Video : चला मधुमेहच लॉकडाउन करु

Video : चला मधुमेहच लॉकडाउन करु

सातारा : कोरोनाच्या संकटाने सध्या जगभर लॉकडाउनची स्थिती आहे, ही वस्तुस्थिती. पण, या स्थितीवर मात करताना कोणतेही मानसिक दडपण वा अस्वस्थता जाणवू न देण्यासाठी आपण आपले मन अधिक खंबीर करायला हवे आणि त्यासाठी ते प्रसन्नही ठेवायला हवे. आता अशा स्थितीत मधुमेह असणाऱ्या सर्वांनाच अतिरिक्‍त काळजी सतावण्याची शक्‍यता असली तरी, त्यावरही मात करण्यासारखी जीवनशैली आपण अंगीकारू शकतो आणि ही एक चांगली संधी असे मानून आपला मधुमेहच आपण लॉकडाउन करू असे मधुमेह तज्ज्ञ डॉ. जयदीप रेवले यांनी नमूद केले आहे. 


डॉ. जयदीप रेवले म्हणाले आपल्या देशातील 21 दिवसांचा लॉकडाउनचा टप्पा पार करून पुढील 20 दिवसांच्या लॉकडाउनला आपण पुन्हा सामोरे जात आहोत. या परिस्थितीमध्ये मधुमेह असणाऱ्या व्यक्‍तींना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. जगामधील कोरोनाबाधितांमध्ये वाढते वय, मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी विकार असणारे रुग्ण जास्त आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी जास्त सतर्क राहणे आवश्‍यक आहे.
 
मधुमेह रुग्णांची प्रतिकारशक्ती सामान्य व्यक्‍तींच्या तुलनेत थोडी कमी असल्याने संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे घरातून बाहेर न पडणे हा सोपा उपाय आहे. तो कटाक्षाने पाळावा. आपल्या नेहमीच्या औषधांचा डोस नियमित घ्यावा. अत्यावश्‍यक कारणाशिवाय दवाखान्यात जाणे सद्य:स्थितीत टाळावे. त्याऐवजी आपल्या डॉक्‍टरांबरोबर फोनवर संपर्क साधावा व औषधांमध्ये काही आवश्‍यक बदल असल्यास तो करून घ्यावा. शरीरातील रक्तशर्करेचे प्रमाण वारंवार तपासायला सांगितले असल्यास ग्लुकोमीटरवर साखर तपासून आपल्या डॉक्‍टरांना कळवत राहावे.

कोणत्याही परिस्थितीत शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका. थोडे थोडे पाणी दर 15 मिनिटांनी पीत राहा. इन्सुलिनच्या बाटल्या किंवा पेन फ्रीजमध्ये ठेवा. कारण उन्हाळ्याच्या दिवसात उष्ण तापमानामुळे ते खराब होण्याची शक्‍यता आहे. 
लघवीचे प्रमाण खूप वाढणे, खूप कोरड पडणे, भूक खूप लागणे, सतत मरगळ वाटणे ही साखर खूप वाढल्याची लक्षणे असू शकतात. ही लक्षणे जाणवल्यास रक्तशर्करा तपासून आपल्या डॉक्‍टरांशी संपर्क साधा. तसेच खूप घाम येणे, चक्कर येणे, अंग थरथर कापणे, डोके दुखणे ही साखर खूप कमी झाल्याची लक्षणे असू शकतात. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित साखर, ग्लुकोज बिस्कीट, चॉकलेट यापैकी काहीही गोड पदार्थ खावा व आपल्या डॉक्‍टरांना संपर्क करावा.

मधुमेह (डायबेटिस)

 CoronaFighters : जिवाचा धोका पत्करूनही कोरोनासंगे युद्ध त्यांचे सुरूच 

मधुमेह रुग्णांनी वरील काळजी घेतल्यास लॉकडाउनच्या कालावधीमध्ये रक्तातील साखर नियंत्रणात राहील. वजन वाढणार नाही. प्रतिकारशक्ती चांगली राहील. घरी राहा, सतर्क राहा, आनंदी राहा, सुरक्षित राहा. 

  • मन प्रसन्न ठेवण्यासाठी पुस्तके वाचा 
  • गाणी ऐका, नातवंडांबरोबर खेळा 
  • विणकाम, शिवणकामात मन रमवा 
  • जुन्या फोटोंचे अल्बम पाहा 
  • खाण्याकडे विशेष लक्ष द्या 
  • अति स्निग्ध, तळलेले पदार्थ टाळा 
  • जंक फूड्‌स, चिप्स खाण्यावर नियंत्रण राखा 
  • दररोज सकाळी कोमट पाणी, हळद, मिठाच्या गुळण्या करा 
  • घरबसल्याच व्यायामाची सवय कायम ठेवा 
  • घरातील किरकोळ कामात मदत हाही व्यायामच 
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com