योगा लाइफस्टाइल : आनंदमय कोष आणि परमानंद

आनंदमय कोष हा तुम्हाला परमानंदाची अनुभूती देणारा थर असून, तो सर्वांत सूक्ष्म आणि पाच कोषांतील सर्वांत आतल्या बाजूला असलेला कोष आहे.
Yoga
YogaSakal

आज आपण पंचकोषातील सर्वांत शेवटच्या सर्वाधिक महत्त्वाच्या आनंदमय कोषाची माहिती घेणार आहोत.

आनंदमय कोष हा तुम्हाला परमानंदाची अनुभूती देणारा थर असून, तो सर्वांत सूक्ष्म आणि पाच कोषांतील सर्वांत आतल्या बाजूला असलेला कोष आहे. तो आत्म्याच्या आनंदाची अनुभूती दर्शवतो. तो आनंदाची केवळ संवेदनाच देत नाही, तर अनुभवही देतो. संवेदना बाहेरून आतील बाजूस असतात, तर अनुभूती आतून बाहेरील बाजूस जाणवणारी गोष्ट आहे. समाधीतील शून्यावस्थेचे वर्णन तुम्ही कधीही करू शकत नाही, ती केवळ अनुभवता येते. आनंदमय कोषाला शांततेचा कोष असेही म्हटले जाते. तुम्ही आयुष्यात स्वतःला ज्या प्रकारे सादर करता, ते हा कोष कोणत्या स्थितीत आहे यावर अवलंबून असते.

तो तुम्हाला मीपणा आणि विचारविरहित आध्यात्मिक अनुभूती मिळवून देतो. तो न संपणारा हर्ष, प्रेम, शांती आणि संपूर्ण आनंद यांपेक्षा अधिक काही असतो. तो स्वप्नरहित झोपेची समाधी अवस्था मिळवून देतो. तो तुम्हाला बाहेरची स्थिती कशाही पद्धतीने बदलली तरी, आहे त्या स्थितीत राहायला शिकवतो.

विज्ञानमय कोषाप्रमाणे तुम्हाला येथे परमानंदाची अवस्था अनुभवायला मिळत नाही, तर तुम्ही स्वतःच परमानंद बनून जाता! ही परिपूर्णतेची अवस्था असते, येथे तो क्षण आणि तुम्ही एकरूप झालेले असता. तुम्ही क्षणात, प्रत्येक क्षणात जगत असता. ही परमानंदाची अनुभूती क्षणभंगुर असते, मात्र मागील सर्व कोषांची शुद्धता साधल्यास ही अनुभूती अधिक काळासाठी मिळवता येऊ शकते. आनंदमय कोष तुम्ही जे काही करीत आहात, त्याच्याशी एकरूप झाल्यास, त्यात स्वतःला विसर्जित केल्यास व स्वतःला मिळणाऱ्या अनुभवापासून वेगळे करू शकल्यास मिळू शकते. हे एखादे लहान मूल स्वतःमध्ये गढून जाते, त्याचप्रमाणे असते. येथे तुम्हाला स्वतःशी एकरूप झाल्याचा आणि इतर सर्वांपासून वेगळे झाल्याचा अनुभव मिळतो.

आत्मन आणि पंचकोषाचा सिद्धांत

तुम्हाला परमानंदाच्या स्थितीतून आणखी पुढे जाऊन सर्वांत शुद्ध गाभ्यापर्यंत, म्हणजेच आत्म्यापर्यंत जाता येते. आपला आत्मा आपल्याला दैवी शक्तीशी जोडणारा धागा आहे. तो देहभान विसरायला लावणारी जाणीव असतो. आत्मन शुद्ध असतो आणि त्यावर कोणतेही बंधने नसतात. तो जन्म, मृत्यू, भूक, तहान, भ्रम आणि दुःख या संसाराच्या सहा ऊर्मींपासून मुक्त असतो. पंचकोषांचा हा सिद्धांत तैत्तिरीय उपनिषदातून घेतला आहे. त्यामध्ये पंचकोषांच्या एकत्र येण्यातून माणसाचे व्यक्तिमत्त्व कसे तयार होते, याचे संपूर्ण वर्णन केले गेले आहे. यातील प्रत्येक थर एकमेकाशी जोडला गेलेला आहे व त्यातील एकात जरी असमतोल निर्माण झाला, तर तो सर्वांमध्ये परावर्तित होतो. उदा. माझ्या क्लाएंटने मला पैसे वेळवर न दिल्याने माझ्या मनावर ताण आल्यास मनोमय कोषाचा समतोल बिघडतो. विज्ञानमय कोषामध्ये याचे चुकीचे कारण नोंदविले जाते व त्याचा ताण माझ्या प्राणमय कोषावर पडतो. यातून माझ्या शरीरातील ऊर्जांचे वहन नीटपणे होत नाही व त्याचा परिणाम अन्नमय कोषावर होतो. आता मी परमानंदापासून खूप दूर गेलेली असते. अन्नमय कोष हा ताण आजार किंवा तापाच्या स्वरूपात दाखवायला सुरुवात करतो. या ताणाचे प्रमाण किती आहे, त्यानुसार मला डोकेदुखीपासून हृदयविकारापर्यंतचा कोणताही त्रास होऊ शकतो. अशाप्रकारे मन आणि शरीर एकमेकाशी जोडले गेले आहे, हे सिद्ध होते आणि ध्यानधारणाही गरजेची असल्याचे सिद्ध होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com