esakal | गुंतागुंतीचे गर्भारपण व बेडरेस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

pregnancy

सध्याच्या संगणक युगातील मुलींना गर्भारपणात खुप त्रास होतो. कारण गर्भारपणाबरोबर करियर ( अनियमित तास) व घर तसेच अशी तारेवरची कसरत चालू असते. तसेच वेळ नसल्यामुळे पौष्टिक आहार पुरेसा मिळत नाही. कामाच्या जबाबदाऱ्यांमुळे मानसिक तणाव वाढतो. अशा वेळेला हा तणाव कमी करून सकस आहाराबरोबरच योग प्राणायामची जोड असावी.

गुंतागुंतीचे गर्भारपण व बेडरेस्ट

sakal_logo
By
डॉ. सुषमा देशमुख

रश्‍मीला खुप प्रयत्नानंतर गर्भधारणा झाली होती. ती व तिचे पती अमोल अगदी आनंदात होते. अचानक तिसऱ्या महिन्यात थोडासा रक्तस्त्राव झाला. आज तिच्याबरोबर घरातील सगळे आले होते. सोनोग्राफी केल्यावर लक्षात आले की गर्भ व्यवस्थित आहे. . पण थोडा रक्तस्त्राव होताच. याला आम्ही Threatened abortion म्हणतो. तसेच सोनोग्राफीत त्याच्या एका बाजूला रक्ताची गाठ (Haematoma) दिसली. तिला अँडमिट करून उपचार चालू केले. जवळपास पाच दिवस ती अँडमिट होती. रोज थोडा किंवा जास्त रक्तस्त्राव जायचा. सोनोग्राफीने लक्ष देत बऱ्याच उपचारानंतर रक्तस्त्राव कमी झाला. यामध्ये खुप काळजी घ्यावी लागते. औषधं, इन्जेक्‍शनस्‌ या व्यतिरिक्त महत्त्वाचं म्हणजे पूर्ण विश्रांती म्हणजेच बेड रेस्ट.
आजकाल आम्हाला बऱ्याच पेशंटस्ना बेड रेस्ट सांगावी लागते. याचं प्रमाण का वाढलं आहे. गर्भारपण एवढं गुंतागुंतीचं का झालंय?

मातेची शारिरीक ठेवण व वजन. उदा. कमी उंचीची माता, पाठीच्या कण्याचे विकार, जास्त किंवा कमी वजनाची माता. या सर्व कारणांमुळे बाळास धोका असू शकतो.
मातेला पूर्वीपासूनच असलेले त्रास किंवा आजार, तसेच गर्भारपणामुळे उद्भवलेले आजार उदा. मातेस आधीपासूनच मधुमेह, रक्तदाब, दमा, थायरॉईड, हृदयाचे विकार असणे किंवा काही मातांना लग्न होण्याच्या आधीपासूनच पंडुरोग (Anaemia रक्तात लोहाचा अभाव) असतो. आपल्या भारतामध्ये Anaemia हा सर्वत्र आढळतो.
काही कारणाने गर्भवती स्त्रीच्या योनीमार्गातून रक्तस्त्राव होणे. रक्तस्त्राव होण्याची वेगवेगळी कारणे आहेत आणि ज्या महिन्यात हा त्रास होतो त्याप्रमाणे त्याचे निदान होते.

अ) पहिल्या तीन महिन्यात रक्तस्त्राव होण्याची कारणे :
* बऱ्याचदा, गर्भधारणा झाल्यावर जेव्हा गर्भ गर्भाशयात रूजतो तेव्हा थोडा रक्तस्त्राव ६ ते १२ दिवसांनी होऊ शकतो. (Implantation bleeding)
* Threatened abortion ज्यामध्ये गर्भपात होण्याची सतत भीती असते.
* कधी हार्मोन्सच्या कमतरतेमुळे रक्तस्त्राव होतो.
* कधी गर्भात दोष असतो. त्यावेळी गर्भाची वाढच होत नाही (Missed abortion)यामध्ये गर्भ काढून टाकावा लागतो.
* कधी गर्भ हा गर्भनलिकेत असतो तर कधी द्राक्ष गर्भ असतो.
* काहीवेळा गर्भाशयात गाठी आढळतात.

ब) तीन महिन्यानंतर रक्तस्त्राव होण्याची कारणे
* Placenta praevia जेव्हा placenta हा गर्भाशयाच्या खालच्या बाजूला असतो
* हार्मोन्सच्या कमतरता
* वर (प्लॅसेंटा) आधीच जागेपासून सुटणे इतर अनेक कारणे.
. अचानक खुप वजन वाढणे, हातापायांवर खुप सूज येणे : अशा स्त्रीयांना आरामाची खुप गरज असते. कारण जर योग्य काळजी घेतली नाही तर रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे आई व बाळ दोघांच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो.
. आधीच्या गर्भारपणात जर गर्भपात झाला असेल, तर चालू गर्भारपणात परत तसेच होण्याची शक्‍यता वाढते.

आधीच्या बाळंतपणात सतत काही कारणाने बऱ्याचवेळा गर्भपात झाला असेल किंवा वेळेआधी मूल दगावले असेल किंवा बाळंतपणात पूर्ण दिवसांचे मूल दगावले असेल तर अशा पेशंटस्ची आम्ही विशेष काळजी घेतो अशा पेशंटस्च्या त्रासांना आम्ही वैद्यकीय भाषेत Bad obstetric History म्हणतो किंवा त्यालाच आजकाल Recurrent pregnancy loss म्हणतात.
. High risk pregnancy (जोखमीचे गर्भारपण) जेव्हा काही विशेष आजार गर्भारपणात होतात. (उदा. जुळे असणारे गर्भारपण, गर्भजल जास्त प्रमाणात वाढणे, रक्तदाब वाढणे) किंवा काही धोक्‍याच्या आजारांमध्ये गर्भ राहतो. अशाप्रकारच्या गर्भारपणात आई व बाळ दोघांनाही धोका असतो.
 होणारे बाळ अशक्त असणे (Intra uterine growth retardation) या आजाराचे आपण सोनोग्राफीने निदान करू शकतो. जेव्हा स्त्रियांची नियमित तपासणी चालू असते, तेव्हा तपासतांना जाणवते की, बाळाची वाढ ही बरोबर होत नाहीय. सोनोग्राफीद्वारे मग आम्ही याचे निदान निश्‍चित करतो. यामध्ये मग डॉपलर सोनोग्राफीने आम्ही बाळाला आईपासून मिळणारा रक्तपुरवठा पुरेसा आहे का? ते तपासतो. अशाप्रकारच्या केसेसमध्ये स्त्रियांची खुप काळजी घ्यावी लागते. बाळाचीही वारंवार तपासणी करावी लागते.

कधीकधी गर्भाशयात दोष असतात (उदा. गर्भाशयात पडदा असणे) खरेतर हे जन्मदोष असतात. काही गर्भाशयातील दोषांमध्ये गर्भ राहणे कठीण असते. त्यातूनही गर्भ राहिलाच तर वेळेआधीच मूल जन्मते किंवा गर्भपात होतो.
. बऱ्याचदा गर्भाशयाचे काही विकार असतात. जसे गर्भाशयात गाठ असणे ज्याला आम्ही Fibroid म्हणतो, अंडाशयात गाठ असणे, गर्भपिशवी खाली सरकणे (Prolapse uterus)
 या काळातील महत्त्वाची कारणे म्हणजे प्रथम मातांची वाढती वयं! शिक्षण, करियरमुळे लग्न उशिरा होत आहेत. पहिले गर्भारपणच तीशीच्या वर जात आहे. तसेच फास्ट फुड संस्कृती व व्यायामाचा अभाव, यामुळे लट्ठपणा वाढतोय व प्रतिकारक्षमता मात्र कमी होत आहे.
 वंध्यत्वाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वंध्यत्त्वाचे उपचार किंवा टेस्ट टयुब बेबी प्रक्रियेने झालेली गर्भधारणेची आम्ही तशीही खुप काळजी घेतो. कारण या स्त्रियांमध्ये जास्त गुंतागुंत आढळते. तसेच या मातांची वयं वाढलेली असतात.
गर्भधारणेमुळे मधुमेह, रक्तदाब हे तर नित्याचेच झाले आहे. या गोष्टींची काळजी कशी घ्यायची?

प्रतिबंध करणे
 Prevention is better than cure आम्ही हे वाक्‍य आमच्या सगळया पेशंटस्ना सांगतो. त्यासाठी गर्भधारणा होण्याआधी शारिरिक व मानसिकदृष्टया सक्षम असणे खुप महत्त्वाचे आहे. प्रत्येक मुलीने गर्भधारणेची आखणी करण्याआधी स्वत:चे वजन आटोक्‍यात आणावे. शरीरात लोह व कॅल्शियम व प्रथिनांची कमतरता नसावी. व्यायामाची सवय असावी. प्रत्येक मुलीला आपला रक्तगट, हिमोग्लोबीन इतर आजारांविषयी माहिती असावी.

 लग्नानंतर लगेच स्त्रीरोगतज्ञांना भेटून प्रेग्नंसीच्या आखणीबद्धल सल्ला घ्यावा. योग्य वयात गर्भधारणा होणे आवश्‍यक आहे.
 पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम असणाऱ्या मुलींना गर्भारपणात गर्भपात, मधुमेह होण्याची शक्‍यता वाढते. ज्या मुलींच्या कुटुंबात मधुमेह, रक्तदाब असे विकार असतात, त्यांना या त्रासाची जास्त शक्‍यता असते.
 कांही विभागात सिकलसेल (उदा. विदर्भ) किंवा इतर आजारांचे प्रमाण जास्त असते. कांही कुटुंबात कांही अनुवांशिक आजार असतात. अशा लोकांनी डॉक्‍टरांना भेटून त्याची वेळीच शहानिशा करावी.

 सध्याच्या संगणक युगातील मुलींना गर्भारपणात खुप त्रास होतो. कारण गर्भारपणाबरोबर करियर ( अनियमित तास) व घर तसेच अशी तारेवरची कसरत चालू असते. तसेच वेळ नसल्यामुळे पौष्टिक आहार पुरेसा मिळत नाही. कामाच्या जबाबदाऱ्यांमुळे मानसिक तणाव वाढतो. अशा वेळेला हा तणाव कमी करून सकस आहाराबरोबरच योग प्राणायामची जोड असावी.

 ग्रामीण भागातील किंवा कामगार वर्गातील स्त्रियांमध्ये शारिरिक कष्ट खुप असतात. सकस आहाराचाही अभाव असतो अशा वेळेस घरच्या लोकांनी मदत करावी व गर्भारपणात नियमित तपासणी करावी.
 डॉक्‍टरांनी सांगितल्याप्रमाणे बेड रेस्ट जरूर घ्यावी.
पुढच्या भागात बघू गुंतागुंतीचे गर्भारपण, बेड रेस्ट व उपचार

loading image