Health Tips : आजीबाईचा बटवा वापरा; पण जरा जपून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ayurvedic Health Tips

Health Tips : आजीबाईचा बटवा वापरा; पण जरा जपून

नागपूर : आयुर्वेदशास्त्र आरोग्याची गुरुकिल्ली आहे. ‘आजीबाईचा बटवा'' अशी या शास्त्राची ओळख आहे. लहान मुलांच्या सर्दी-खोकल्यापासून तर रक्ताळलेल्या जखमेवर नेमका पालापाचोळा लावून रक्त थांबवण्याची ताकद या बटव्यात आहे. अलीकडे सोशल मीडियावर आजीबाईच्या बटव्यातील भीमसेनी कापरापासून तर बांगला पान व इतर जडीबुटीच्या वापरातून आजार बरे होत असल्याच्या पोस्ट सर्रास फारवर्ड होत आहेत.

यामुळे आजार नियंत्रणा येण्याऐवजी जीवावर बेतण्याचे प्रसंग येऊ शकतात, असा निष्कर्ष निमा संघटनेतर्फे केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आला. विशेष म्हणजे जिथे डॉक्टर पोचले नाही, तेथे आजीबाईचा बटवा पोहोचला आहे; परंतु याचा वापर करताना दक्षता घ्यावी, असा सूर सहभागी आयुर्वेदतज्ज्ञांनी व्यक्त केला.

निमा संघटनेअंतर्गत आयुर्वेद डॉक्टरांनी केलेल्या सर्वेक्षणात नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, एक व्हिडिओ व्हॉट्स ॲपवर फिरत आहे. यात नागरिकांनी सलग १५ दिवस ४ ते ५ बांगला पान खाल्ल्यास वातविकारांना दूर ठेवता येते, असा दावा केला आहे. मात्र, प्रत्यक्षात बांगला पान उष्ण असते. त्यामुळे संबंधित व्यक्तीच्या तोंडाला फोडं येऊ शकतात. नवीन शारीरिक व्याधी निर्माण होऊ शकते. अशाप्रकारचा प्रयोग केलेला रुग्ण दुसरीच व्याधी घेऊन निमाचे राज्य संघटक डॉ. मोहन येंडे यांच्याकडे आला. यानंतर आयुर्वेदतज्ज्ञांनी सर्वेक्षण करून निरीक्षण नोंदवले.

भ्रम पसरविणारे सोशल मीडियावरील संदेश

केळात कापूर टाकून सेवन केल्यास मूळव्याधी बरी होते. तो कापूर भीमसेनी असावा असे व्हिडियोत सांगितले आहे. मात्र कापूर उष्ण असते. ते जास्त खाल्ल्यास फुप्फुस, यकृतावर परिणाम होऊ शकतो. एका लसूण जास्त खाल्ल्यास हृदयाचे ब्लॉकेज कमी होत असल्याचे सांगण्यात येते. परंतु लसूणही उष्ण आहे. अतिसेवनामुळे मूळव्याध होण्याचा धोका आहे. त्यामुळे आजाबाईच्या बटव्यातील आयुर्वेदिक औषधांचा वापर करताना आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ला घेण्याची गरज असल्याचे डॉ. येंडे म्हणाले.

ऋतुबदलानुसार असावा आहार विहार

वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर या ऋतूंमध्ये होणाऱ्या बदलानुसार आपला आहार विहार असावा, याचे वर्णन आयुर्वेदात आहे. अनेक आजार वातावरणातील धूलिकण, विषाणू, जिवाणूमुळे होतात. यांचा प्रभाव निष्क्रिय करणारे व रक्षण करणाऱ्या वनौषधी आयुर्वेदात आहे.

आजीबाईच्या बटव्यात

-वेखंड, काळी मिरी, लेंडी पिंपळी, मुरूडशेंग, बेहडा, हिरडा,आवळा, डिकेमाली अशी पोट स्वच्छ ठेवणाऱ्या घरघुती वस्तू.

-घराभोवती सर्पगंधा, कोरफड, अडुळसा, तुळस, मखमल (झेंडू), गवती चहा, बासमती, दमावेल, ऑल व्हिटॅमिन, शतावरी या वनऔषधी.

आयुर्वेदात विरुद्ध गुणधर्म असलेल्या वस्तू एकत्र करून खायला सांगितले जात नाही. संबंधित व्यक्तीची प्रकृती, त्याचा त्रास, शरीराची क्षमता बघून औषधांचे प्रमाण निश्चित केले जाते. एखाद्याला मधुमेह असल्यास गोड घटक वगळून काढा दिला जातो. सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ बघून किंवा माहिती वाचून आयुर्वेद असल्याचे सांगत उपाय केल्याने जिवावर बेतणारे प्रसंग येऊ शकतात किंवा नवीन आजार होण्याचा धोका आहे.

-डॉ. मोहन येंडे, आयुर्वेदतज्ज्ञ तसेच राज्य संघटक-निमा

Web Title: Ayurveda Specialist Health Tips Ayurvedic Medicine

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..