आजारातून बरे होण्याची संपूर्ण यंत्रणा आपल्या शरीरातच! जाणून घ्या कोविड रुग्णांसाठी प्राणायाम

pranayam.j
pranayam.j

श्वास घेणे ही एक कला आहे. श्वास प्रक्रियेचं नियमन म्हणजे प्राणायाम हे योगशास्त्राचं अत्यंत महत्वपूर्ण अंग आहे. खरं तर श्वास हे एक आश्चर्यकारक औषध आहे असं देखील म्हणता येईल. सध्या सर्वांचे जीवन व्यापून टाकणाऱ्या कोविड आजाराने आता घराघरात प्रवेश केला आहे. समाधानाची बाब अशी, की यातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढते आहे. मात्र यातून बरे होताना आणि नंतरही अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या रुग्णांना भेडसावत असतात. या दरम्यान अनेक टप्प्यांवर योग आणि विशेषतः प्राणायाम अतिशय प्रभावी ठरू शकतो.

प्राणायामाचे लाभ
कोरोनापासून बचावासाठी, ज्येष्ठ नागरिक, मधुमेह आणि इतर श्वसनमार्गाचे आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी विशेष काळजी म्हणून तसेच लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना प्राणायामाचा अतिशय लाभ होऊ शकतो. प्राणायामाने आजाराची तीव्रता आणि थकवा इत्यादी शारीरिक परिणाम कमी करता येतात. झालेल्या संक्रमणाशी लढण्यासाठी शरीरातील अंतर्गत सुरक्षाप्रणाली यामुळे कार्यान्वित होते. श्वसन संस्थेचे कार्य सुधारते आणि फुफ्फुसांची क्षमता वाढते. महत्वाचं म्हणजे विलगीकरणामुळे उद्भवणाऱ्या चिंता, काळजी, मानसिक तणाव आणि नैराश्य दूर करून मन शांत ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो.

काळजी आणि सुरक्षितता
कोविड रुग्णांनी प्राणायाम सुरू करण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणे अतिशय गरजेचे आहे. या आजारात फुफ्फुसांची क्षमता कमी होणे, श्वास घेण्यास अडचण, सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, थकवा, यासारखी अनेक लक्षणे असू शकतात. ताप असताना, श्वास घेताना त्रास होत असल्यास, छातीत धडधड, वेदना किंवा तातडीच्या उपचारांची गरज असणारी तीव्र स्वरुपाची लक्षणे असताना प्राणायाम करू नये. प्राणायाम करताना गरगरल्यासारखे वाटल्यास, खूप थकवा असल्यास किंवा श्वास भरून येत असल्यास लगेच थांबावे आणि विश्रांती घ्यावी.


कोविड रुग्णांनी कोणते प्राणायाम करावेत?
कोरोना संक्रमणातून बरे होताना प्राणायाम करण्याचा मुख्य उद्देश शरीराची प्राणशक्ती वाढवणे हा असतो. खाली दिल्याप्रमाणे काही सोपे प्राणायाम वैद्यकीय सल्ला घेऊन योग प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनात करता येतील.

हळुवार श्वसन
श्वास घेताना चहाचा घोट घेतल्याप्रमाणे अंदाजे तीन सेकंद श्वास आत घ्या आणि हळुवारपणे सोडा. श्वास अगदी संथ, लयबद्ध आणि मोरपिसासारखा अलगद घ्या. नुकत्याच झालेल्या जागतिक योग चिकित्सा शिखर परिषदेत रॉबिन रोथेरबर्ग यांनी कोविड रुग्णांनी कसा श्वास घ्यावा याबद्दल माहिती दिली. त्यांनी सुचवल्याप्रमाणे “गौतम बुद्ध कसा श्वास घेत असतील, त्याप्रमाणे श्वास घ्या.”

उदरीय श्वसन
श्वास घेताना आणि सोडताना पोटाचा भाग हळूहळू वरखाली होईल अशा पद्धतीने श्वसन करा. हे श्वसन कोणत्याही आरामदायक स्थितीत किंवा झोपूनही करता येते पण आधार न घेता जास्त वेळ पाठीवर झोपून राहिल्यास फुफ्फुसांना इजा होऊ शकते. त्यामुळे पाठीला आधार देऊन टेकून बसलेल्या अवस्थेत, डाव्या किंवा उजव्या कुशीवर, किंवा पोटावर झोपून मकरासनात उदरीय श्वसन करता येईल.

बहिर्कुम्भक: श्वास सोडल्यावर रोखून ठेवणे
हळुवार श्वास घेतल्यावर संथ गतीने श्वास सोडून दोन ते तीन सेकंदपर्यंत रोखून ठेवा. यामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात आणि मेंदूंसह सर्व अवयवांना रक्तपुरवठा वाढतो. शरीरातील प्राणवायूचे प्रमाण (ऑक्सिजन सॅच्युरेशन) वाढते. झोप चांगली लागते. दिवसभरात अनेक वेळा हा सोपा श्वसनप्रकार करता येतो. मात्र उच्च रक्तदाब, हृदयविकार असल्यास किंवा लहान मुलांनी श्वास रोखून ठेऊ नये.

श्वासांबद्दल जागरूकता
हवेचा स्पर्श नाकाजवळ अनुभवणे, हवेचा प्रवाह नाकाच्या आत जाताना आणि बाहेर येताना त्याकडे लक्ष देणे, हवेचे तापमान थंड आहे की उबदार हे बघणे म्हणजेच सजगता. ध्यान करताना देखील या सजगतेचा (माइंडफुलनेस) समावेश करता येतो. यामुळे मानसिक तणाव लगेच कमी होतो.

भ्रामरी प्राणायाम
हळुवार श्वास घेऊन तो सोडताना भ्रमरासारखे गुंजन करीत श्वास सोडा. यात निर्माण होणारी कंपने श्वसनसंस्थेला स्वच्छ करतात, विषाणू आणि जिवाणूंपासून संरक्षण करतात आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवतात. थकवा घालवण्यासाठी, ऊर्जा वाढवण्यासाठी, शांत झोपेसाठी आणि नकारात्मक विचार कमी करण्यासाठी भ्रामरी फार उपयोगी आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार कोविड रुग्णांसाठी भ्रामरी प्राणायाम अतिशय उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे शरीरातील नायट्रिक ऑक्साईडची निर्मिती साधारण श्वासाच्या तुलनेत पंधरा पटींनी वाढते. त्यामुळे श्वसनाशी संबंधित अनेक त्रास कमी होतात आणि व्हेंटिलेटरची गरज कमी होते असेही आढळून आले आहे.

अनुलोम विलोम प्राणायाम
यामुळे शरीरातील प्राणऊर्जा वाहून नेणाऱ्या नाडींमधील ब्लॉकेजेस दूर होतात आणि प्राणशक्तीचा प्रवाह वाढतो. यामुळे चिंता, तणाव कमी होऊन मन शांत होते.

काय करू नये
जलद गतीने, वेगाने, तोंडाने, धापा टाकत, जोरजोरात श्वास घेणे टाळावे. आपण घेत असलेल्या श्वासांचा आवाज जर आपल्याला येत असेल तर तेदेखील जास्त आहे असे समजायला हरकत नाही. या प्रकारे श्वास घेण्याचा एक तर काही उपयोग होत नाही. उलट त्यामुळे चिंता, थकवा वाढून शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. कोविड रुग्णांनी पूर्ण बरे होईपर्यंत भस्त्रिका, कपालभाती यासारखे जलद श्वासोच्छ्वासाचे प्रकार करू नयेत. आधीच संक्रमित झालेल्या श्वसनमार्गाला यामुळे इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे श्वास घेण्यास अडचण, थकवा, चिंता इत्यादी त्रास होऊ शकतात. उच्च रक्तदाब, हृदयविकार, पोटातील अल्सर, हर्निया असलेल्यांनी पूर्ण बरे झाल्यावरही हे प्राणायाम टाळावेत.

असं म्हणतात की आजारातून बरे होण्याची संपूर्ण यंत्रणा आपल्या शरीरातच असते. आपल्या श्वासांशी जोडल्या जाणे हे आरोग्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाउल ठरू शकते.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com