कोव्हिशिल्डचा तुटवडा; उसनवारीची वेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

covishield

कोव्हिशिल्डचा तुटवडा; उसनवारीची वेळ

अकोला - जिल्ह्यात कोरोनाचे बूस्टर (प्रिकॉशन) डोस घेणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच कोव्हिशिल्ड लसींचा तुटवडा सुद्धा जाणवत आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेत खंड पडू नये यासाठी जवळच्या हिंगोली व बुलढाणा जिल्ह्यांकडून लसीचे डोस उसणवारीवर घेण्याची नामुष्की आरोग्य विभागावर ओढावली आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने २० जुलै रोजी हिंगोली येथून कोव्हिशिल्डचे ७ हजार ८०० तर १९ जुलै रोजी बुलढाणा येथून ३ हजार डोस घेतले. दरम्यान लसींच्या या तुटवड्यामुळे मोहिमेवर सुद्धा विपरीत परिणाम होत आहेत.

देशभरात १६ जानेवारी २०२१ रोजी कोविड-१९ विरोधात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १ मार्च २०२१ पासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्यात आले.

१ एप्रिल २०२१ पासून ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांसह दुर्धर आजारग्रस्त व १ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम खुली करण्यात आली. त्यामुळे या वयोगटासाठी मोहीम सुरू झाल्यानंतर अधिक प्रमाणात नागरिक कोरोनाची लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर पोहचले. परंतु त्यानंतर सुद्धा जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांनी कोरोनाची लस न घेतल्याने आरोग्य विभागामार्फत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण अधिक गतीने करण्याचे अभियान हाती घेतले. त्यानुसार १४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत जिल्ह्यात कवच कुंडल अभियान राबवण्यात आले. त्यानंतर ‘हर घर दस्तक’ मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे लसीकरणाची व्याप्ती वाढली. अधिकाधिक नागरिकांनी लस घ्यावी यासाठी १५ वर्षावरील युवकांना सुद्धा कोरोनाची लस देण्यात येत आहे. त्यामुळे लस घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दरम्यान गत काही दिवसांपासून आरोग्य विभागामार्फत लसीकरणाकडे विशेष लक्ष देण्यात येत असतानाच कोव्हिशिल्ड लसींचा तुटवडा जाणवत आहे.

इतर लसींचा जेमतेम साठा उपलब्ध

जिल्ह्यात सध्या कोव्हिशिल्ड लसींचा तुटवडा असला तरी कोव्हॅक्सीन व कोर्बेव्हॅक्सच्या लसी उपलब्ध आहेत. त्यामुळे लसीकरण अभियान सुरु आहे. परंतु कोव्‍हिशिल्ड लसींची संख्या कमी असल्याने आरोग्य विभागासमोर मोहिमेची गती वाढवण्यासंदर्भात अडचणी येत आहेत.

जिल्ह्यात कोव्हिशिल्ड लसींच्या डोसचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे हिंगोली व बुलढाणा येथून लसी घ्याव्या लागल्या. लसींच्या मुबलक साठ्‍याची मागणी वरिष्ठ स्तरावर करण्यात आली आहे.

- डॉ. मनीष शर्मा, जिल्हा लसीकरण अधिकारी, अकोला

Web Title: Akola Corona Covishield Vaccination Shortage Booster Dose Precaution

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..