ग्लॅमरस स्मिता गोंदकर सांगतेय तिच्या फिटनेसविषयी...

स्मिता गोंदकर, अभिनेत्री
मंगळवार, 28 जानेवारी 2020

एखादी गोष्ट मन लावून करणं म्हणजेच मेडिटेशन. मी माझा मूड व शरीरानुसार वेगवेगळ्या पद्धतीचं मेडिटेशन करते.

तुझ्या दृष्टीने वेलनेसची व्याख्या काय?
मानसिक आणि शारीरिक आरोग्य या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत. त्या एकमेकांना साह्य करतात. त्यामुळं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलंच असलं पाहिजे. मी वेगवेगळ्या प्रकारचं मेडिटेशन करते. मेडिटेशन म्हणजे ‘नो माइंड स्टेट’. एखादी गोष्ट मन लावून करणं म्हणजेच मेडिटेशन. मी माझा मूड व शरीरानुसार वेगवेगळ्या पद्धतीचं मेडिटेशन करते. एखाद्याला गाणं गायला आवडतं. ते मनापासून गाणं गातात, त्यालाही आपण मेडिटेशन म्हणू शकतो. त्या वेळी दुसऱ्या गोष्टी मनामध्ये येत नाहीत. मला कधीकधी कराओके सिस्टिमवरती गाणं गायला आवडतं. त्यालाही मेडिटेशन म्हणता येईल. मानसिक व शारीरिक आरोग्य चांगलं असल्यास आपण वाईट परिस्थितीतही चांगले निर्णय घेऊ शकतो. कारण, त्या वेळी आपलं मन चांगला विचार करू शकतं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
 
मानसिक आरोग्यासाठी काय करतेस?
मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. आपलं रक्ताभिसरण आपल्या मेंदूपर्यंत होणं गरजेचं आहे. भावनिक चढउताराचा समतोल साधणं गरजेचं आहे. त्यासाठी दररोज २० मिनिटं वॉकिंग-रनिंग करते. रक्ताभिसरण व्यवस्थित झालं नाही. तर विषारी घटक (टॉक्झिन्स) जमा होतात. रक्तामध्ये अडथळे होऊ शकतात. परिणामी, वेगवेगळे आजार होतात. मनामध्ये नकारात्मक भावना येतात. त्यामुळं रक्ताभिसरण व्यवस्थित राहण्यासाठी व शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत रक्त पोचण्यासाठी व्यायाम हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळं प्रत्येकानं दररोज शारिरिक व मानसिक आरोग्यासाठीही व्यायाम केलाच पाहिजे.
 

योगासन, प्राणायाम करतेस का?
योगासन, प्राणायाम या गोष्टी आरोग्यासाठी खूपच महत्त्वाच्या आहेत. प्रत्येकानं त्या केल्याच पाहिजेत. प्राणायाम व योगासनांतून आपलं मन शांत राहतं. अनेक नकारात्मक भावना व टॉक्झिन्स प्राणायाम केल्यानं जातात. मी रेसिंग करते, त्या वेळी न विसरता योगासनं करते. कारण, तेव्हा एकाग्रता आणि सजगता खूप गरजेची असते. आम्ही खूप जोरात व वेगानं गाड्या चालवितो. त्यामुळं लक्ष विचलित होता कामा नये. ते धोकादायकही ठरू शकतं. त्यामुळं रेसिंगपूर्वी सूर्यनमस्कार करते. परिणामी, लक्ष विचलित होत नाही. प्रत्येकानंच स्वतःच्या आरोग्यासाठी योगासने व प्राणायाम शिकून घ्यावेत व ते न चुकता करावेत.

(क्रमशः)
(शब्दांकन : अरुण सुर्वे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: smita gondkar article about Fitness