
आपले आयुष्य खूपच छोटे, अशाश्वत आहे याची जाणीव झाल्याने आयुष्यात कृतीशीलता येते. नको असलेल्या, बिनमहत्त्वाच्या गोष्टी आणि विविध विक्षेप बाजूला फेकले जातात.
चेतना तरंग : आयुष्य छोटे आहे; आयुष्य अनंत आहे
आपले आयुष्य खूपच छोटे, अशाश्वत आहे याची जाणीव झाल्याने आयुष्यात कृतीशीलता येते. नको असलेल्या, बिनमहत्त्वाच्या गोष्टी आणि विविध विक्षेप बाजूला फेकले जातात. कधी एखादे कृत्य करायचे असेल, प्रयास करावा लागेल, तेव्हा जीवनाच्या मर्यादेची जाणीव असू द्या. जीवन छोटे आहे याचे भान असले, की चालढकल देखील दूर होते. पण जेव्हा तुम्ही काही निकालाची, तुमच्या प्रयत्नांच्या फळाची प्रतीक्षा करीत असाल, तेव्हा मात्र ध्यानात असू द्या की आयुष्य अनंत काळासाठी, शाश्वत आहे.
अडाणी मनुष्य नेमके उलटे करीत असतो. फळाची प्रतीक्षा करताना तो अस्वस्थ, निराश होतो, घाई करू लागतो आणि सहनशील राहात नाही. जीवन अनंतकाळ आहे याचे भान असले, की उतावीळपणा राहात नाही. आपल्या चांगल्या कर्माचे फळ किंवा उपकाराची परतफेड यांची वाट पाहताना आपण उतावीळ होत असतो. पण आयुष्य हे एकच नाही, आपण पुन्हा अनेक जन्म घेणार आहोत हे ध्यानात आले की कधी ना कधी आपल्या कर्मांचे फळ निश्चित मिळणार आहे, हे समजते.
जागे व्हा आणि जाणा की जीवन खूप छोटे आहे! समय तर निघून जात आहे. तुम्ही काय करताहात या जीवनात? तुम्ही या जीवनाचा स्वतःसाठी आणि इतरांसाठी योग्य उपयोग करून घेत आहात का? हे सगळे सत्कर्म करायचे तर आहे आणि आयुष्य संपणार आहे.
जागे व्हा आणि जाणा! जीवन अनंत, शाश्वत आहे! तुमच्या कर्मांची फळे हवीत? मिळतील. अनंत जीवन पुढे आहे. तुमच्या आशांबद्दल चिंतीत आहात? लक्षात घ्या की अनेक जन्म तुम्हाला लाभणार आहेत. जर कुणी तुमच्या उपकारांबद्दल आभार मानले नाहीत किंवा तुमचा वापर करून घेतला, तर तुम्हीच त्याचे आभार माना, कारण ते नंतर कधी व्याजासहित तुम्हाला मोबदला देणारच आहेत. आपल्या कामाचे कौतुक झाले नाही किंवा आपल्याला वापरले गेले, आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतला गेला, अशा विचारांनी अस्वस्थ होण्याची कुणालाही काही आवश्यकता नाही. तुम्हाला ते लोक भविष्यात कधी ना कधी व्याजासकट तुमचा मोबदला देणारच आहेत. तो त्यांना द्यावा लागणार आहे, हे ध्यानात असू द्या.
तुमच्या कर्मांची फळे उपभोगायची आहेत, तुमच्या सत्कृत्याबद्दल आशीर्वाद हवेत, तेव्हा जीवन अनंतकाळ असणार हे जाणून घ्या. घाईघाईमध्ये हे सगळे उपभोग आनंद देणार नाहीत. जीवन अनंतकाळ असणार आहे.
Web Title: Sri Sri Ravi Shankar Writes Life Is Short Life Is Infinite
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..