esakal | योगा लाइफस्टाईल : पादहस्तासन
sakal

बोलून बातमी शोधा

Padhastasan

योगा लाइफस्टाईल : पादहस्तासन

sakal_logo
By
वसुंधरा तलवारे

हातापासून पायापर्यंतची आसनस्थिती म्हणूनही पादहस्तासनाला ओळखले जाते. संस्कृतमधील पाद आणि हस्त म्हणजे मराठीत अनुक्रमे पाय आणि हात. सूर्यनमस्काराच्या आसन साखळीतील तिसऱ्या आणि दहाव्या क्रमांकाची ही आसनस्थिती आहे. या आसनामुळे शरीरातील पचनाच्या अवयवांना योग्यप्रकारे मसाज होऊन त्याचे कार्य वाढतेच, त्याचबरोबर पोटऱ्या आणि गुडघ्याजवळील स्नायूंची लवचिकताही वाढते. या आसनामुळे ओटीपोटातील वात कमी होऊन रक्ताभिसरण प्रक्रियेत सुधारणा होते. या आसनापूर्वीच्या हस्तउत्थासनातून या आसन स्थितीत येताना ‘ओम सूर्या नमः’ या मंत्राचा उच्चार करावा.

आसन कसे करावे?

 • पाठीचा कणा ताठ करून उभे राहावे. पाय जवळ आणि हात शरीरालगत ठेवावेत (तुम्ही सूर्यनमस्काराशिवाय हे आसन स्वतंत्ररीत्या करत असाल तर.) किंवा हस्तउत्थासनाची स्थिती कायम ठेवावी.

 • शरीर सैल सोडावे.

 • शरीराचे वजन दोन्ही पायांवर समान ठेवावे.

 • शरीर पुढच्या बाजूला हळुवारपणे झुकवावे. श्वासोच्छ्वास सामान्य ठेवावा.

 • कमरेपासून पुढच्या बाजूला झुकताना पाठ ताठच ठेवावी. त्याला बाक येऊ देऊ नका.

 • शरीरावर कोणताही ताण देऊ नका.

 • दोन्ही हाताची बोटे पावलांच्या शेजारी किंवा पावलांवर ठेवा.

 • मानेच्या मागची बाजू सैल सोडा.

 • पाय आणि गुडघे सरळ रेषेत आणि ताठ ठेवावेत.

 • शांतपणे श्वसन सुरू ठेवावे. (स्वतंत्ररीत्या आसन करत असाल तर.)

 • स्वाधिष्ठान चक्रावर (ओटी-पोटाजवळ) लक्ष केंद्रित करावे.

आसनाचे फायदे

 • पचनशक्तीच्या अवयवांना मसाज होतो.

 • पोटातील वाताबरोबरच बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या कमी होते.

 • पाठीचा कणा बळकट होतो.

 • शरीरातील चैतन्य वाढते.

 • चयापचय क्रिया सुधारते.

 • एकाग्रतेमध्ये वाढ होते.

 • नाक आणि घशाचे आजार कमी होण्यासाठी उपयुक्त

कोणी करू नये?

 • पाठीची गंभीर समस्या, कटिप्रदेश, हृदयविकार, उच्च रक्तदाब, ओटी-पोटाचा त्रास असलेले, हार्नियाने ग्रस्त नागरिकांनी हे आसन करू नये.

 • गर्भवती महिला (विशेषतः दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यातील)

आसनाचा सराव

आसन करताना कोणतीही गंभीर दुखापत होऊ नये, यासाठी योगासनांना सुरुवात करण्यापूर्वी दहा मिनिटे उपयोगाचा सराव करावा. त्यामुळे शरीरात ऊर्जाही निर्माण होते. बोटे, गुडघे, खांदा, कोपर, मान यांची हळुवार पद्धतीने हालचाल केल्याचा चांगला फायदा होतो.

loading image