वाढतं, गायत्री मंत्र म्हणताना स्वाभाविक प्राणायाम होतो व फुप्फुसांची क्षमता वाढते. अंगावर सूर्याची कोवळी किरणे घेतली तर Vit. D मिळून हाडे बळकट होतात. गायत्री मंत्र ओंकारात विलीन होतो. म्हणून गायत्री मंत्रानंतर ओंकार करावा. ओंकाराबरोबरच आपला नैसर्गिक प्राणायाम होतो. ओंकार करताना त्याच्या ध्वनी लहरींमुळे मातेवर व गर्भावर चांगला परिणाम दिसून येतो, मन शांत होते. डिप्रेशन कमी होते.
प्राणायामामुळे फुप्फुसांची प्राणवायू संचित करण्याची ताकद वाढते.

गर्भसंस्कार
गर्भवतीची काळजी हा जर पाया असेल तर गर्भावर योग्य संस्कार करणे हा त्याचा कळस आहे. हा संस्काराचा खजिना गर्भातच बाळाला मिळतो. गर्भासाठी, बाळासाठी ही एक अनमोल भेट आहे, जी त्याला आयुष्यभर उपयोगी पडेल.

आध्यात्मिक व बौद्धिक संस्कार
यासाठी आईने कथा, श्‍लोक किंवा गायत्री मंत्र, ओंकार अशा अनेक गोष्टींचा पाठपुरावा करावा. अशा अनेक गोष्टींनी गर्भवती प्रसन्न तर राहतेच पण बाळात हे संस्कार आपोआपच रुजले जातात .

भावनिक संस्कार
बाळाशी बोलताना अतिशय प्रेमळपणे, हळुवारपणे बोलावे. घरातल्या तसेच सहवासात येणाऱ्या लोकांशी पण चांगल्या तऱ्हेने बोलावे.

सामाजिक संस्कार
यासाठी वेगवेगळे सांस्कृतिक समारंभ, सण या सर्वांमध्ये भाग घेणे अतिशय आवश्‍यक आहे. उदा. पूर्वापार चालत आलेले डोहाळ जेवण हा त्यातलाच प्रकार आहे. यामुळे होणारे बाळ निःसंशय संगीतप्रिय, धीट होते.

नैतिक संस्कार
आईच्या पवित्र व चांगल्या आचरणामुळे बाळात नैतिकता आपोआपच येते. या सर्व संस्कारांमुळे गर्भातील बाळ व आईचं एक अलौकिक नातं तयार होईल हेच तत्त्व womb talking / साद प्रतिसादमध्ये उपयोगी पडते. या सर्व गोष्टींमुळे नकळत गर्भवती स्त्री स्वतःविषयी व होणाऱ्या बाळाविषयी जागरूक होते. मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम होते. आणि हे कोणीही कबूल करेल की, गर्भवती स्त्री जर निरोगी व आनंदी असेल तर होणारे बाळसुद्धा सुदृढ व चांगले होते. यामध्ये गर्भवती स्त्रीच नाही तर होणारे बाबा, कुटुंबसुद्धा गुंतलेलं असतं हीच आम्ही जे वर्ग घेतो त्याची जमेची बाजू आहे.

आमच्या ग्रुपच्या बालरोगतज्ज्ञ डॉ. स्मिता देसाई यांनी याचा खूप सुंदर अभ्यास केला आहे. त्यांनी तीन ग्रुप बनवले.

  • वैद्यकीय ज्ञान + गर्भसंस्कार काहीही न केलेले 
  • फक्त गर्भसंस्कार
  •  वैद्यकीय ज्ञान + गर्भसंस्कार केलेले

यामध्ये जी आई वैद्यकीय ज्ञान + गर्भसंस्कार या गटात होती, तिच्यामध्ये व तिच्या बाळामध्ये जास्त चांगला परिणाम दिसून आला. स्त्रीरोगतज्ज्ञ व बालरोगतज्ज्ञ यांच्या दृष्टिकोनातून माता व बाळ दोघेही निरोगी व आनंदी आहेत. तसेच बाळाच्या बाबांचे, कुटुंबाचेही यामध्ये खूप मोठे योगदान आहे. तसेच आम्ही पेशंटना नेहमी सांगतो, ईश्वराची, निसर्गाची सर्वश्रेष्ठ व अप्रतिम कलाकृती म्हणजे हे छोटंसं बाळ. त्याला घडवायला, संस्कारित करायला तुमच्या उदरात दिलंय.

थोडक्‍यात
"आई शारीरिक, मानसिकदृष्ट्या निरोगी असावी. "देवपूजा, ध्यान करणे, श्‍लोक म्हणणे "निसर्गाच्या सान्निध्यात राहावे. उदा. झाडांना पाणी घालणे "चांगली पुस्तके, ग्रंथ वाचावे व रोज नवीन वाचन करावे' कधी कधी विणकाम करावे, चांगली गाणी ऐकावी' बाळाशी सहवासातील इतर लोकांशी हळुवारपणे व प्रेमाने बोलावे, चांगले सिनेमे, मालिका बघू शकता, सकारात्मक विचार करावा व अशीच कामे करावी. साधारणपणे बाळाला स्पर्शाची, श्रवणाची संवेदना सहाव्या सातव्या महिन्यापर्यंत येते, याची जाणीव असावी. "स्वत:चे मन सुंदर करावे, चांगले वाचा, पाहा, बोला, ऐका.

असे हे जतन केलेले सोनेरी क्षण! असा हा मंतरलेला नऊ महिन्यांचा काळ
असे हे संस्कारक्षम, निरोगी गर्भवती स्त्रीचे क्षण
आणि तुमचे सुदृढ गर्भसंस्कारित बाळ
राहील ही आनंदी व फलदायी पालकत्वाकडे वाटचाल