esakal | आता घरीच तपासा तुमच्या फुफ्फूसाचे आरोग्य; करा '6 मिनिट वॉक टेस्ट'

बोलून बातमी शोधा

six minute walk test
आता घरीच तपासा तुमच्या फुफ्फूसाचे आरोग्य; करा '6 मिनिट वॉक टेस्ट'
sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आरोग्याबाबत नागरिक अधिक काळजी करताना दिसत आहे. समाजमाध्यमे किंवा वैद्यकीय सल्ल्यानुसार कोरोनापासून बचाव करण्यासाठीचे उपाय जाणून घेतले जात आहे. कोरोनाकाळात श्वसनावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तातडीने एचआरसीटी करून स्कोअर तपासला जात आहे. आपत्तीजनक परिस्थिती मध्ये रुग्णालये फुल झाली आहे. ऑक्सिजनचे बेड मिळतं नाही. या परिस्थिती मध्ये घरच्या घरी सहा मिनिटे वॉक ही पध्दत अमलात आणली जात असून, यामुळे कोरोनाबाधित आहे किंवा नाही, वॉकमुळे दम लागल्यास काय करावे याबाबतची माहिती प्राप्त होते. महापालिकेचे माजी वैद्यकीय अधिक्षक डॉ. डी.बी. पाटील यांनी सहा मिनिटे वॉक ही पध्दत अवलंबिल्यास फुफ्फूसाचे आरोग्य व्यवस्थित आहे, याची माहिती मिळणार असल्याची माहिती ‘सकाळ’ला दिली.

कोणी करावी चाचणी?

-ताप, सर्दी, खोकला किंवा कोविड-१९ ची इतर लक्षणे असणाऱ्या व्यक्ती.

- घरगुती विलगिकरणामध्ये असणाऱ्या व्यक्ती.

आवशक्य साहित्य

- घड्याळ किंवा स्टॉप वॉच (मोबाईल फोन).

- पल्स ऑक्सिमीटर.

कुठे करावी?

- ही चाचणी कुठल्याही कडक जमिनीवर किंवा पृष्ठभागावर (Hard Surface) वरच केली जावी.

- ज्या जमिनीवर चालणार आहात, त्या जमिनीवर चढ-उतार नसावेत.

- पायऱ्यांवर ही चाचणी केली जाऊ शकतं नाही.

- घरातल्या कडक फरशीवर करणे कधीही चांगले.

- चालण्यासाठी जास्तीत-जास्त रिकामी जागा असलेल्या ठिकाणी ही चाचणी करावी.

कशी करावी?

तुमच्या बोटाला पल्स ऑक्सिमीटर लावा आणि त्यावर दिसणाया तुमच्या रक्तातील ऑक्सिजन पातळीची नोंद करा.

पल्स ऑक्सिमीटर बोटाला तसाच ठेवून घरातल्या घरात घड्याळ, स्टॉप वॉच लावून सहा मिनिटे फिरा किंवा चाला. अति वेगात किंवा अति हळू चालु नये, मध्यम आणि स्थिर गतीने चालणे योग्य.

सहा मिनिटे सलग स्थिर गतीने चालून झाल्यानंतर तुमच्या रक्तातील ऑक्सिजन पातळीची पुन्हा नोंद करा.

असे असेल तर काळजीचे काही कारण नाही.

- सहा मिनिटे चालल्यानंतर रक्तातील ऑक्सिजनची पातळी काहीच कमी होत नसेल तर अगदी उत्तम. तुमची तब्येत एकदम चांगली आहे.

- जर रक्तातील ऑक्सिजनची पातळी केवळ १ ते २ टक्क्यांनी कमी होत असेल तर तरीही काळजी करण्याचे कारण नाही. यामध्ये काही बदल होत नाही. हे पाहण्यासाठी दिवसातून दोन वेळा ही चाचणी करावी.

तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या.

- रक्तातील ऑक्सिजनची पातळी सहा मिनिटे चालल्यानंतर ९३ पेक्षा कमी होत असेल तर.

- चालणे सुरु करण्यापूर्वी जी पातळी होती त्या पातळी पेक्षा ३ टक्क्यांपेक्षा अधिकने कमी होत असेल तर.

- सहा मिनिटे चालल्यानंतर तुम्हाला दम किंवा धाप लागल्या सारखे वाटत असेल तर.

याचाच अर्थ ऑक्सिजन अपुरा पडतो आहे. असे होत असेल तर लवकरात लवकर रुग्णालयात भरती होणे आवशक्य आहे.

इतर महत्त्वाचे मुद्दे

- ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती सहा मिनिटांऐवजी तीन मिनिटे

चालूनदेखील ही चाचणी करू शकतात.

- चाचणी करताना शक्यतो एका व्यक्तीला सोबत बसविणे चांगले, जेणे करून खूप दम लागला तर ती मदत करू शकेल

- बसल्या जागी ज्यांना दम किंवा धाप लागत असेल त्यांनी ही चाचणी करू नये.

- चाचणी करतेवेळी जर ऑक्सिमीटर वरील ऑक्सिजन पातळी ३ टक्क्यांपेक्षा अधिकने घटली किंवा ९३ टक्क्यांपेक्षा कमी झाली तर चालणे लगेच थांबवा व वैद्यकीय सल्ला घ्यावा.

कोविड साथीच्या काळात आपल्या फुफ्फूसाचे आरोग्य व्यवस्थित आहे, याची परिक्षा या पद्धतीने होते. यासाठी सहा मिनिटे वॉक टेस्ट किंवा सहा मिनीट चालण्याची चाचणी ही एक सोपी आणि घरगुती पध्दत आहे. ही चाचणी रक्तातल्या ऑक्सिजनची लपलेली कमतरता (Happy Hypoxia) जाणून घेण्यास मदत करते, जेणे करून गरजूंना योग्यवेळी रुग्णालयात दाखल होता येईल.

- डॉ. डी. बी. पाटील, माजी वैद्यकीय अधीक्षक, महापालिका.