esakal | अज्ञान व संकोच दूर सारला, तर नक्की होईल ही समस्या दूर
sakal

बोलून बातमी शोधा

marriage

लैंगिक संबंध का महत्त्वाचे आहेत, तर त्याचे काही फायदेही आहेत...! लैंगिक संबंध असा शब्द ऐकल्यावर बलात्कार, लैंगिक हिंसाचार, एड्स, गुप्तरोग अशा बाबी आपल्यासमोर येतात. मात्र, लैंगिक संबंध म्हणजे कायदेशीर सज्ञान व्यक्तींचे एकमेकांच्या संमतीने होणारे मिलन आणि त्या मिलनातून दोघांना प्राप्त होणारा आनंद.

अज्ञान व संकोच दूर सारला, तर नक्की होईल ही समस्या दूर

sakal_logo
By
डॉ. संजय देशपांडे लैंगिक विकारतज्ज्ञ, नागपूर

आतापर्यंत प्रणयानुभूती सदरामध्ये लैंगिक संबंधातील अनेक बाबींवर चर्चा केली. लैंगिकतेसंबंधी सर्वांगिण माहिती मिळायला हवी, हा या स्तंभाचा हेतू आहे. कारण आजही आपल्या समाजात लैंगिकतेबद्दल खुलेपणाने बोलल्या जात नाही. परंपरागत समाजात ‘सेक्स’ विषयक चर्चेला निषिद्ध मानले आहे

 किंबहुना आपण ब्रह्मचर्याचा पुढाकार करीत असल्याने सेक्स वाईट असा समज झाला असावा. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा की, ब्रह्मचर्य हे लैंगिक संबंध न करणे, एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. ब्रह्म आचरण म्हणजे पवित्र आचरण करणे असा ब्रह्मचर्याचा अर्थ आहे.

लैंगिक संबंध हा सृष्टीचा नियमच आहे. दोन जीव एकत्र येऊन तिसरा मानवी जीव जन्माला घालणे, हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे. मात्र, या लैंगिक संबंधांमध्ये कुठलीही समस्या आली तर लोकं बोलणे टाळतात. गेल्या भागात आपण बघितले की, दहा-दहा वर्षे शारीरिक संबंधाशिवाय वैवाहिक जीवन सुरू असते. एवढे दिवस लैंगिक संबंधांमधील समस्यांबद्दल बोलणे टाळल्याचेही आपणास दिसून येते. त्यामुळे लोकं लैंगिक सुख आणि त्यामुळे मिळणाऱ्या आनंदाला मुकतात.

वर्ल्ड असोसिएशन ऑफ सेक्सुअल हेल्थ या संघटनेचे म्हणणे असे आहे की, लैंगिक सुख प्राप्त करणे प्रत्येकाचा अधिकार आहे. जर तो मिळण्यात अडथळा येत असेल तर उपचार करवून घ्यावे, योग्य उपचार कोणते, समस्या सुटेल की नाही, या सगळ्यांची माहिती व्हायला हवी. यासंबंधातील जनजागृती करणे हा या सदरामागचा उद्देश आहे...!

लैंगिक समस्या या बऱ्याच व्यक्तींमध्ये असतात. प्रत्येक स्त्री-पुरुष आयुष्यात कधी ना कधी लैंगिक समस्येला सामोरा गेलेला असतो अथवा लैंगिकतेसंबंधी काही तरी शंका उत्पन्न झालेली असते. अनेकदा त्या प्रश्‍नांची उत्तरे मिळतात. मात्र, ज्यांना त्या प्रश्‍नांची उत्तरे मिळत नाही, ज्यांना उपचार मिळत नाही, त्यांचे काय...! जर त्या समस्या सुटल्या नाही तर दबून राहतात व पुन्हा लैंगिक समाधानास ते पारखे होतात.

लैंगिक संबंध का महत्त्वाचे आहेत, तर त्याचे काही फायदेही आहेत...! लैंगिक संबंध असा शब्द ऐकल्यावर बलात्कार, लैंगिक हिंसाचार, एड्स, गुप्तरोग अशा बाबी आपल्यासमोर येतात. मात्र, लैंगिक संबंध म्हणजे कायदेशीर सज्ञान व्यक्तींचे एकमेकांच्या संमतीने होणारे मिलन आणि त्या मिलनातून दोघांना प्राप्त होणारा आनंद.

लैंगिक सौख्याचे अनेक फायदे आहेत. कामतृप्ती झाल्याने व्यक्तीची मानसिक स्थिती चांगली राहते, आनंद मिळाल्याने आपल्या शरीरातील ‘फिलगुड हार्मोन्स’ वाढतात. कामतृप्तीनंतर स्त्रवलेल्या संप्रेरकांमुळे रक्तप्रवाह चांगला होतो, शरीर आणि स्नायु रिलॅक्स होतात, रक्तदाब नियंत्रणात येतो, डिप्रेशन कमी होते, झोप चांगली लागते, डोके दुखणे कमी होते; असे असंख्य फायदे कामतृप्तीमुळे मिळतात.

नवरा-बायको दरम्यान प्रेम व्यक्त करण्याचे एक माध्यम असल्याने एकमेकांसोबत राहण्याचे सुख आणि त्यामुळे मानसिक आनंदाची प्राप्ती होते. मात्र, लैंगिक समस्या असल्या की, लोकं या फायद्यांपासून वंचित राहतात. लैंगिक समस्यांबाबतीत असलेल्या अज्ञानामुळे लोकं व्यक्त होत नाहीत. त्याबद्दल आपण पुढील भागांपासून मोकळेपणाने चर्चा करणार आहोत. मात्र, त्यापूर्वी मला सांगावयाचे आहे की, प्रत्येक लैंगिक समस्येचे समाधान आहे; त्यावर उपचार आहेत.

लैंगिक समस्यांचे मुळ अज्ञानात आहे. समाजात लहानपणापासूनच लैंगिकतेबद्दल बोलले जात नाही. पुढे त्याबद्दल कुणी विचारत देखील नाही आणि सांगत देखील नाही. कुणी विचारत नाही, म्हणून लैंगिकतेबद्दल सांगितले जात नाही, हे चुकीचे आहे. उलट कुणी विचारत नाही म्हणून लैंगिकतेबद्दल सांगणे आवश्यक आहे. ज्या प्रकारे सर्दी पडसे सामान्यतः कुणालाही होऊ शकते, त्याच प्रकारे लैंगिक समस्या देखील होऊ शकतात.

लैंगिक समस्यांसाठी शारीरिक आजार जसे बीपी, हृदयविकार, मधुमेह, वाढते वय, अन्य मानसिक कारणे, वैवाहिक जीवनातील कलह असे अनेक घटक कारणीभूत असतात. योग्य उपचाराअंती लैंगिक समस्या बऱ्या होऊ शकतात. मात्र, मनातून लोकं काय म्हणतील, याबद्दलची भीती काढून टाकायला हवी.
लैंगिक समस्यांवर उपचार करण्यासाठी पी, एलआय, एसएस, आयटी हा दृष्टीकोन आधुनिक शास्त्रात सांगितले आहे.

पी म्हणजे परमिशन गिविंग, एलआय म्हणजे लिमोटेड इन्फॉर्मेशन, एसएस म्हणजे स्पेसिफिक सजेशन आणि आयटी म्हणजे इंटेंसिव्ह थेरपी. जर लैंगिकविकारतज्ज्ञांकडे गेल्यावर त्यांनी सांगितले की, ही समस्या फार कॉमन आहे आणि ठीक होऊ शकते; एवढं सांगितल तरी देखील समस्या दूर होण्याला फायदा होतो. जर लैंगिक संबंधांबद्दल काही अज्ञान असेल तर त्या अज्ञानाबद्दलची ‘लिमीटेड इन्फॉर्मेशन’ म्हणजे मर्यादित माहिती दिली, तरी शंका निरसन होऊ शकते.

एखादी समस्या ‘स्पेसिफिक सजेशन’ देऊन दूर होऊ शकते. केवळ दहा ते वीस टक्के लोकांना इंटेंसिव्ह थेरपीची आवश्यकता भासते; त्यांना औषधे, समुपदेशन आणि मानसोपचाराद्वारे ठीक करू शकतो.
या फार सोप्या गोष्टी आहेत. परंतु, अज्ञान व संकोचामुळे अनेक दिवस समस्यांचा उपचारच होत नाही आणि वैवाहिक व मानसिक समस्या उद्भवतात. त्यामुळे लैंगिक समस्या आल्या तर आपल्या फॅमिली डॉक्टर किंवा लैंगिकविकारतज्ज्ञांकडे जायला हवे.
संपादन - स्वाती हुद्दार

loading image