esakal | साखर असूनही कसे राहतात प्रशांत दामले फिट अँड फाइन
sakal

बोलून बातमी शोधा

prashant-damle

नियमित औषधे, मनाला ताजेतवाने ठेवणे, रोजच्या रोज मनातील किल्मिषं दूर करणे आणि व्यायामाला दांडी न मारण्यानं साखर असूनही फिट अँड फाइन राहतो, असे मत प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. निमित्त होते डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडियाच्या पुणे शाखेने मधुमेह दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे. यानिमित्ताने प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी प्रशांत दामले यांची ‘मधुमेहासमवेत हसत खेळत एक सकाळ’ या कार्यक्रमाअंतर्गत मुलाखत घेतली.

साखर असूनही कसे राहतात प्रशांत दामले फिट अँड फाइन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - नियमित औषधे, मनाला ताजेतवाने ठेवणे, रोजच्या रोज मनातील किल्मिषं दूर करणे आणि व्यायामाला दांडी न मारण्यानं साखर असूनही फिट अँड फाइन राहतो, असे मत प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. निमित्त होते डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडियाच्या पुणे शाखेने मधुमेह दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे. यानिमित्ताने प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी प्रशांत दामले यांची ‘मधुमेहासमवेत हसत खेळत एक सकाळ’ या कार्यक्रमाअंतर्गत मुलाखत घेतली.

कार्यक्रमाला असोसिएशनचे कार्यवाह डॉ. रमेश गोडबोले, सहकार्यवाह डॉ. भास्कर हर्षे, असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. जगमोहन तळवलकर, कार्यकारिणी सदस्य सतीश राजपाठक, परिक्षित देवल हे उपस्थित होते. डॉ. गोडबोले यांच्या हस्ते सुधीर गाडगीळ यांचा सत्कार करण्यात आला, तर डॉ. तळवलकर यांच्या हस्ते अभिनेते प्रशांत दामले यांचा सत्कार करण्यात आला.  

मलाही मधुमेह आहे. जीवनशैली धकाधकीची आहे, तरीही नियमित व्यायाम, नियंत्रित पण मनाजोगता आहार, ताणतणावाचे व्यवस्थापन आणि महत्त्वाचे म्हणजे दररोज रात्री मनाविरुद्धच्या घटना हद्दपार करतो अन्‌ आनंदी राहतो, अशा शब्दांत त्यांनी फिटनेसचे रहस्य सांगितले.

सुधीर गाडगीळांशी गप्पा मारताना आपला जीवनपट उलगडून सांगितला. नोकरी, नाटक आणि चित्रपटातील भूमिका करताना यशोशिखरे गाठली. प्रत्येकाकडून शिकत गेलो. राजा परांजपे, शरद तळवलकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी यांच्याकडून खूप शिकलो. नाटकानं पेशन्स ठेवायला शिकविले. दुसऱ्याच्या चुकांवर बोट न ठेवता सांभाळून घेऊन पुढे जायला शिकलो. हेच यशाचे गमक आहे, असे दामले म्हणाले.

सुरवातीला प्रास्ताविकात डॉ. भास्कर हर्षे यांनी, मधुमेहाची व्याप्ती सर्व वयोगटात वाढत आहे. विविध पाहणीत ते स्पष्ट होत आहे. हे लक्षात घेऊन गोयल बंधूंच्या सहकार्याने संशोधन प्रकल्प राबवणार आहोत. त्याला मदत करावी, असे आवाहनही केले. अर्चना रायरीकर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. अमित वाळींबे यांनी आभार मानले.

loading image