
डॉ. मृदुल देशपांडे - MBBS, फंक्शनल मेडिसिन नूट्रिशनिस्ट
आज ‘व्हेज की नॉनव्हेज?’ हा प्रश्न केवळ आहाराचा न राहता विचारसरणी ठरवणारा सामाजिक मुद्दा झाला आहे. नॉनव्हेज खाणे म्हणजे क्रूरता किंवा शरीरासाठी घातक - ही समजूत अजूनही समाजात खोलवर आहे; पण फंक्शनल मेडिसिन, जी रोगाच्या मुळाशी जाण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन घेते, तिच्या मते मांसाहार हा काही दोष नाही.
या शास्त्रात आपण प्रत्येक व्यक्तीची जैविक भिन्नता (bio-individuality) लक्षात घेतो. कोणताही आहार ‘सार्वत्रिकपणे योग्य की अयोग्य’ असा नसतो. तो कसा तयार होतो, पचतो आणि शरीरात कसा वापरला जातो यावर त्याचे फायदे अवलंबून असतात. चिकन, मटण पोषणदृष्ट्या उपयुक्त आहेत; पण जर त्याच्यासोबत अति धान्यसेवन (२-३ पोळ्या, भात) असेल, तर ते अन्न वजन वाढवणारच.