
तुमचं जीवन संपूर्णतः निर्दोष आहे; ती एक अचूक योजना आहे, ते अकस्मात घडलेलं अद्भुत आहे. प्रत्येक क्षणी ते दोन्ही आहे.
चेतना तरंग : अचूक योजना
तुमचं जीवन संपूर्णतः निर्दोष आहे; ती एक अचूक योजना आहे, ते अकस्मात घडलेलं अद्भुत आहे. प्रत्येक क्षणी ते दोन्ही आहे.
सृष्टी किती निर्दोष आणि पूर्ण आहे. पक्ष्यांना स्थलांतर कधी आणि कुठं करावं कसं कळतं? मेपल वृक्षाच्या पानांना लालभडक होऊन जमिनीवर पडायला कसं सुचतं? हिवाळा येतो आणि तुम्हाला वाटू लागतं, की सूर्याची उबदार उष्णता पुन्हा कधी मिळणारच नाही. पण मग त्याच बर्फाच्या थरांमधून एखादं हिरवं रोपटं डोकावतं, वर येतं आणि वसंताच्या आगमनाची बातमी देतं. फूल तरी रोपांवर टिकतं ते कसं? सगळंच कसं अद्भुत आहे.
आपलं मानवी शरीर अगदी अचूक योजनाबद्ध यंत्र आहे. हाडे, रक्तवाहिन्या, स्नायू आणि अवयवांचे इतके मोठे आणि निर्दोष जाळे खरेच कसं बनलं असेल? एक नवजात अर्भकाच्या डोळ्यात पाहा, ती अद्भुत सुंदर शक्ती तुम्हाला दिग्मूढ करून टाकते ना? केवळ तीस सेकंदांसाठी तुमचे डोळे उघडा आणि जाणीवपूर्वक निरीक्षण करा. तुम्हाला तो अवर्णनीय, अद्भुत बुद्धिमत्तेचा चमत्कार दिसेल.
आणि तुम्ही आणि तुमचे जीवन यांचे तरी काय! तो अचूक, संपूर्ण निर्माता तुम्हाला बनवून मग थांबलाच, असं वाटतं का? आपल्याच जीवनात हे असं का आहे आणि ते तसं का आहे यावर विचार करण्यात आपण अनेक तास व्यतीत करतो. वृक्ष प्राणवायू बाहेर का सोडतात याचा कधी असा विचार केला आहे का? आपल्याच बद्दल विचारात गढून गेल्यावर या विश्वयोजनेतील अशा इतर प्रश्नांवर कधी विचार केलात का? असे प्रश्न आपणाला कधी पडतच नाहीत. पण आपल्या आयुष्याबद्दल अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे असतात.
जे समजत नाही, त्याचाच अर्थ लावण्याचा प्रयत्न मन करीत असते. सृष्टीच्या या अद्भुत योजनेवर श्रद्धा असू द्या. अगदी सूक्ष्मात सूक्ष्म परमाणूपासून विशालात विशाल अस्तित्वांपर्यंत सृष्टीने सर्व काही अगदी अचूक, निर्दोष योजले आहे, तर मग तिनं तुमचंही जीवन पूर्णतः अचूक बनविण्यात तेवढंच लक्ष दिलं असेल ना! तेव्हा निश्चिंत राहा, विश्वास ठेवा आणि समर्पित व्हा!
तुम्हाला वाटतो तसा गुरू नाहीच!
आपण आपल्या गुरूला आपल्या नजरेने पाहतो. बहुतेकवेळी आपण गुरूला एक स्वतंत्र व्यक्तीच्या रुपात पाहतो, इतर सर्व लोकांप्रमाणे आणखी एक मनुष्य. फरक इतकाच जाणवतो की तो पूर्णपणे आनंदी आणि प्रसन्न आहे.
आपण आपल्या अहंकारी दृष्टिकोनामुळे गुरूला असे पाहतो, पण गुरूच्या दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्ती एकाच चैतन्यरूप आत्म्याचा एक अखंड अबाधित हिस्सा असते. तो कुणालाही अलग व्यक्ती म्हणून पाहात नाही. त्याला स्वतःची जेवढी काळजी आहे, तेवढीच तुमची आहे. एक व्यक्ती किंवा भक्त गुरूच्या कृपेने मुक्त झाला, असे तो पाहात नाही, तर त्याच्याच चेतनेचा आणखी एक हिस्सा जागृत झाल्याचे पाहतो. जसे आपल्या एका पायाला मुंग्या आलेल्या असाव्यात आणि मग तो पाय पूर्ववत ठीक व्हावा.
Web Title: Sri Sri Ravi Shankar Writes Accurate Plan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..