

The Science Behind Indian Festivals and Rituals
sakal
भारतीय संस्कृती ही संपूर्णपणे केवळ मनुष्यमात्राच्या कल्याणाचाच विचार करते. त्या निमित्ताने सण-वार, देव-धर्म, पूजा-अर्चा, यज्ञ-कर्म अशा अनेक गोष्टी परंपरेत आणून मनुष्यमात्राला समृद्धीबरोबर आरोग्य मिळेल याचाच विचार केलेला असतो. तसे पाहता खरे म्हणजे देवाला प्रेमाशिवाय काहीही नको असते. मनुष्याला पण हवे असते प्रेम. तेव्हा चंदनाची उटी, केशराची फुले, सुवर्णालंकार व मोदकमेवा हे सर्व देवाला आवश्यक नसते. प्रसाद देवाला दाखवला तरी शेवटी तो खाल्ला जातो प्रसाद दाखवणाऱ्याकडूनच. म्हणूनच सुदाम्याच्या मूठभर पोह्यांनी श्रीकृष्ण जेवढे प्रसन्न झाले तेवढे अन्नाचे ५६ भोग लावूनही झाले नसतील. देवाला अर्पण केलेल्या प्रसादात वातावरणातील श्रद्धेमुळे देवाचा आशीर्वाद ओढला जातो व गूळ-दाण्यांचे रूपांतर प्रसादात होते. शिरा कितीही चांगला झालेला असला व तो कितीही खाल्ला तरी समाधान होत नाही, पण तोच शिरा प्रसाद म्हणून ग्रहण केला की होणारे समाधान अनोखे असते. पूजेत विज्ञान आहेच, ते कळले नसले तरी पूजा केल्यावर व प्रसाद खाल्ल्यानंतर माणसाला मिळणारीआत्मतृप्ती व समाधान लॉटरीचे मोठे बक्षीस लागले तरी होत नाही. हाच प्रसादाचा फायदा.