जाणून घ्या स्किझोफ्रेनिया या मानसिक विकाराविषयी

...म्हणून साजरा केला जातो स्किझोफ्रेनिया जनजागृती दिवस
जाणून घ्या स्किझोफ्रेनिया या मानसिक विकाराविषयी
Updated on

मानसिक आजाराकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही उदासीनतेचा आणि तो दडवून ठेवण्याचाच आहे. आजारी व्यक्तीला उपेक्षा आणि अवहेलनेला तोंड द्यावे लागते. समाजाचा दृष्टीकोन जितक्या लवकर बदलेल आणि उपचारासाठी रूग्ण पुढे येतील, तो सुदिन असेल. आज (२४ मे) ‘जागतिक स्किझोफ्रेनिया जनजागृती दिन’ आहे. त्यानिमित्ताने या समस्येचा वेध डॉ. अनिल वर्तक यांनी घेतला आहे. (what is schizophrenia know the this mental disorder)

पॅरिसमधील ब्रिस्त्र मनोरुग्णालयाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉ. फिलीप पिनेल यांनी २४ मे १७९३ या दिवशी मनोरुग्णांची साखळदंडातून मुक्तता केली. अठराव्या शतकात रूग्ण हिंसक होऊ शकतात, या भीतीपोटी त्यांना भिंतीला साखळदंडाने बांधून ठेवणे ही गोष्ट विशेष नव्हती. पिनेल यांनी त्यांच्या वरिष्ठांचा पाठिंबा नसतानाही रुग्णांची साखळदंडातून मुक्तता करण्याचे धाडस दाखवले. यातील काही रुग्णांची चाळीस वर्षात प्रथमच साखळदंडातून मुक्तता झाली होती. त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून २४ मे हा दिवस जागतिक स्किझोफ्रेनिया जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो.

जाणून घ्या स्किझोफ्रेनिया या मानसिक विकाराविषयी
'अभ्यास करुन डोकं खराब झालंय'; चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल

मनोरुग्णांची साखळदंडातून मुक्तता एवढ्यापुरतेच पिनेल यांचे कार्य मर्यादित नाही, तर मनोरुग्णांसाठी मानवतावादी उपचार पद्धतीचा त्यांनी पायाच घातला. रुग्णाला स्वच्छ हवा व प्रकाश असलेले आणि प्रोत्साहन देणारे वातावरण मिळाले पाहिजे, उपचार करणाऱ्यांनी रुग्णांशी आपुलकीने वागायला पाहिजे. रुग्णाच्या जीवनात काही हेतू निर्माण होईल, अशा प्रकारचा कार्यक्रम त्याला दिला पाहिजे, हे नवविचार डॉ. पिनेल यांनी सातत्याने मांडले आणि प्रत्यक्षात आणले.

वरदायी आधुनिक औषधशास्त्र

पिनेल यांच्यानंतर वैद्यकशास्त्राच्या मानसिक आजाराविषयीच्या आकलनात आमूलाग्र बदल झाला आहे. विशेषतः गेल्या पन्नास वर्षांमध्ये मेंदू, त्याचे निरनिराळे भाग आणि प्रत्येक भागाचे कार्य यांची ओळख आपणास झालेली आहे. त्याचबरोबर मेंदूतील रासायनिक बदल मानसिक आजाराला कारणीभूत असतात आणि असे बदल औषधोपचाराच्या साहाय्याने नियंत्रित करता येतात, याचेही ज्ञान झाले आहे. वैद्यकशास्त्राच्या मानसिक आजाराच्या आकलनामध्ये आणि उपचार पद्धतीमध्ये कितीही बदल झाले तरी शेवटी मनोरुग्ण आणि त्याचे कुटुंबीय समाजाच्या विस्तृत कॅनव्हासवर जीवन व्यतीत करीत असतात. त्यामुळे या समाजाच्या मानसिक आजारांविषयीच्या धारणा, त्यांचे आकलन आणि त्यांचा स्वीकार हे रुग्ण व कुटुंबीय यांचे जीवन किती सुखी होईल, हे ठरवणारे निर्णायक घटक ठरतात.

घातक गैरसमज, अंधश्रद्धा

समाजामधील विविध घटकांमध्ये मानसिक आजारांविषयी आजही अत्यंत अपुरी माहिती आहे. परंतु त्याचबरोबर या आजारांविषयी गैरसमज आणि अंधश्रद्धा देखील खोलवर रुजलेल्या आहेत. त्या शिवाय मानसिक आजारांबाबत समाजाच्या मनात असलेली कलंकाची भावना ही देखील जायला हवी. कलंकांची भावना ही वरवर दिसून येत नाही आणि त्यामुळे तो खूप मोठा अडथळा आहे, असे वाटत नाही. परंतु समाजामध्ये अत्यंत खोलवर रुजलेल्या या भावनेमुळे मानसिक आजारांकडे दुर्लक्ष होते. आम्ही निरनिराळ्या महाविद्यालयातील पंधराशे विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली असता विद्यार्थी मानसिक आजारी व्यक्तींसाठी १७० निरनिराळे शब्द अर्थात लेबल्स वापरतात, असे आढळून आले. या शब्दांमधील बहुतांशी शब्द मानसिक आजारी व्यक्तींना कमी लेखणारे आणि त्यांचा उपहास करणारे असे आहेत. तरीही हे शब्द हिमनगाच्या टोकावरील फक्त दहा टक्के एवढेच आहेत. या शब्दांबरोबरच मानसिक आजारांविषयी चुकीचे दृष्टिकोन आणि भेदभावाची वागणूक समाजामध्ये खोलवर रुजलेली आहे.

हवे आक्रमक प्रबोधन

मानसिक आजारांविषयी प्रबोधन आणि कलंक निर्मूलन या महत्वाच्या विषयावर केवळ अधून-मधून बोलून चालणार नाही. तर हा विषय शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि आक्रमकपणे सर्व स्तरांवर म्हणजे रुग्ण, कुटुंबीय, सर्वसामान्य व्यक्ती, राजकारणातील व्यक्ती, प्रसारमाध्यमे आणि धोरणकर्ते यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी पुस्तिका, लेख आणि अन्य पारंपरिक प्रबोधनपर साधनांबरोबरच डिजिटल आणि ऑनलाइन साधने, प्रदर्शन आणि रुग्णांचा प्रत्यक्ष सहभाग अशा नावीन्यपूर्ण साधनांचा देखील वापर व्हायला हवा. शाळा, कॉलेजेस, ज्येष्ठ नागरिकांचे गट, महिला गट यांच्या नैमित्तिक कार्यक्रमांमध्ये मानसिक आरोग्यासाठी असे कार्यक्रम हा त्यांच्या व्यवस्थेचा भागच असावयास हवा. थोडक्यात जनजागृतीची आणि कलंक निर्मुलनाची चळवळ नियोजनपूर्वक बांधावी लागेल आणि सातत्याने चालवावी लागेल.

एका सर्वेक्षणानुसार, माहितीच्या या वाढत्या प्रसाराच्या काळात देखील कलंकाची भावना विशेषत: मोठ्या शहरांमध्ये आणि श्रीमंत वर्गांमध्ये टिकून आहे. थोडक्यात वाढत्या माहिती बरोबर कलंक आपोआपच कमी होईल, अशी अपेक्षा फोल ठरत आहे. शास्त्राच्या पातळीवर होणारे बदल, नवनवीन औषधे व उपचार आणि आर्थिक तरतूद एवढ्यावरच मानसिक आजाराचे प्रश्न सोडवता येणार नाहीत. सामाजिक धारणा, समाजाचे आकलन आणि समाजाने या आजारांचा केलेला स्वीकार यामध्येदेखील आमूलाग्र बदल व्हायला हवा. प्रस्थापित व्यवस्थेचा विरोध असताना देखील मानवतावादी नवविचार आग्रहाने मांडणाऱ्या फिलिप पिनेल यांच्या धाडसाची आणि कृतिशीलतेची आज समाजाला खरी गरज आहे.

(लेखक ‘एकलव्य ग्रुप’चे संस्थापक आणि मानसिक आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्ते आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com