माझा फिटनेस : शिस्तबद्धता - आरोग्याची गुरुकिल्ली

स्मिता गोंदकर, अभिनेत्री
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

माझं वजन प्रमाणातच असतं. सध्या माझं डाएट सुरू आहे. मात्र, मला अनेकदा वेगवेगळ्या चित्रपटांसाठी वजन वाढवावं लागतं. ते खूपच आव्हानात्मक आहे. पण, त्यासाठीही माझ्याकडं एक मंत्र आहे. एकदा मला नाटकासाठी वजन वाढवायला सांगितलं. आमच्या नाटकाचे निर्माते खूपच फुडी होते. ते आमच्या टीमला मटण, भाकरी, मासे खाऊ घालायचे. त्यामुळं माझं वजन वाढलं. अनेकांचं वजन मासे खाऊन वाढत नाही.

वजन कमी-जास्त केलं का?
स्मिता -
 माझं वजन प्रमाणातच असतं. सध्या माझं डाएट सुरू आहे. मात्र, मला अनेकदा वेगवेगळ्या चित्रपटांसाठी वजन वाढवावं लागतं. ते खूपच आव्हानात्मक आहे. पण, त्यासाठीही माझ्याकडं एक मंत्र आहे. एकदा मला नाटकासाठी वजन वाढवायला सांगितलं. आमच्या नाटकाचे निर्माते खूपच फुडी होते. ते आमच्या टीमला मटण, भाकरी, मासे खाऊ घालायचे. त्यामुळं माझं वजन वाढलं. अनेकांचं वजन मासे खाऊन वाढत नाही. पण, माझं उलटं आहे. मासे खाऊन माझं वजन आपोआप वाढतं. रेसिंगमुळं माझं वजन कमी होतं. कार चालवून तीन चार किलो वजन तर सहजच कमी होतं. कारण, रेसिंगच्या वेळी शरीरावर फोर्स पडतो, त्यातून वजन घटतं. ट्रॅकवर जाऊन आल्यावर तीन-चार लिटर पाणी प्यावंच लागतं. त्याचाही शरीरावर सकारात्मक परिणाम होतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आहारात काय घेते? 
स्मिता -
 मी सर्व प्रकारचे पदार्थ खाते. कार्बोहायड्रेड, प्रोटिन्स, सॅलड, फायबर या गोष्टींचे संतुलने ठेवते. क्रॅश वा प्रोटिन असं शॉकिंग डाएट करत नाही. त्यामुळं तशी सवय लागते. ती तुटल्यावर शरीर प्रतिक्रिया देऊ शकते. त्यामुळं मी हेल्दीच खाते. माझ्या जेवणाच्या वेळा ठरलेल्या असतात. कधी कधी चित्रीकरणामुळं जेवणाचं गणितं बिघडतं. पण, मी वेळापत्रक काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न करते. शरीरासाठी फळंही महत्त्वाची असतात. अनेकांना काही फळं मानवतात, तर अनेकांना मानवत नाहीत. त्यामुळं आपल्या शरीराला कोणती फळं मानवतात, हे पाहणं गरजेचं आहे. अनेकांना सफरचंद आवडते. डॉक्‍टरही सल्ला देतात. पण, माझ्या शरीराला सफरचंद मानवत नाही. मला केळी, पेरू, डाळिंब, संत्री-मोसंबी ही फळं आवडतात. मात्र, फळं आणि जेवण एकावेळी करता कामा नये. पचनक्रियेच्या दृष्टीनं जेवण आणि फळं यामध्ये अंतर असायलाच हवे.

व्यायाम कधी व कसा करते?
स्मिता -
 मी नेहमीच सकाळी व्यायाम करते. दहा सूर्यनमस्कार घालते. अनेकदा मी जीमलाही जाते. रनिंग व जॉगिंग करते. मात्र, वेट्‌सवर भर देत नाही. मी खेळाडू असल्यानं आखाड्याची सवय आहे. जोर-बैठका आणि नैसर्गिक व्यायामालाच मी महत्त्व देते. पिलाटेस व टीआरएक्‍स या नवीन गोष्टींवर माझा जोर असतो, तसेच त्याच्या प्रशिक्षणालाही जाते. अनेकदा चित्रीकरण असल्याने गॅप पडतो. पण, चालण्याचा व्यायाम २० मिनिटं करतेच. त्यामुळं रक्‍ताभिसरण चांगलं होतं. आरोग्य उत्तम राखण्यासाठी जीवनामध्ये शिस्त खूप गरजेची आहे. या शिस्तीने जेवण, झोप व व्यायामासाठी वेळ दिला तरच आरोग्य उत्तम राहील. शिस्तबद्ध आयुष्यातच आरोग्याची गुरुकिल्ली आहे.
(शब्दांकन - अरुण सुर्वे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: smita gondkar fitness funda