esakal | चेतना तरंग : अग्नी प्रकारांमधील भेद
sakal

बोलून बातमी शोधा

Sri Sri Ravishankar

चेतना तरंग : अग्नी प्रकारांमधील भेद

sakal_logo
By
श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग

आपल्या संवेदना अग्नीसारख्या असतात. तुम्ही तुमच्या अग्नीरुपी संवेदनांमध्ये जे काही ठेवाल, ते जळून जाते. विषजन्य वस्तूंचे ज्वलन हवेत प्रदूषण आणते आणि दुर्गंध पसरवते. तुम्ही चंदन जाळलेत, तर मात्र सुगंध पसरतो. अग्नी जीवनवर्धक आहे आणि संहारकसुद्धा. आग आपल्या घराला उबदार बनवू शकते आणि जाळून भस्मदेखील करू शकते. एका शेकोटीभोवती उत्सवाचे वातावरण निर्माण करता येते, तर देहाग्नीभोवती शोक असतो. एक टायर जाळला तर विषारी धूर निर्माण होतो, तर एक तुपाचा दिवा प्रकाश देतो आणि आसमंत पवित्र करतो.

तुमचा स्वतःचा अग्नी धूर निर्माण करून वातावरण प्रदूषित करत आहे, की कापुरासारखा जळून प्रकाश आणि सुगंध पसरवतोय? एक संत प्रवृत्तीची व्यक्ती वातावरणात ज्ञानाचा प्रकाश आणि प्रेमाचा सुगंध पसरवते. अशी व्यक्ती जीवनमित्र असते. प्रकाश आणि ऊब निर्माण करणारी आग ही उच्च श्रेणीची होय. प्रकाश आणि थोडा धूर पसरवणारा अग्नी हा मध्यम श्रेणीचा आणि ज्यामुळे धुराचे प्रदूषण आणि दुःखरुपी अंधार निर्माण होतो, तो नीच श्रेणीचा अग्नी असतो. या विविध अग्नी-प्रकारांमधील भेद जाणून घ्या. जेव्हा तुमच्या संवेदना सत्कृत्यात रममाण असतात, तेव्हा तुम्ही प्रकाश आणि सुगंध आसमंतात पसरवाल. तुमच्या संवेदना अपवित्र कार्यात गुंतल्या असतील, तर धूर आणि अंधःकार निर्माण होतो. संयमामुळे तुमच्या अग्नीच्या श्रेणीत आमुलाग्र बदल घडतो.

संशयाची अस्थिर अवस्था

संशय त्रिशंकू अवस्थेसारखा आहे. पांढरेही नाही आणि काळेही नाही. मध्येच काहीतरी. तर, संशयावर तोडगा कसा काढायचा? संशयाला काळा किंवा पांढरा म्हणूनच स्वीकारा. संशय हा चांगल्या गोष्टीवर आहे (पांढरा) किंवा तो वाईट गोष्टीवरचा आहे (काळा), असे नक्की ठरवा आणि मग त्या गोष्टीचा तसाच स्वीकार करून पुढे व्हा. कोणीतरी प्रामाणिक आहे किंवा अप्रामाणिक आहे, हे पक्के काहीतरी ठरवा आणि मग त्याचा स्वीकार करा. मग मन शांत होईल. त्या संशयाच्या अवस्थेत तुम्ही राहणार नाही. कुणी समजा अप्रामाणिक आहे, तर ‘तो अप्रामाणिक आहेस पण तरीही तो माझाच आहे. तो जसा आहे, तसा मी स्वीकार करतो,’ हे ठरवा. बस्स. झाले मग.

संशय ही एक अस्थिर अवस्था आहे. यात आपण कुंपणावर आहोत, आपले पाय कुंपणाच्या आत नाहीत आणि बाहेरही नाहीत. त्यामुळे तणाव निर्माण होतो. कुंपणाच्या कुठल्याही एका बाजूला उडी घ्या आणि स्वतःस स्थिर करा. एक दिशा नक्की करा. आपण आपल्या जीवनातील सकारात्मक गोष्टींवरच संशय करीत असतो, हे तुम्ही कधी पाहिले आहे का? शक्यतो आपण नकारार्थी गोष्टींवर संशय बाळगत नाही! एखाद्याच्या प्रामाणिकपणावर आपल्याला संशय येतो, पण कुणी अप्रामाणिक आहे, यावर आपण पूर्ण विश्वास ठेवतो. कुणी तुमच्यावर क्रोधित झाले, तर त्याच्या क्रोधावर तुम्हाला संशय येतच नाही. पण तेच कुणी तुम्हाला, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो,’ म्हटले, की लगेच तुम्हाला संशय येईल, ‘खरेच का हा माझ्यावर प्रेम करतो?’ आपल्याला आपल्या उदासिनतेवर संशय येतो का? नाही. आपण उदास आहोत, हे आपण त्या स्थितीत निश्चित मानतो. पण जेव्हा आपल्याला आनंद होतो, तेव्हा लगेच संशय येतो : खरेच का मी आनंदी आहे? हेच हवे होते का मला? तुमच्या क्षमतेवर तुम्हाला संशय येतो. पण तुमच्या त्रुटींवर कधी संशय येतो का?

  • सकारात्मक गोष्टींवर संशय बाळगायच्या आपल्या या प्रवृत्तीचे निरीक्षण करा.

  • संशयाला त्याच्या योग्य मर्यादित जागेत ठेवून द्या आणि आधी संशयावरच संशय करा.

  • नकारात्मक गोष्टींवर संशय करा आणि सकारात्मक गोष्टींवर अधिक विश्वास ठेवायला शिका.

loading image