esakal | गुंतागुंतीचे गर्भारपण, बेडरेस्ट व उपचार
sakal

बोलून बातमी शोधा

pregnancy.

तिला चौथ्या महिन्यात गर्भाशयाच्या मुखाला टाका घालून प्रसूती होईपर्यंत बेड रेस्ट सांगितली. सहा महिन्यानंतर रक्तदाब वाढला. सातव्या महिन्यात मधुमेह (प्रेग्नंसीमुळे) झाला. देव माझी व तिची परिक्षाच घेत होता.

गुंतागुंतीचे गर्भारपण, बेडरेस्ट व उपचार

sakal_logo
By
डॉ. सुषमा देशमुख

रितु, वय वर्षे पस्तीस, वजन पंच्याहत्तर किलो, उंची कमी. लग्नाला आठ वर्षे होऊन गेली होती. एकदा गर्भपात झाला. मग प्रेग्नंसीच रहात नव्हती. तपासण्यामध्ये लक्षात आले की, गर्भाशयाची पोकळी आतून बऱ्याच ठिकाणी चिकटली होती. मग दुर्बिणीद्वारे तिचे उपचार केले. बऱ्याचदा सांगून पण ती वजन कमी करू शकली नाही. बऱ्याच उपचारानंतर ती गर्भवती झाली. पण पाचव्या महिन्यात, गर्भाशयाची क्षमता नसल्याने परत गर्भपात झाला. आता यावेळेला परत कसून तपासणी, प्रयत्नांती रितू गर्भवती झाली. पण आम्हा सगळयांच्या डोक्यावर टांगती तलवार होतीच.

तिला चौथ्या महिन्यात गर्भाशयाच्या मुखाला टाका घालून प्रसूती होईपर्यंत बेड रेस्ट सांगितली. सहा महिन्यानंतर रक्तदाब वाढला. सातव्या महिन्यात मधुमेह (प्रेग्नंसीमुळे) झाला. देव माझी व तिची परिक्षाच घेत होता. शेवटी सगळया प्रयत्नांना फळ आलं आणि आता बाळ बाळंतिण सुखरूप आहेत.

या एकाच पेशंटमध्ये बेडरेस्टची अनेक कारणे होती. आजकाल गुंतागुंतीची, जोखमीच्या गर्भारपणाची संख्या वाढतेय. यात बाळ व बाळंतीण दोन्ही सुखरूप हवे. आता उपचार कसे करायचे?

आम्हा डॉक्टरांना अंदाज (Prediction), प्रतिबंध (Prevention) आणि उपचार (Treatment) यावर काम करावे लागते. प्रतिबंधाबद्धल आपण मागच्या लेखात बघितले.

उपचार
ज्या पेशंटला जसा त्रास व जे कारण आहे त्याप्रमाणे उपचार करणे.
१. उपचारांमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रसवपूर्व तपासण्या. गरोदर स्त्रीच्या पहिल्या भेटीतच आम्ही तिच्याबद्दल पूर्णपणे माहिती मिळवितो. तिचे आधीचे आजार, सध्याचे आजार व नंतर होऊ शकणारे आजार याबद्दल व्यवस्थित विचारणा करतो. त्याप्रमाणे त्यांचे वर्गीकरण केले जाते.

२. रक्ततपासण्या रक्तगट, हिमोग्लोबीन, मूत्राच्या तपासण्यांबरोबरच विशेष रक्त तपासण्या व इतर तपासण्या केल्या जातात. गर्भवती स्त्रीच्या वेगवेगळया आजारांप्रमाणे तपासण्यांची संख्या वाढू शकते. आजकाल आम्ही रक्तातील साखरेसाठी विशेष तपासणी करतो. व त्याप्रमाणे DIPSI (Diabetes in pregnancy study group of India) यामध्ये पहिल्या १२ आठवडयातच ७५ ग्रॅम ग्लुकोजचे पाणी देऊन दोन तासांनी रक्तातील साखरेची तपासणी करतात. डबल मार्कर – ही रक्ताची तपासणी अकरा-बारा आठवडयात करतात. यामुळे कांही विशिष्ट हार्मोन्सची तपासणी करून गर्भाबद्धल विशेष माहिती मिळवतात. रक्तदाब जास्त असेल तर किडनी व लीव्हरच्या कांही तपासण्या कराव्या लागतात. मधुमेह व इतर काही आजार असतील तर वेळोवेळी बऱ्याच तपासण्या कराव्या लागतात.

३. सोनोग्राफी – सोनोग्राफी हे महत्त्वाचे उपकरण आम्हाला वेळोवेळी मदत करते. आम्ही तशी सोनोग्राफी तीन ते चार वेळा करण्यास सांगतोच.आजकाल सोनोग्राफीमुळे अगदी १२ आठवडयामध्येच पेशंटला ब्लडप्रेशर वाढू शकेल किंवा बाळाला रक्तपुरवठा कमी मिळून त्याची वाढ खुंटेल हे समजू शकते व तशी उपाययोजना करता येते.
शेवटच्या महिन्यात पुन्हा एकदा गर्भाची वाढ पाहिली जाते. जोखमीच्या गर्भारपणात बऱ्याच वेळा बाळाची वाढ खुरटलेली असते. (Intrauterine growth retardation) अशावेळेला मातेची आम्ही डॉपलर सोनोग्राफी करतो. यामध्ये आपल्याला बाळाला मिळणाऱ्या रक्तपुरवठयाबद्दल माहिती मिळते. काही विशेष तपासण्या व डॉपलर सोनोग्राफीमुळे आम्हाला बाळ वाचवण्यासाठी बाळंतपण कधी केव्हा करायचे याबद्दल ठरवता येते. त्यामुळे बाळ पोटातच दगावण्याची शक्यता कमी असते. तसे पाहिले तर जोखमीच्या बाळंतपणाची आम्ही नेहमीच आखणी करतो व बाळंतपणानंतर बाळ हे नवजात अतिदक्षता भागात ठेवले जाते.

४. प्रेग्नंसीमुळे होणारा मधुमेह व रक्तदाब हा विशेष करून सातव्या महिन्यानंतर होतो पण काही स्त्रियांना आधीपासूनही राहू शकतो.

अ) मधुमेही पेशंटसाठी आहाराचा तख्ता दिला जातो. व किती प्रमाणात गंभीर आहे त्याप्रमाणे औषधोपचार करतात. कारण जर रक्तातील साखरेवर नियंत्रण नसेल तर पहिल्या तीन महिन्यात (या काळात बाळाचे अवयव तयार होत असतात) बाळात व्यंग येऊ शकते. नंतरच्या महिन्यात बाळाची वाढ जास्त प्रमाणात होते. जी बाळासाठी त्रासदायक ठरू शकते. तसेच श्वसन प्रणाली परिपक्व होत नाही. काहीवेळा शेवटच्या दोन आठवडयात बाळाला अचानक त्रास होऊन बाळ दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळेआधी प्रसूती करावी लागते. अर्थात हे निर्णय स्त्रीरोगतज्ञ पेशंटच्या गंभीरतेप्रमाणे घेतात.

ब) रक्तदाब वाढणारे पेशंटस् गर्भावस्थेत डॉक्टरांसाठी आव्हान असते. रक्तदाब जास्त असणाऱ्या पेशंटमध्ये विविध प्रकारची गुंतागुंत येऊ शकते. शरीराची पूर्ण प्रणाली बिघडू शकते व पेशंटला प्रसूतीपूर्व – प्रसूतीमध्ये व नंतर झटके येऊ शकतात. त्यामुळे विविध तपासण्यांची संख्या वाढते. उदा. लघवी, किडनी, लीव्हर यांचे नियंत्रण व्यवस्थित आहे की नाही ते वारंवार बघावे लागते, सोनोग्राफीची संख्या वाढू लागते. तसेच आईच्या वाढत्या रक्तदाबामुळे, बाळाला रक्तपुरवठा कमी मिळून त्याची वाढ खुंटते.

५. गर्भधारणेच्या आधी जर काही जोखमीचे आजार असतील तर ज्या डॉक्टरांकडे उपचार असतील त्यांच्याकडून गर्भधारणेसाठी शरीर सक्षम आहे कि नाही ते ठरवणे. कारण कांही जणांसाठी गर्भधारणा त्रासदायक ठरू शकते व अतिदक्षता विभागात ठेवण्याची गरज भासू शकते.

६. गर्भाशयात दोष असतील तर गर्भधारणेआधी त्याचे उपचार करावे लागतात. काही वेळा गर्भधारणेत गर्भाशयाच्या मुखाला टाका देऊन बांधावे लागते.
अशाप्रकारे त्याप्रमाणे त्रास आहे तशी उपचाराची दिशा वळते.

नवजात बाळ अतिदक्षता विभाग (NICU)
अतिदक्षता विभाग हे शब्द जरी कानावर पडले तरी ऐकणाऱ्याच्या हृदयाचे ठोके वाढतात. चेहऱ्यावर काळजी दिसू लागते आणि जन्मलेले बाळ ICU मध्ये आहे असं म्हटल्यावर तर काळजी आणि आश्चर्य वाटायला लागतं. परंतु ही आता सर्वमान्य गोष्ट असून त्याची गरजही दिवसेंदिवस वाढत आहे.

बऱ्याचजणांना एवढं माहिती आहे की पूर्ण दिवस नसलेल्या (Premature) बाळाची ही काळजी ही वेगळया रीतीने केली जाते. पण NICU मध्ये कुठल्या बाळाला ठेवलं जातं? तर ही सगळी जोखमीची बाळं (High risk Baby) असतात. पर्यायाने बहुतांशवेळा जोखमीच्या बाळंतपणातून (High risk Pregnancy) आलेली असतात.

ज्याठिकाणी जोखमीच्या बाळ बाळंतिणीची सोय नाही त्यांनी मातेस प्रसूतिच्या आधीच मोठया शहरात नेणे योग्य असते. कारण बाळ जन्मल्यानंतरचा एकएक सेकंदसुद्धा महत्त्वाचा असतो. त्यामुळे आधीच सोय करून ठेवली तर ऐनवेळेवर होणारी धावपळ तर टळेलच परंतु माता व बाळास योग्य ते उपचार वेळीच मिळून त्याचे आयुष्यभर होणारे दुष्परीणाम टाळता येतील. डॉक्टरांच्या मदतीचा हात घेऊन जोखमीच्या गर्भवती माता व बालकांना समर्थपणे त्यातून बाहेर येता येईल.


थोडक्यात
* बेडरेस्ट व जोखमीचे बाळंतपण या एकमेकांशी निगडीत गोष्टी आहेत.
* गर्भाशयाशी, गर्भारपणाशी निगडीत किंवा गर्भारपणाच्या आधी असलेले आजार हे बाळंतपणासाठी जोखमीचे घटक असतात.
* जोखमीच्या बाळंतपणात गर्भवतीबरोबर बाळाचाही जीव धोक्यात असतो. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेले सल्ले तंतोतंत पाळा.
* सोनोग्राफीची तपासणी या जोखमींच्या बाळंतपणात महत्त्वाचा घटक आहे.
* जोखमीच्या बाळंतपणाचे नेहमीच प्लॅनींग असावे अशाप्रकारच्या बाळंतपणात स्त्रीरोगतज्ञ व बालरोगतज्ञ यांचे टीमवर्क खुप महत्त्वाचे आहे.

loading image