चेतना तरंग : काय निवडायचे, तुमच्या हातात!

Sri Sri Ravishankar
Sri Sri Ravishankar

प्रश्न : तुम्हाला नैराश्य येते, म्हणजेच बाह्य घटनांचा काही ना काही प्रमाणात तुमच्यावर प्रभाव पडतो. याबद्दल सांगा.
गुरुदेव : कोणत्याही बाह्य परिस्थितीचा तुमच्यावर परिणाम होतोच होतो, कारण तुम्ही अगदी निर्जन बेटावर एकटे राहात नसता. अशा निर्जन बेटावरसुद्धा समुद्राच्या लाटा येऊन धडकत असतात आणि सृष्टीशी तुमचे संधान जोडत असतात. तिथे सुद्धा तुम्ही एकटे नसता. तुम्ही या सृष्टीचा एक अविभाज्य भाग आहात. म्हणूनच या वातावरणात काही बिघाड झाला, तुमच्या जवळच्या आवडीच्या व्यक्तीला काही बरेवाईट झाले, तुमच्या शेजाऱ्यांना काही झाले, आजूबाजूच्या लोकांवर वाईट प्रसंग आला तर त्याचे पडसाद नक्कीच तुमच्यावर उमटतील. पण हे परिणाम तात्पुरते असतात. ते कायमस्वरूपी नसतात. कोणतीच व्यक्ती कायम दु:खात राहू शकत नाही. वेळ काळानुसार त्या दु:खाची तीव्रता कमी होत जाते. उलट अशावेळी त्या दु:खातून बहेर पडण्याचे आत्मबळ तुम्हाला मिळते आणि त्यातून तावूनसुलाखून तुम्ही बाहेर पडता.

जीवन प्रवाहित आहे, सर्व गोष्टींची वाटचाल पुढे होत असते. त्यांच्याशी झटापट करू नका. तुम्हाला दु:ख वाटले, तर दु:खी व्हा. त्या दु:खाची अनुभूती फार तर काही मिनिटे किंवा काही दिवस टिकेल. तुम्ही सुद्धा एक दिवस हे जग सोडून जाणार आहात, हा संदेश त्यातून तुम्हाला मिळेल. तुम्हीसुद्धा एक दिवस कालवश होणार आहात. आपली घरे, मालमत्ता, गाड्या, पैसाअडका अगदी आपले शरीरसुद्धा इथेच सोडून एक दिवस आपल्याला जावे लागणार याची जाणीव आपल्याला होते. आणि मग आपल्या जीवनात मोकळेपणा येतो. आपण जास्त हसतमुख बनतो. डोक्यावरचे ओझे हलके होते. या एकाच घटनेमुळे तुम्ही निराशेच्या गर्तेतही जाऊ शकता किंवा त्या घटनेमुळे जागे होऊन ज्ञान संपादू शकता, सजग होऊ शकता, अधिक हुशार बनू शकता. काय निवडायचे हे तुमच्यावर अवलंबून असते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लाभ मंत्रघोषाचा
आपण जेव्हा बोलतो किंवा ऐकतो, तेव्हा त्याचा अर्थ वेगवेगळ्या तऱ्हेने लावला जातो. एकच भाषण सगळ्यांनी ऐकल्यावर प्रत्येकजण त्यातून वेगवेगळे अर्थ काढतो. ज्यावेळेस ध्वनी निर्माण होतो त्यावेळेस त्याचे निनाद सर्वांच्या मनात उमटतात. म्हणून एकाच स्तरावर ध्वनी सगळ्यांच्या मनांना एकत्र गुंफतो. मेंदूचे दोन भाग असतात, एक भाग तात्त्विक असतो तर दुसरा संगीतमय असतो. उजवा भाग जो संगीतमय असतो, तो कोणताही ध्वनी ऐकताना कार्यक्षम होतो. मेंदूच्या या दोन्ही भागांचा योग्य प्रकारे समन्वय साधला गेला पाहिजे. योग प्रक्रियेमुळे हा समन्वय साधला जातो. ध्वनीच्या योगाला ‘नाद योग’ म्हणतात. म्हणूनच गाणे गाण्याला महत्त्व आहे. संस्कृत मंत्रघोष म्हणण्याला विशेष अर्थ आहे. त्याचे फायदेही आहेत. मंत्रांच्या ध्वनिलहरीत विशेष शक्ती आहे. मंत्राच्या अर्थापेक्षा त्याच्या ध्वनीचे जास्त महत्त्व आहे. या महा-मंत्रांमुळे चेतनेला शक्ती मिळते. तिच्यात उत्साह संचारतो. मंत्रघोषांचे ध्वनी चेतनेमध्ये खोलवर पोहोचतात; म्हणूनच त्यांना मंत्र म्हणतात. आत्म्याशी मनाचा संयोग करून देणाऱ्या ध्वनीला मंत्र म्हणतात. मंत्रांमुळे मनसुद्धा उत्साहित आणि प्रसन्न होते. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com