
जीवनशैली बदलातून त्वचा ठेवा टवटवीत...
पुणे : उन्हातून थेट तुम्ही एअर कंडिशनमध्ये जाताय का, भर उन्हातून आल्या-आल्या घटा-घटा पाणी पिताय का, पारा चाळिशीकडे निघाला असतानाही तुम्ही स्कीन फिट जिन्स घालून फिरताय का, या प्रश्नांची उत्तरे ‘हो’ असल्यास तुम्ही उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करा. तरच, उन्हाळा सुसह्य होईल, असा सल्ला वेगवेगळ्या वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तहान खूप लागते. पण, भर उन्हातून आल्यानंतर थंड पाणी पिल्यानंतर पोटाचे विकार होण्याचा धोका असतो. तसेच, उन्हाळ्यात त्वचाविकारांमध्ये वाढ होण्याचा धोका असतो. त्यात त्वचेवर होणारे बुरशीजन्य आजार, घामोळ्या, त्वचा कोरडी होऊन त्याला सुरकुत्या पडणे. हे धोके टाळण्यासाठी उन्हाळ्यात स्कीन फिट जिन्स वापरू नका, असा सल्ला त्वचारोग तज्ज्ञांनी दिला आहे. (Skin Care Tips in Marathi)
उन्हाळ्यातील आजार
उष्माघात : मानवी शरीराचे तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते. त्यापेक्षाही वातावरणातील तापमान वाढलेले असते. पुण्यात कमाल तापमान चाळीशीच्या जवळ पोचले आहे. अशा वेळी उष्माघाताचा त्रास होतो. त्यातून डोकेदुखी, मळमळ, उलटी असा त्रास होतो
सनबर्न : भर उन्हात तुम्ही फिरत असाल, काम करत असाल तर सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांमुळे सनबर्न होण्याचा धोका असतो. त्यातून त्वचेवर लाल चट्टे दिसतात, मळमळ आणि उलटी होते.
घामोळे : उन्हाळ्यात घामाच्या ग्रंथीतून घाम बाहेर पडतो. पण, अडथळ्यांमुळे त्वचेवर घामोळ्या येतात. त्याला खाज सुटते. मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त असते.
बुरशीजन्य आजार : घट्ट कपडे घातल्याने तेथे घाम तसाच राहतो. त्यामुळे तेथे बुरशीजन्य आजाराची शक्यता असते.
टायफॉईड : उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी घटते. अशा वेळी दूषित पाणी आणि अन्न पदार्थ आहारात आल्यास त्यातून टायफॉईड होण्याचा शक्यता असते.
हे करा
घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी घाला
तोंडावर स्कार्प बांधा
फूल बाह्यांचे कपडे घाला
अंघोळ झाल्यानंतर घामाच्या जागी पावडर टाका
हे करू नका
घट्ट कपडे घालू नका
गडद रंगाचे कपडे घालू नयेत
भरदुपारी शारीरिक श्रमाची कामे करणे टाळा
उन्हाचा चटका वाढल्यानंतर स्वयंपाक करणे टाळा
''उन्हाळ्यात घामामुळे बुरशीजन्य आजारांचे प्रमाण वाढते. तसेच, उन्हात जास्त फिरल्याने सनबर्न, त्वचा कोरडी पडणे, सुरकुतणे असे विकार वाढतात. तसेच, घामामुळे त्वचेशी संबंधित इतर आजारांमध्येही वाढ होण्याचा धोका असतो.''
- डॉ. धनश्री भिडे, त्वचारोग तज्ज्ञ
Web Title: Skin Care Tips Change Your Lifestyle For Fresh And Glowing Skin
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..