esakal | किशोरवयीन युवकांच्या समस्या
sakal

बोलून बातमी शोधा

youth

समस्येचे कारण शोधले तर समस्या सुटते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे समस्येचे कारण शोधण्यावर आपला प्रयत्न असला पाहिजे.

किशोरवयीन युवकांच्या समस्या

sakal_logo
By
डॉ. संजय देशपांडे लैंगिक विकारतज्ज्ञ, नागपूर

 गेल्या भागामध्ये आपण लैंगिक समस्या आणि त्यांची कारणे जाणून घेतली. आता किशोरवयीन अथवा विवाहपूर्व लैंगिक समस्यांबद्दल जाणून घेऊया. लैंगिक समस्या म्हणजे केवळ कुठला रोग होणे, असे नाही , लैंगिक समस्यांमध्ये लैंगिकतेबद्दलच्या शंका व शरीर निरोगी असतांना देखील लैंगिक समस्यात येणारे अडथळे यांचा देखील उहापोह झाला पाहिजे.

समस्येचे कारण शोधले तर समस्या सुटते, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे समस्येचे कारण शोधण्यावर आपला प्रयत्न असला पाहिजे.
किशोरवयात लैंगिक उत्तेजना निर्माण होणे, भिन्नलिंगी आकर्षण वाटणे स्वाभाविक आहे. त्यावेळी लैंगिकतेबद्दल अनेक प्रश्‍न मनात निर्माण होऊ लागतात. लैंगिक अभिमुखता (सेक्सुअल ओरिएंटेशन), लैंगिक जीवन सुरळीत होईल का, यासंबंधीचे प्रश्‍न नक्कीच उद्भवतात. हल्लीच्या काळात मैत्री आणि प्रियकर-प्रेयसीच्या संबंधांमध्ये देखील लैंगिक संबंध प्रस्थापित होऊ लागले आहेत. अशा वेळी जर काही समस्या आल्या तर चिंता अधिक वाढू लागते.


किशोरवयीन मुलांमध्ये लैंगिक समस्येचे मुळ काय...! मी हस्तमैथून करतो अथवा मला स्वप्नावस्थेत वीर्यपतन होते, यामुळे मला लैंगिक समस्या निर्माण झाली किंवा होणार आहे; असा गैरसमज किशोरवयीन मुलांच्या मनात असतो. येथे एक गोष्ट लक्षात घ्या की, स्वप्नावस्थेतील वीर्यपतन यासाठी बोलीभाषेत स्वप्नदोष असा शब्दप्रयोग केल्या जातो. मात्र, स्वप्नदोष हा शब्दच मुळात योग्य नाही. कारण हा दोष नाही. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे यास स्वप्नावस्थेतील वीर्यपतन असे म्हटले पाहिजे. आता हस्तमैथून आणि स्वप्नावस्थेतील वीर्यपतन यामुळे लैंगिक समस्या उद्भवतात, हे डोक्यातून पूर्णपणे काढून टाकले पाहिजे. लैंगिक समस्या या हस्तमैथून किंवा स्वप्नावस्थेतील वीर्यपतनामुळे होत नसून त्यासंबंधीचे गैरसमज आणि भीतीमुळे उद्भवतात.


आणखी एक गैरसमज असा की, वीर्याच्या एका थेंबाच्या निर्मितीसाठी रक्ताचे चाळीस थेंब खर्च होतात. आता हा अपप्रचार कुणी सुरू केला हे ठाऊक नाही. मात्र, हे सिद्ध करणारा कुठलाही वैज्ञानिक पुरावा नाही. पण वीर्यपात झाल्याने एवढा वीर्यनाश झाला, मग माझा शक्तीपात झाला, अशी भीती किशोरवयीन मुलांच्यात आढळून येते. त्यामुळे असले गैरसमज व अशा गैरसमजातून निर्माण झालेल्या भीतीतूनच लैंगिक समस्या उद्भवतात. जेव्हा कधी पुढे लैंगिक संबंधाची वेळ येते, तेव्हा भीतीपोटी लैंगिक संबंध प्रस्थापित होत नाहीत. त्यावेळी मग हा समज आणखी दृढ होतो की, वीर्यनाशामुळेच लैंगिक समस्या निर्माण झाल्यात. त्यामुळे अशा प्रकारचे गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या फॅमिली डॉक्टरांशी चर्चा करणे हितावह आहे. जर त्यांच्याशी चर्चा करून समस्या दूर झाली नाही तर ते योग्य तज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला देतील. केवळ गैरसमजातून समस्या निर्माण होतात आणि हे गैरसमज दूर केल्यास समस्या सुटेल किंबहुना ती उद्भवणार देखील नाही.


आणखी एक गोष्ट लक्ष्यात घ्यायला हवी की, हे गैरसमज दूर होणे आणि समस्यांचे निराकरण अत्यावश्यक आहे. कारण किशोरवयीन मुलांमध्ये अनेकदा मानसिक समस्यांचे मुळ लैंगिकतेबद्दलच्या गैरसमजात आहे, असे दिसून आले आहे. हे टाळण्यासाठी वाढत्या वयातील मुलांना पालकांनी, शिक्षकांनी आणि डॉक्टरांनी व्यवस्थित लैंगिक शिक्षण देणे क्रमप्राप्त आहे.
किशोरवयीन वयात भिन्नलिंगी आकर्षण निर्माण होते. त्यातून कमी वयात शरीरसंबंध देखील हल्ली होऊ लागले आहेत. आपल्या प्रेयसीची लैंगिक तृप्ती केली पाहिजे, अन्यथा ती सोडून जाईल, अशा भावनांमुळे किशोरवयीनांमध्ये मानसिक ताण वाढल्याचे आढळून येते. पुढे हाच ताण लग्नानंतर लैंगिक जीवनाला सुरुवात करताना देखील येतो. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा की, सुरुवातीच्या काळात लैंगिक संबंधांमध्ये आलेले अपयश हे दीर्घकालीन नसते. जर त्यासंबंधी योग्य ज्ञान प्राप्त केले तर या समस्या सुटू शकतात.


आणखी एक महत्त्वाची गोष्ट की, लग्नापूर्वी शारीरिक संबंध टाळले पाहिजे. अशा संबंधांमुळे एकतर मानसिक व भावनिक गुंतागूंत निर्माण होऊ शकते तसेच लैंगिक संबंधांद्वारे पसरणाऱ्या रोगांचा धोका वाढू शकतो. जर लैंगिक संबंध होत असतील तर गर्भधारणेचे साधन मुख्यत्वेकरून निरोध वापरलेच पाहिजे. पण शक्यतो लग्नापूर्वी शारीरिक संबंध टाळणेच हितावह आहे. सुदृढ समाजासाठी लैंगिक आरोग्य सुदृढ असणाऱ्या प्रजेची आवश्यकता असते. त्यासाठी किशोरवयापासूनच लैंगिक संबंधाबाबतचे गैरसमज दूर होणे गरजेचे आहे.

loading image
go to top