माझी मुलगी तीन महिन्यांची आहे. मी आयुर्वेदीय गर्भसंस्कारमध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी करते. पण बाळाची टाळू किती दिवस भरावी आणि बाळाला पाणी द्यावे की नाही, याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे.
- सौ. अमृता, मुंबई
उत्तर - लहान मुलांची टाळू नियमितपणे संतुलन बेबी मसाज तेलासारख्या तेलाने किमान एक वर्ष नक्की भरावी. यामुळे बाळाच्या मज्जाधातूचे पोषण होते तसेच त्यांना शांत झोप यायला मदत मिळते, बाळ बाळसेही व्यवस्थित धरते. बाळाला पाणी द्यायला काहीही हरकत नाही, फक्त ऋतुमानाप्रमाणे व तापमानाप्रमाणे पाण्याचे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते. बाळाला द्यायचे पाणी २० मिनिटे उकळून गार केलेले असावे व ते वाटी-चमच्याने दिलेले चांगले. पाणी नेहमी झाकून ठेवावे. उकळून गार केलेले सुवर्णसंस्कारित जल बाळासाठी जास्त उत्तम. मुलांना पाणी देऊ नये असा सल्ला सध्या दिला जातो, तो योग्य नाही. यामुळे मुलांना अपचन, कोष्ठबद्धतेचा त्रास होतो व नंतर मुले पाणी वा इतर अन्न स्वीकारायला तयार होत नाहीत. त्यामुळे अधून मधून १-२ चमचे पाणी देण्याची सवय मुलांना सुरुवीपासून ठेवलेली जास्त उत्तम.