esakal | चेतना तरंग : शब्द आणि कर्म | Sri Sri Ravishankar
sakal

बोलून बातमी शोधा

Sri Sri Ravishankar
चेतना तरंग : शब्द आणि कर्म

चेतना तरंग : शब्द आणि कर्म

sakal_logo
By
श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग

प्रत्येक शब्दाशी आपण एक अर्थ जोडतो आणि मग त्या अर्थाचा विपर्यास करतो! उदाहरणार्थ इंग्रजीमधला Brainwashing हा शब्द घ्या (मराठी अर्थ, बळजबरीने मतपरिवर्तन करणे). शरीराप्रमाणेच मेंदूलाही धुण्याची कधी कधी गरज भासते. तुम्हाला एक अस्वच्छ, मलीन मेंदू घेऊन जगणे खचितच आवडणार नाही. मग Brainwashing या शब्दात वाईट काय आहे? काही नाही, तरीही हा शब्द नकारात्मक कृतीसाठी वापरला जातो.

दुसरा इंग्रजी शब्द Disillusioned (मराठी अर्थ भ्रमनिरास झालेला). तसे बघितले तर भ्रमातून बाहेर पडणे कधीही चांगलेच. कारण मगच आपण वास्तवात परत येतो. सत्याचे आकलन होते. तरीही या शब्दाचा अर्थ नकारात्मक घेतला जातो. हिंदी शब्द पुराना घ्या. हा पुराणापासून आलेला आहे. त्याचा मूळ अर्थ ‘गावातला सर्वांत नवा, सर्वांत सुसज्ज’ असा आहे. परंतु आता मात्र त्याचा अर्थ ‘सर्वांत किंवा अतिशय जुना’ असा घेतला जातो.

काळानुसार शब्दांचे अर्थ बदलत जातात. इंग्रजी शब्द Enthused हा ग्रीक भाषेतून आला आहे आणि त्याचा मूळ अर्थ ‘ईश्वर आपल्यासह आहे’ असा होता. काही काळानंतर त्याचा अर्थ ‘पूर्ण वेडा’ असा झाला आणि आता त्याचा अर्थ ‘उत्साही’ असा बदलला आहे.

शब्दांमध्ये अडकून पडू नका. शब्द तुमच्या चिंता आहेत. शब्द तुमच्या कल्पना आहेत. पण खरे ज्ञान शब्दांच्या पलीकडे आहे. खरे ज्ञान हे तुमचे अस्तित्वच आहे. सर्व शब्दांचे ते सार आहे. शब्दांच्या पलीकडे पाहा आणि त्यांच्या अर्थापुढे जा. तसे केल्यावर मग तुमच्या जीवनात असत्य शिल्लक राहणार नाही.

  • तुम्ही शब्दांचा दुरुपयोग केलात, तर असत्य बनते.

  • तुम्ही शब्दांचा खेळ केलात, तर विनोद बनतो.

  • तुम्ही शब्दांवर विसंबून राहिलात, तर अज्ञानी रहाल.

  • तुम्ही शब्दांच्या पलीकडे जाल, तर सुज्ञ व्हाल

कर्म

कर्माची गती न्यारीच आहे. जेवढे आपण कर्मांबद्दल अधिक जाणतो, तेवढे आपले आश्चर्य वाढत जाते.कर्मामुळे लोक जवळ येतात आणि कर्मामुळे दूर जातात. कर्म काहींना बलाढ्य बनवते आणि काहींना दुर्बळ. कर्म काहीजणांना श्रीमंत बनवते. अथवा गरीब. या जगात ज्या काही समस्या आहेत, जी लढाई चालली आहे, ती सर्व कर्मबंधनांमुळेच. कोणत्याही तत्वज्ञानाचे सार आहे कर्म. सर्व तर्कांचे निष्कर्ष असतात कर्म. कर्माच्या खेळांची जाणीव आपल्याला झाली, की मग आपण जीवनात घडणाऱ्या घटना आणि भेटणारी माणसे, व्यक्तिमत्त्वे यांमध्ये गुंतून न पडता आपला आत्मानुभूतीचा प्रवास सुरू ठेवू शकतो.

प्रश्न : म्हणजे एक चोर म्हणू शकतो का, ‘मी चोरी करू इच्छित नाही, ते तर माझे कर्मच आहे?’

श्री श्री : हो, नक्कीच. आणि पोलिसांचे कर्म आहे की ते त्या चोराला पकडून कोठडीत टाकतील. (हशा)

कर्मांच्या चक्रातून मुक्त होण्याची शक्यता केवळ मानवी जीवनातच आहे. आणि मानव जन्म प्राप्त झालेल्या जीवांपैकी काही हजार जिवांनाच कर्माच्या चक्रातून मुक्त होण्याची आकांक्षा असते! काही विशेष कृत्ये करून मुक्त होणे शक्य नाही....

केवळ ईश्वरकृपा अथवा गुरुकृपाच कर्माच्या बंधनांना भस्म करू शकते.

loading image
go to top