इनर इंजिनिअरिंग : स्वतःच्या इच्छांशी लढू नका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahabharat

साधारणपणे गौतम बुद्धांना याचे श्रेय दिले जाते, की त्यांनी इच्छाशून्यतेबद्दल सांगितले.

इनर इंजिनिअरिंग : स्वतःच्या इच्छांशी लढू नका

साधारणपणे गौतम बुद्धांना याचे श्रेय दिले जाते, की त्यांनी इच्छाशून्यतेबद्दल सांगितले. जेव्हा ते म्हणतात, ‘इच्छाशून्यता’; तेव्हा येथे लोक इच्छेशिवाय अस्तित्वात राहू शकतात असे समजण्याइतपत ते मूर्ख नाहीत. त्यांना माहीत आहे, की इच्छेशिवाय अस्तित्व नाही. इच्छाशून्य राहण्याची इच्छा हीच एक मोठी इच्छा आहे.

इच्छाशून्य होण्याचा अर्थ त्यांना असा अभिप्रेत आहे, की तुम्ही तुमच्या इच्छांशी ओळख बांधलेली नाही. इच्छा तुमच्याबद्दल नसतात. या क्षणासाठी, या परिस्थितीसाठी जे आवश्यक आहे त्याविषयी त्या असतात. सर्व काही जसे आहे तसे आहे आणि तुम्ही त्याबद्दल जे काही करू शकता ते करता - जेव्हा तुम्ही असे असता तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीत खोलवर गुंतून राहू शकता पण त्यासोबत ओळख बांधून ठेवू शकत नाही.

एकदा तुम्ही त्या अर्थाने इच्छाशून्य झालात, की त्या व्यक्तीसाठी कोणत्याही कर्माचे बंधन नसते. मग त्याने काहीही करो, जरी त्याने युद्ध केले तरी त्याच्यासाठी कोणतेही कर्म नाही कारण त्याला तसे काहीही करण्याची इच्छा नाही. हे त्याच्या प्रेमातून किंवा एखाद्या गोष्टीबद्दलच्या द्वेषातून घडत नाहीये. ते घडण्याचे फक्त एकच कारण आहे की, ते आवश्यक आहे.

गीता हेच सांगत आहे. कोणतेही कर्म न करता कृष्ण सतत निष्कर्म होण्याविषयी बोलत असतो, पण अर्जुनाने कृती करावी असा आग्रह धरतो. तोसुद्धा इच्छाशून्यतेबद्दलच बोलतोय, पण वेगळ्या भाषेत आणि वेगळ्या अर्थाने.

तुमच्या इच्छा आणि आकांक्षा यांच्याशी कधीही संघर्ष करण्याचा प्रयत्न करू नका. त्यांच्याशी लढणे व्यर्थ ठरेल. फक्त तुमच्या इच्छा आणि आकांक्षा योग्य दिशेने प्रवाहित करायला शिका. तुमच्या इच्छेचे स्वरूप काहीही असो, तुमच्या जीवन ऊर्जेचा प्रयत्न एवढाच आहे, की जीवनाचा पाय भक्कम करणे. जीवनशक्ती केवळ जीवनाचा अनुभव वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. एवढेच, की जर जगातल्या वेगवेगळ्या गोष्टीवर जीवन ऊर्जा केंद्रित झाल्या तर जेव्हा एखादी गोष्ट किंवा कोणीतरी त्याच्या पूर्ततेमध्ये अडथळा आणते तेव्हा तुम्ही दुःखी होतात. जीवन ऊर्जा जर एका दिशेने लक्ष केंद्रित झाल्या तर परिणाम खूप लवकर दिसून येतात.

म्हणून जेव्हा तुम्ही इच्छा कराल, तेव्हा जीवनातील सर्वोच्च गोष्टीची इच्छा करा. तुमच्या सर्व आकांक्षा सर्वोच्च गोष्टीकडे प्रवाहित होऊ द्या. कदाचित तुम्ही रागावता, तेव्हा तुम्ही प्रेमळ असू शकत नाही; तुम्ही तुमचा राग अचानक प्रेमात बदलू शकत नाही, पण तुम्ही रागाला दिशा देऊ शकता. जर तुम्हाला राग आला तर, तुम्ही ज्याला सर्वोच्च मानता त्याकडे प्रवाहित करा. राग ही प्रचंड ऊर्जा आहे, नाही का? वासना ही देखील प्रचंड ऊर्जा आहे. तिला योग्य दिशेने प्रवाहित करा. तुमच्याकडे असलेली प्रत्येक ऊर्जा, प्रत्येक आवड, प्रत्येक भावना आणि विचार, जर ते एका दिशेने केंद्रित केले, तर परिणाम खूप लवकर दिसून येतील.

टॅग्स :Sadguruhealth