ORS जलसंजीवनी आहे डायरियासाठी आरोग्यवर्धक पेय

ORS_Ghol
ORS_Ghol
Updated on

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) म्हणण्यानुसार जगात दुसऱ्या क्रमांकाने 5 वर्षाच्या आतील लहान मुलं ही अतिसारामुळे (जुलाब) दगावत असतात. आणि भारतासारख्या देशात याची संख्या तर जास्तच आहे. अतिसार/ जुलाब - उलट्या होण्याची मुख्य कारण पोटामध्ये विषाणू-जिवाणू जाणे! त्या जंतूंशी लढताना, शरीरातून त्या जंतूंना मलाद्वारे, उलटीद्वारे बाहेर काढण्याचा प्रयत्न होतो. त्यामध्ये पाणी आणि क्षार भरपूर प्रमाणात शहराबाहेर फेकल्या जातात. म्हणजेच जुलाब होय.

यात अस्वच्छता, दूषित पाणी, बाळाने अजाणतेपणी तोंडात घातलेल्या अस्वच्छ वस्तू, इतक्‍या तान्ह्या बाळाला खेळण्यासाठी देण्यात येणारी खेळणी या वस्तूमधील बॅक्‍टेरीया (जिवाणू) व्हायरस (विषाणू) तोंडाद्वारे पोटात शिरतात. आणि ती न दिसणारी घाण पोटात गेल्यावर जुलाब आणि उलट्या होतात. यात कधीकधी बाळाचा मृत्यूही होऊ शकतो.

स्तनपानाऐवजी बाटलीने दुध पाजणे हे ही बाळाला अतिसार होण्याचे महत्वाचे कारण आहे. आपल्याकडे काही मातांचा असा समज आहे की, दात येत असल्यामुळे बाळाला असे होत असते. त्यामुळे एक तर त्याच्याकडे "होईल बरं" असं म्हणून दुर्लक्ष केलं जातं किंवा दात येण्यासाठी "औषध" दिली जातात. पण खरं म्हणजे दात येण्याचा व जुलाबाचा काहीच संबंध नसतो. अशा जुलाबामुळे शरीरातील पाणी, क्षार बाहेर पडत असल्यामुळे बाळासाठी सर्वात आवश्‍यक असते क्षार आणि पाणी... आणि Oral Rehydration solution (ORS) किंवा जलसंजीवनीमध्येही पाणी , साखर, मीठ यांचे प्रभावी प्रमाणात मिश्रण असते. त्यामुळेच जलसंजीवनी हे काम उत्तम प्रकारे करू शकते! जर जुलाब-उलटी होत असतानाच बाळाला ORS चे पाणी पाजायला सुरवात केली तर बाळाचे जुलाब तर थांबतातच, पण आपण बाळाला मृत्यूपासूनसुद्धा वाचवू शकतो. तेव्हा याविषयी जनतेने दक्ष व जागरूक आणि सज्ञानी राहायला हवे.

या दृष्टीने दरवर्षी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात (25 ते 31 जुलै) ORS सप्ताह जगभरात साजरा केला जातो, तसेच 29 जुलै हा ORS दिन म्हणून साजरा होतो. भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनाही आपल्या विविध शाखांच्या मार्फत या सप्ताहानिमित्त ORS week जन जागृती अभियानांतर्गत अनेक उपक्रम हाती घेत असते. वैयक्तिक पातळीवर आपापल्या दवाखान्यात येणाऱ्या सर्व पालकांना बालरोगतज्ज्ञ, ORS चे फायदे, ते कसे तयार करायचे, कसे पाजायचे याची प्रात्यक्षिकं दाखवून जनजागृती करतात. अतिसार, इतर पाण्यामुळे होणारे रोग याविषयी पोस्टर, रांगोळी, तख्ते याद्वारे माहिती दिली जाते.

यावेळी कोरोना प्रादुर्भावामुळे सार्वजनिक कार्यक्रम शक्‍य नाही... नाहीतर दरवर्षी खेडोपाडी छोट्या सभा, रॅली घेऊन प्रत्यक्ष माहिती देणे, ध्वनिक्षेपीत माहिती प्रसारित करणे, आकाशवाणी, दूरदर्शनवर मुलाखती देऊन ORS ही पाकिटातील पावडर किंवा घरच्याघरी साखर, मीठ, पाणी यापासून कशी तयार करता येते ही सर्व माहिती संघटनेचे सदस्य देत असतात. सर्व भाषिक वर्तमानपत्रातही ORS ची पूर्ण माहिती देणारे सविस्तर लेख प्रकाशित केल्या जातात. आपण पाहिलंच आहे की ORS हे मुख्यत्वे बाळाच्या डिहायड्रेशन(शरीरात पाणी व क्षार कमी होणे) ची समस्या दूर करण्यासाठी दिल्या जाते. आता या जलसंजीवनीविषयी थोडं जाणून घेऊ या.

WHO ORS चे छोटे, मोठे पाकीट सर्व सरकारी दवाखान्यात मोफत उपलब्ध असतात.र्‌ सी, मेडिकल स्टोर्स मधूनही सहज मिळतात. एक ग्लास (200ml) उकळून घेतलेल्या पाण्यात 1 छोटे पाकीट आणि 5 glass (1लिटर) पाण्यात 1 मोठे पाकीट टाकून नीट विरघळून घ्यावे. साधारणपणे जुलाबात निघालेल्या पाण्याच्या प्रमाणात... छोट्या बाळास चमचा चमचा पाजावे. मोठया मुलांना पाव ते अर्ध्या कप पाणी कपाने किंवा ग्लासने देत राहावे. पाकीट उपलब्ध नसल्यास हे मिश्रण घरी ही तयार करता येते.

एक लिटर स्वच्छ पिण्याच्या पाण्यात सहा चमचे साखर व अर्धा चमचा मीठ टाकून मिश्रण बनवावे . त्याची चव अ एवढी खारट असायला हवी . साखर जास्त झाली तर डायरिया वाढू शकतो. मीठ जास्त झाल्यास बाळ ते पिऊ शकत नाही. तेंव्हा प्रमाण काटेकोर असावे.

ORS ची पावडर फक्त स्वच्छ पाण्यातच मिसळावी . दूध , सूप , फळांचा रस यामध्ये मिसळू नये किंवा त्यात अजून साखर-ग्लूकोज मिसळू नये . तीन ते चार वेळा पातळ संडास झाल्यास ओ आर एस चे पाणी पाजणे सुरू करावे. मात्र आपल्या बाळाला दिवसातून पाच ते सहा वेळांपेक्षा कमी लघवी होत असल्यास , खूप जास्त उलट्या होत असल्यास , खूप चिडचिड करीत असल्यास, सुस्त पडल्यास , डोळे व टाळू खूप आत गेल्यासारखे दिसत असल्यास, जीभ कोरडी पडली असल्यास, झटके आल्यास त्वरित डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. ORS चे पाकीट नेहमी घरात हाताशी ठेवावे. अशी ही जीवन दायिनी जल संजीवनी सर्वांना केव्हाही उपयुक्त ठरू शकते.

यावर्षीचे जन जागृती सप्ताहाचे घोषवाक्‍य आहे ORS आहे डायरियासाठी आरोग्यवर्धक पेय. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com