Migraine: तरुणांमध्ये वाढतोय मायग्रेनचा त्रास,दुर्लक्ष न करता घ्या वैद्यकीय सल्ला

Migraine: अनियमित सवयींमुळे आणि चुकीच्या जीवनशैलीने मायग्रेन वाढल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
Migraine
MigraineSakal

सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे मायग्रेनचे रुग्ण हे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या जीवनशैलीचा परिणाम शरीरावर झाल्यामुळे रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ग्रामीण भागामध्ये रोजगार, शिक्षण, शेती, शहरात ये-जा इत्यादी गोष्टी पूर्ण होताना शरीराकडे मात्र दुर्लक्ष होत चालले आहे. त्यातच अनियमित सवयींमुळे आणि चुकीच्या जीवनशैलीने मायग्रेन वाढल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे यात तरुणाईचा अधिक समावेश आहे. मायग्रेन म्हणजे डोकेदुखी, असे समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत.

मायग्रेन आजारात कधी डोक्याच्या एका बाजूला किंवा दोन्ही बाजूंना दुखते. मायग्रेनचा झटका आल्यावर समोरचे न दिसणे, मळमळणे, उलटी येणे, आवाज, वास, स्पर्श न होणे, चेहऱ्याला झिणझिण्या आल्यासारखे वाटणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे वेळीच त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे सध्या वाढती स्पर्धा, परीक्षेचा ताण, खाद्यपदार्थ, स्मार्टफोन आणि टीव्ही जास्त वेळ बघणे अशा विविध कारणांमुळे मायग्रेनचे प्रमाण वाढले आहे.

मायग्रेन म्हणजे डोकेदुखी, असे अनेक जण समजतात; पण त्या पलीकडे जाणारा हा आजार आहे. सामान्य डोकेदुखी म्हणून याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात. बरेच जण डॉक्टरकडे न जाता मेडिकलमधून औषधे घेतात. पण मायग्रेनचा त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. त्यानंतरच त्यांनी सुचवलेली औषधे घेणे फायद्याचे असते.

जीवनशैलीत सातत्य, हा देखील उपाय

तरुणाईंनी जीवनशैलीत सातत्य ठेवल्यास मायग्रेनचा त्रास कमी होऊ शकतो. हा त्यावरचा हा उत्तम उपाय आहे. याशिवाय, वेळेवर जेवणे आणि पुरेशी झोप घेणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. मायग्रेनचा त्रास होत असल्यास डोक्यातील शिरांमधील रक्तप्रवाहास अडथळा होण्यास सुरवात होते. यामुळे डोकेदुखीचा त्रास वाढत जातो. काही वेळा डोक्यात येणाऱ्या कळा सुरवातीला कमी असतात; मात्र हळूहळू दुखण्याची तीव्रता वाढत जाते. डोकेदुखीबरोबर डोळ्यापुढे अंधारी येणे, प्रकाशवलय दिसणे या समस्याही उद्‍भवू शकतात. अनेकदा काही काळासाठी स्मृतीभ्रंशची समस्याही उद्‍भवते. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतात.

मायग्रेनची कारणे

डोक्याला अधिक ताण आला असेल किंवा मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यास मायग्रेन होतो. खाण्याच्या सवयी, वातावरणातील बदल, तणाव, निद्रानाश किंवा जास्त झोप आदी कारणांमुळेही त्रास होऊ शकतो.

मायग्रेनवर उपाय

ओव्हर-द-काऊंटर (ओटीसी) औषधोपचार

आपले डॉक्टर आपल्याला अशी काही औषधे लिहून देतील, ज्यामुळे त्रासदायक वेदनांपासून आराम मिळू शकेल. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जीवनसत्वे आणि मॅग्नेशिअमही घ्यावे लागेल.

तणावातून मुक्त राहा

ताण व चिंता नियंत्रणात राखणे काळाची गरज आहे. तणावमुक्त राहण्यासाठी योग आणि ध्यानासारख्या पर्यायांचा आधार घ्या. प्राणायमही फायदेशीर ठरू शकेल. मनाने औषधोपचार करू नका, वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Migraine
Happy Hormones: आनंदी हार्मोन्स वाढवण्यासाठी 'या' गोष्टी केल्यास सप्लिमेंटची भासणार नाही गरज

काळजी कशी घ्यावी?

मायग्रेनचा त्रास होऊ नये, म्हणून संतुलित आहार घ्यावा. आहारात ताजी फळे, भाज्या आणि सात्त्विक अन्नपदार्थ यांचा समावेश असणे गरजेचे आहे. गाजर, कलिंगड, बदाम, सुका मेवा आणि पिस्ताचा आहारात समावेश करावा.

शरीराला पुरेशी झोप महत्त्वाची आहे. त्यामुळे शरीर दुसऱ्या दिवसासाठी तयार होत असते. तणाव असेल, तर पुरेशी झोप येत नाही. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो.

दररोज किमान ४० मिनिटे व्यायाम करावा. चालण्यासारखे प्रकार शारीरिक व्यायामात करणे आवश्यक आहे. त्याकडे अधिक लक्ष द्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com