खैनी, मिश्री, तंबाखू, गुटखा खाताय? मग कॅन्सर होण्याचा ५० पट अधिक आहे धोका

Smokeless tobacco are 3 times more likely to develop mouth cancer
Smokeless tobacco are 3 times more likely to develop mouth cancer

पुणे : धूरविरहित तंबाखूचे सेवन करणाऱ्यांमध्ये गाल तसेच हिरडीमध्ये मुख कर्करोग होण्याचा धोका ५० टक्के अधिक आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. याशिवाय, धूरविरहित तंबाखू सेवन करणाऱ्यांपैकी ६०-७८ टक्के जणांच्या तोंडात जखमा आढळून आल्या आहेत. धूरविरहित तंबाखू उत्पादनांमध्ये कॅन्सरला कारणीभूत ठरणारे २८हून अधिक घटक असतात, असे समजले जाते.

धूरविरहित तंबाखूमधील सर्वांत हानीकारक घटक म्हणजे टोबॅको-स्पेसिफिक नायड्रोसॅमाइन्स (टीएसएनए). या घटकाचे स्तर अधिक असल्यास त्यामुळे कॅन्सरचा थेट धोका निर्माण होऊ शकतो. खैनी, मिश्री यांसारख्या एसएलटी उत्पादनांचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. यांमध्ये टीएसएनएंचे मोठ्या प्रमाणात केंद्रीकरण झालेले असते आणि तंबाखू चघळणाऱ्यांच्या लाळेत ते दिसून येतात. एसएलटी उत्पादनांच्या वापराबाबतच्या वर्तनात्मक फरकांवर आधारित अभ्यासात असे दिसून आले आहे की, मुखाच्या कर्करोगाचा धोका स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत अधिक आहे.

एसएलटी उत्पादनांमधील कार्सिनोजीन्स गिळते जातात आणि त्यावर प्रक्रिया होते, त्यामुळे चयापचयात कार्सिनोजीन्स सक्रिय होतात. चघळण्याच्या तंबाखूमध्ये सुपारी, कॉस्टिक चुना आणि तंबाखूचा अंतर्भाव असतो. त्यामुळे प्रतिक्रियाशील (रिअॅक्टिव्ह) ऑक्सिजन ग्रंथींची निर्मिती वाढते, पेशींमधील उलाढाल वाढते, पेशीतील प्रथिन घटकांमध्ये संश्लेषण घडते, डीएनए, फायब्रोलास्ट (जोडपेशीला जन्म देणारी पेशी) आणि क्रोमोसोमलला हानी पोहोचते, मुखातील श्लेष्मल त्वचेमधील तंतुमय आजाराला हातभार लावला जातो व अखेरीस त्याची परिणती मुखाच्या कर्करोगात होते. मुखाच्या कर्करोगाशिवाय, स्त्रियांना वंध्यत्वाचा धोका निर्माण होतो, गरोदरपणात गुंतागुंती निर्माण होतात, मुदतपूर्व प्रसुती होते, बाळाचे वजन कमी असते आणि काहीवेळा बाळ मृतावस्थेतच बाहेर येते.

मुखाचा कर्करोगाचे निदान बहुतेकदा विकार पुढील टप्प्यावर पोहोचल्यानंतर होते. यामुळे आर्थिक भार तर सोसावा लागतोच, शिवाय तोंड वेडेवाकडे होणे, मुखाचे कार्य नीट न होणे यांमुळे रुग्णाच्या आयुष्याच्या दर्जावरही परिणाम होतो.

लोकांना तंबाखूसेवन सोडण्यात किंवा अन्य पर्याय शोधण्यात आपण नक्कीच मदत करत राहिले पाहिजे. तंबाखूमुळे होणारे आजार तसेच आर्थिक भाराबाबतच्या क्रमवारीत भारत आघाडीच्या काही देशांमध्ये आहे. यात मुखाच्या कर्करोगाचा दर खूप अधिक आहे. भारतामध्ये दरवर्षी मुखाच्या कर्करोगाच्या सुमारे १ लाख नवीन केसेसची नोंद होते आणि यातील ९० टक्क्यांहून अधिक केसेस तंबाखूसेवनाशी निगडित आहेत. भारतातील एकूण तंबाखू सेवनामध्ये धूरविरहित तंबाखू उत्पादनांचा (एसएलटी) वाटा एक तृतीयांशांहून अधिक आहे. मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण पूर्वी कधीही नव्हते एवढे वाढून दर १००,००० लोकसंख्येमागे २० एवढे उंचावले आहे. भारतात आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या कॅन्सरमध्ये मुखाच्या कर्करोगाचा वाटा सुमारे ३० टक्के आहे.

तंबाखूयुक्त पान चघळणे हे भारतातील मुखाच्या कर्करोगामागील प्रमुख कारण आहे. या धूरविरहित तंबाखूच्या पारंपरिक स्वरूपाव्यतिरिक्त लाइम, तंबाखू दंतमंजन आणि अन्य नवीन ब्रॅण्डेड उत्पादने अलीकडील काळात लोकप्रिय झाली आहेत. विशेषत: भारतातील अनेक राज्यांमध्ये गुटख्यावर बंदी घालण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ही उत्पादने लोकप्रिय झाली आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार, भारतातील २५.९ टक्के प्रौढ धूरविरहित तंबाखूचे सेवन करतात.

भारतात सर्वाधिक वापरले जाणारे एसएलटी म्हणजे चघळण्याच्या स्वरूपातील धूरविरहित तंबाखू. यामध्ये निकोटिन असते. निकोटिन हा घटक तंबाखूचे व्यसन लागण्यासाठी कारणीभूत असतो. काही चघळण्याच्या तंबाखू उत्पादनांमध्ये अत्यंत सुक्ष्म खरखरीत घटक असतात. त्यामुळे निकोटिन शोषून घेण्याचे प्रमाण वाढते आणि पर्यायाने पेशींच्या पापुद्र्यात कार्सिनोजिन्स शोषले जाण्याचे प्रमाणही वाढते.

 दुसरा मुद्दा म्हणजे तंबाखूच्या बाजारपेठेत सामाजिक-लोकसंख्याविषयक परिस्थितीमुळे दिसून येणारे भेद हा होय. निम्न-उत्पन्न गटातील व्यक्ती तंबाखूच्या मार्केटिंगला हमखास बळी पडतात. प्रौढांना कल्पक मार्केटिंग धोरणांच्या माध्यमातून किंवा सांस्कृतिक प्रभावांतून हानीकारक घटकांचे सेवन करण्यास उत्तेजन दिले जाते.

धूम्रपान बंदीप्रमाणेच एसएलटी बंदीसाठीही आपल्याला पुराव्यावर आधारित प्रकाशित साहित्याची गरज आहे. अनेक धूरविरहित तंबाखू उत्पादनांमधील या घटकांच्या समावेशाबद्दल मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध आहे पण भारतात उपलब्ध उत्पादनांचे परीक्षण विखुरलेल्या स्वरूपातील माहितीच्या आधारे केले जाते.

एसएलटी बंदी उपायांचे मूल्यमापन करणारे अभ्यास होणे गरजेचे आहे. तंबाखूसेवनाचे वर्तन बदलण्यासाठी सार्वजनिक शिक्षणाच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करणे आणि हानी कमी करणाऱ्या संकल्पनांचा परिचय हा ही समस्या हाताळण्याचा आणखी एक मार्ग आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या (एनएचएम) चौकटीत जिल्हा व ग्रामीण स्तरावर टीबी, मुखाचा कर्करोग व सीओपीडी नियंत्रणावर भर देण्यासाठी एकात्मिक आरोग्यसेवा पुरवठा यंत्रणा विकसित करणेही गरजेचे आहे.

सार्वजनिक आरोग्य व्यावसायिक निकोटिनवरील अवलंबित्व तपासण्यासाठी फॅगरस्ट्रोम चाचणी वापरू शकतात, अशी शिफारस जैन यांनी एसएलटीचे प्राणघातक परिणाम कमी करण्यासाठी हानी कमी करणाऱ्या उपायांबाबत बोलताना केली. व्याप्ती कार्यक्रमांमध्ये या चाचणीने निकोटिनवरील अवलंबित्व तपासून योग्य ते उपाय सुचवले जाऊ शकतात. या घटकांच्या वापरानंतरच्या स्वास्थ्याविषयी सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था व आरोग्य व्यावसायिकांनी प्रशिक्षण द्यावे. यांमध्ये व्यसन सोडवण्याच्या युक्त्या व साधने सांगताना स्विडिश स्नससारख्या रिड्युस्ड रिस्क प्रोडक्ट्सबद्दल समजून घेण्यात वापरकर्त्यांना मदत करावी.

औषधांचा पुरवठा व अन्य आरआरपी उपचार सुविधांसह जिल्हा स्तरावर तंबाखूमुक्ती केंद्रांची स्थापना व त्यांचे सबलीकरण झाल्यास ही समस्या मुळापासून दूर करण्यात मदत होऊ शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com