जागतिक कोड दिन विशेष : समज-गैरसमज आणि उपचार

vitiligo
vitiligoesakal

नाशिक : कोड आजार व कोड असलेल्या लोकांबाबत समाजात जागृतीऐवजी समज-गैरसमजच अधिक आहेत. याबाबत जनजागृतीसाठी २५ जून हा दिवस जागतिक कोड दिन म्हणून साजरा होतो. त्वचेतील रंगकण नष्ट झाल्याने जे पांढरे डाग दिसतात, त्यांना ‘कोड’ किंवा ‘पांढरे डाग’ असे म्हणतात. हा संसर्गजन्य रोग नाही. कोडाचे डाग आकाराने वेगवेगळे असतात. मात्र स्थान निश्चित नसते. कोणत्याही रंगाच्या व वयाच्या व्यक्तींना कोड होऊ शकते. त्वचेतील रंग कमी होतो व शरीरावर कुठेही पांढरे किंवा पांढरटसर चट्टे उमटतात. (world-vitiligo-day-myths-and-facts-marathi-news)

आपण भारतीय सावळ्या रंग गटात येत असल्याने त्वचेवरील कोणताही पांढरा चट्टा उठून दिसतो. कोडाच्या पांढऱ्या डागांची सुरवात हातापायांची बोटे, कोपर, गुडघे, ओठ व तळवे यापासून होते. या डागांना वेदना, खाज, दाह नसतो. मात्र प्रखर सूर्यप्रकाशात दाह जाणवतो. कोडासंबंधी निश्चित अंदाज वर्तविता येत नाहीत. कोडाचे डाग आकाराने वाढतात, तसेच राहतात. वा जेथे कोड येते त्या भागांतील केसही पांढरे होतात.

vitiligo
आमदारांच्या कन्येची आर्थिक फसवणूक; नाशिकमधील प्रकार

प्रत्येक पांढरा डाग म्हणजे कोड?

शरीरावर विविध कारणांमुळे पांढरे डाग येतात. त्यामुळे प्रत्येक वेळी ते कोड असेलच असे नाही. काहीवेळा कुष्ठरोग, भाजल्याच्या जखमेनंतरही त्वचेवर पांढरे डाग पडतात. ल्यूकोडर्मामध्ये कोड, पिटिरीयासीस वर्सिकलर, पिटिरीयासीस अल्बा, कुष्ठरोग, निवस डीपिगमेनटोसस, मायकोसिस फंगोईड आणि इतर अनेक आजारांचा समावेश होतो. विविध रसायनांमुळे जसे हेअर डायमधील पीपीडी डायमुळे रंगपेशींना इजा पोचून चट्टे उमटू शकतात, रबराच्या चपलांमुळे पायावर चट्टे उमटू शकतात. खोट्या दागिन्यांनीही चट्टे उमटू शकतात. कपाळावर बिंदी लावतो, त्या जागी बिंदी मागच्या डिंकामुळेही चट्टा उमटतो. याला ‘केमिकल विटिलिगो’ असे म्हणतात.

कोडाची निश्चित कारणे

संशोधकांच्या मते या विकाराला काही प्रमाणात अनुवंशिकता कारणीभूत असते. या विकारात सतराव्या गुणसूत्रावरील ‘१७ पी १३’ जनुकामधील बिघाडामुळे व परस्परसंबंधित गुंतागुंतीच्या साखळी प्रक्रियेमुळे त्वचेतील मेलॅनिन तयार करणाऱ्या पेशी (मेलॅनोसाइट) नष्ट होतात. मेलॅनिनाच्या निर्मितीनुसार त्वचेचा आणि केसांचा रंग ठरतो. अवटू ग्रंथीमधील तसेच प्रतिरक्षा यंत्रणेमधील बिघाडामुळे कोड होते. अन्य कारणांत अभ्यासकांच्या मते शरीरातील प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या पेशी आपल्याच शरीरातील रंगपेशी विरुद्ध काम करून त्यांना मारून टाकतात. ही प्रक्रिया का व कधी सुरू होते, याचा शोध अजून लागलेला नाही. जनुकांच्या प्रभावाखाली प्रतिकारशक्तीच्या पेशींवर परिणाम होऊन त्या आपल्याच शरीरातील रंगपेशींना नष्ट करतात. नसांमधून विशिष्ट एका रासायनिक पदार्थामुळे रंगपेशींना इजा पोचते.

vitiligo
मालेगावात साथीच्या आजाराचे थैमान

कोडवरील उपचार

मानसिक ताणामुळे या विकाराला सुरवात होते. अन्य विकारांपेक्षा कोडचा मानसिक ताण जास्त असतो. शरीराच्या दर्शनी भागावर कोडाचे डाग दिसल्यास नैराश्‍यातून न्यूनगंड येतो. कोडावर अजून निश्चित इलाज नाही. औषधोपचारानंतर हे डाग नाहीसे होतात. कोड झालेल्या जागी सोरॅलीन औषध लावून सूर्यप्रकाशात उभे राहिल्यास वा कृत्रिमरीत्या अतिनिल प्रकाश पाडल्यास त्वचेचा रोग काही प्रमाणात वा पूर्णपणे पूर्ववत होतो. उपचारामुळे कोड झालेल्या जागी मेलॅनोसाइट पेशींची पुन्हा निर्मिती होते. रुग्ण कोडाचे डाग झाकण्यासाठी त्वचारोपण करतात.

सामाजिक : समज-गैरसमज

या आजाराला आधी ‘श्वेतकुष्ठ’ असे म्हणत. पूर्वी कुष्ठरोग समजत. या आजाराचा कुष्ठरोगाशी काहीही संबंध नाही. हा आजार जास्त घाबरवतो. कारण त्याच्याविषयी सामाजिक गैरसमज जास्त आहेत. त्याचबरोबरच किती वर्षे उपचार घ्यायचे, याचीही चिंता असते. मुलाला किंवा मुलीला जर लग्न ठरल्यानंतर कोड झाले आहे, असे कळले तर ते लग्न मोडते, यासाठी कोणत्याही नात्यात पारदर्शकता असावी. मासे खाल्ल्यानंतर त्यावर दूध प्यायल्याने, आंबट किंवा पांढरे पदार्थ खाल्ल्याने किंवा कोणताही पदार्थ खाल्ल्याने कोड होत नाही. हा आजार संसर्गजन्य नाही. संपर्काने, एकत्र राहिल्याने, जेवल्याने तो पसरत नाही. कोड हा अ‍ॅटोइम्युन आजार आहे.

लॅब टेस्टने कोड ओळखता येते का?

यात रंगपेशी नष्ट झाल्याने त्वचेचा रंग पांढरा होतो. त्यामुळे लॅब टेस्टने धोका ओळखणे शक्य नाही. क्लिनिकल एक्झामिशनने कोड ओळखले जाते. कोडवर घरगुती उपाय करण्यापेक्षा वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सर्जिकल आणि नव्या औषधोपचारांच्या मदतीने या आजारावर परिणाम दिसू शकतो. एखाद्या व्यक्तीला कोड असल्यास त्याच्या जवळच्या नात्यात कोड पसरण्याची शक्यता पाच टक्के असते. पालकांकडून मुलांना कोड पसरण्याची शक्यता १५ टक्के असते. कोड कोणत्याही वयात होऊ शकतो. मात्र कोडच्या निम्म्या रुग्णांमध्ये तो वयाच्या २० व्या वर्षांपूर्वी होतो. तर ९५ टक्के लोकांमध्ये हा आजार वयाच्या चाळिशीपूर्वी विकसित व्हायला सुरवात होते. - डॉ. अनिल भोकरे, मालेगाव, खजिनदार, महाराष्ट्र राज्य त्वचारोग असोसिएशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com