esakal | डबल-बर्डन सिंड्रोम म्हणजे काय? महिलांमध्ये वाढतोय ‘एमएसडी’चा धोका
sakal

बोलून बातमी शोधा

डबल-बर्डन सिंड्रोम म्हणजे काय? महिलांमध्ये वाढतोय ‘एमएसडी’चा धोका

स्त्रियांमधील एमएसडीचा धोकादेखील वाढला आहे.

डबल-बर्डन सिंड्रोम म्हणजे काय? महिलांमध्ये वाढतोय ‘एमएसडी’चा धोका

sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोना विषाणूमुळे सध्या संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. सततची टाळेबंदी, वर्क फ्रॉम होम, मानसिक ताण या सगळ्याचा परिणाम न कळतपणे नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. यामध्येच महिलांच्या आरोग्यावर जास्त परिणाम होत असल्याचं समोर येत आहे. ऑफिसच्या कामासोबतच घरातील काम या सगळ्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होत आहे. त्यामुळे महिलांना सध्या ‘डबल-बर्डन सिंड्रोम’ला सामोरे जावे लागत आहे. इतकंच नाही तर त्यांच्यात एमएसडीचा धोकादेखील वाढला आहे. म्हणूनच एमएसडी आणि डबल बर्डन सिंड्रोम म्हणजे काय ते जाणून घेऊयात.

५२ टक्के नोकरी करणाऱ्या महिलांमध्ये शारीरिक व्याधी निर्माण झाल्यात आहेत. ज्यामुळे त्यांच्या एमएसडी विकसित होतांना दिसत आहे. ही आकडेवारी पुरुष कर्मचाऱ्यांच्या तुलनेत जास्त असल्याचं दिसून येत आहे. पुरुषांमध्ये ४१ टक्के जणांना या स्वरुपाचे दुखणे असल्याचे आढळून आले. ‘गोदरेज इंटिरिओ’, ‘वर्कस्पेस’ आणि ‘अर्गोनॉमिक रिसर्च सेल’ यांनी नुकत्याच आयोजित केलेल्या एका सर्वेक्षणाचा हा निष्कर्ष आहेत. 

पुरुष व महिला या दोघांमध्ये शारीरिक दुर्बलता निर्माण होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे ‘मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर’ (एमएसडी). अर्थात, स्त्रियांमध्ये हे दुखणे जास्त असण्याची 3 महत्त्वाची कारणे आहेत –

१. लॉकडाउनच्या काळात स्त्रियांवर घरकामाचा मोठा ताण आला आहे.

२. महिलांची शरीररचना व शारीरिक ठेवण(मस्क्युलोस्केलेटन) यांमुळे त्या ‘एमएसडी’साठी नैसर्गिकरित्या अधिक प्रवण असतात.

३. स्त्रियांच्या कामाचा ‘सेटअप’ हा अनेकदा औपचारिक स्वरुपाचा नसतो. त्या एकतर स्वयंपाकघरातील टेबलापाशी बसलेल्या असतात किंवा पलंगावर झोपतात. त्यामुळे  त्यांची शारीरिक ढब बिघडते व त्यातून त्यांना ‘एमएसडी’सारख्या विकारांना सामोरे जावे लागते. 

कार्यालयीन काम घरातून करणाऱ्या महिलांपैकी५९ टक्के जणींना दिवसअखेरीस वेदनांचा त्रास होतो, असे ‘गोदरेज इंटिरिओ’च्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. यामध्ये डोकेदुखी आणि डोळ्यांचा ताण ही समस्या जास्त प्रमाणात आहे. मान व पाठीचा वरचा भाग यांच्या दुखण्याची तक्रारही जास्त आहे. सर्वसाधारणपणे, २१ ते ३० वयोगटातील महिलांच्या तुलनेत, ३१ ते ४० वर्षे वयोगटातील महिलांना अशा प्रकारच्या समस्यांचा सामना अधिक प्रमाणात करावा लागतो, असे या सर्वेक्षणात दिसून आले आहे.

उपाय -

पुरुषांनी त्यांना शक्य होईल त्याप्रमाणे स्त्रियांना घरकामात मदत करावी. स्त्रियांनीदेखील काम करण्याची घाई न करता. हळूहळू करत एक एक काम उरकावं ज्यामुळे कामाचा लोड येणार नाही. आपल्या कामांचे नियोजन करताना, एका दिवसात अनेक कामे करणे टाळायला हवे. घरातील कामे ही शारीरिक कष्टाची असतात. ती खूप जास्त प्रमाणात केल्यास अतिरिक्त थकवा, छातीत जळजळ असे त्रास होऊ शकतात. कामांचे नीट नियोजन करून ती पुरेसा वेळ देऊन आठवड्याभराच्या काळात केल्यास शारीरिक दुखणी दूर ठेवता येतील. 

संयम बाळगत स्वत:ला स्थिर ठेवणे हादेखील एक उत्तम प्रतिबंधक उपाय आहे. घरातील कामे करीत असताना आपल्या शरीराचे म्हणणे ऐकायला हवे. जास्त वेगाने काम केल्यास स्नायू ओढला जाणे किंवा पाठीत चमक भरणे असे प्रकार होऊ शकतात.  घरगुती कामे महत्वाचीच असतात. ती करायलाच हवीत. या कामांचे ओझे इतरांबरोबर वाटून घेतले आणि ही कामे करताना काळजी घेतली, तर गंभीर दुखणी, दीर्घकालीन अपाय यांपासून मुक्त राहता येते. 

आपल्या महिला कर्मचाऱ्यांचे हित जपण्यासाठी कंपन्या व संस्थांनी नाविन्यपूर्ण पद्धतींचा स्वीकार करायला हवा. त्यांना ‘अर्गोनॉमिक्स’चे प्रशिक्षण द्यायला हवे, तसेच घरातून काम करतानादेखील योग्य पद्धतीने बसूनच काम करावे, अशा सूचना त्यांना द्यायला हव्यात. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारण्याबाबत, तसेच एकंदरीत आरोग्य व हित जपण्यास मदत होईल, अशा ऊर्जा टिकवण्याच्या तंत्रांबाबत, महिलांना शिक्षित करणे खूप आवश्यक आहे.

(लेखक समीर जोशी हे गोदरेज इंटिरिओचे मार्केटिंग (बी-2-बी) असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट आहेत.)
 

loading image
go to top