

Childhood Pneumonia Symptoms Prevention and Care
esakal
न्युमोनियापासून बचाव आवश्यक
सर्दी-खोकला, सोलवटलेला घसा आणि वाहणारे नाक हे बहुतेक वेळा आपले आपण बरे होतात; पण कधी कधी त्यातून न्युमोनिया होतो आणि त्यामुळे मुलाच्या जीवाला धोका निर्माण होतो. नुकताच ‘जागतिक न्युमोनिया दिवस’ झाला. त्यानिमित्त या न्युमोनियाची माहिती घेऊ.
सर्दी-खोकल्याचे रूपांतर गंभीर आजारात होत आहे आणि आता वैद्यकीय मदतीची गरज आहे, हे पालकांना योग्य वेळी कळले, तर मुलांना न्युमोनियापासून वाचविता येईल. मुलांचे वय, खोकल्याचा कालावधी, मुलाने अंगावर पिण्याचे थांबवले आहे का? ताप आला आहे का? असल्यास किती दिवस? यावरून गांभीर्याची कल्पना येईल. गंभीर आजाराची लक्षणे पाहताना ‘श्वासाचा वेग’ व ‘छातीचे स्नायू आत ओढले जाणे’, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
श्वासाचा वेग मोजताना मूल शांत असणे आवश्यक आहे. छातीच्या खालच्या भागाकडे लक्ष देऊन हा वेग मोजता येईल. दोन महिन्यांच्या आतील मुलांचा श्वासाचा वेग मिनिटाला साठपर्यंत, दोन महिने ते एक वर्ष वयातील मुलाचा श्वसनवेग मिनिटाला पन्नासपर्यंत, तर एक ते पाच वर्ष वयोगटातील मुलांचा श्वसनवेग मिनिटाला चाळीसपर्यंत असतो. या मर्यादेपेक्षा श्वसन वेग जास्त असेल, तर पुन्हा माेजून निश्चित वेग ठरवा. श्वास आत घेताना छातीच्या खालच्या भागातील फासळ्या व स्नायू आत ओढले जाणे, हे गंभीर आजारांचे लक्षण आहे. श्वास नीट चालत असेल, तर सर्दी -खाेकला, वाहते नाक वगैरे घरच्या घरी औषध न वापरता आपोआप बरे होतात.
पाच वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये विषाणू संसर्ग हे न्युमोनियाचे सर्वांत जास्त आढळणारे कारण आहे. यामध्ये रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस, इन्फ्लूएंझा व्हायरस, पॅराइन्फ्लूएंझा व्हायरस, ॲडेनोव्हायरस आणि राइनोव्हायरस यांचा समावेश होतो. जीवाणूंचा संसर्ग अचानक आणि तीव्र स्वरूपाचा असू शकतो. यात ‘स्ट्रेप्टोकोकस न्युमोनिया’ हा सर्वांत प्रमुख जीवाणू. याशिवाय मायकोप्लाझ्मा न्युमोनिया आणि हिमोफिलस इन्फ्लुएंझा प्रकार बी (HiB) ही महत्त्वाची कारणे आहेत.
अंगावर पिणाऱ्या मुलाला सर्दी-खोकला झाला, की पाजणे कठीण जाते; पण अंगावरचे दूध पिण्याने जंतुसंसर्गाचा सामना करण्याला आणि मुलाची वाढ सुरक्षित होण्याला मदत होते. म्हणून मुलाला अंगावर पाजण्याचे पुनःपुन्हा, चिकाटीने प्रयत्न केले पाहिजेत. मुलांना चुचकारून थोडे अन्न परत परत असे बरेचदा खायला द्यावे. मूल आजारातून बरे झाले, की त्याला निदान आठवडाभर तरी रोज नेहमीपेक्षा अधिक एक वेळा जेवण द्यावे. आजारी पडण्यापूर्वीचे वजन परत होईंपर्यंत मूल पूर्णपणे बरे झाले आहे, असे म्हणता येणार नाही.
नवजात अर्भके, लहान मुले शरीरातील उष्णता कायम राखू शकत नाहीत. म्हणून त्यांना उबदार कपड्यांत गुंडाळून ठेवले पाहिजे. मात्र, ते खूपच घट्ट व गरम होईल, असे नसावेत. ताप आलाच, तर तो कमी करण्यासाठी ‘पॅरसिटॅमाॅल’ द्यावे. मुलाचे नाक विशेषत: स्तनपानाच्या व झोपण्याच्या आधी पुसून साफ करावे. गरम पाण्याचा वाफारा घेतला, तर फायदा होतो. स्वयंपाकाच्या वा धूम्रपानाच्या वा इतर कुठल्याही धुराने भरलेल्या खोलीत मूल राहत वा झोपत असेल, तर त्याला न्युमाेनिया होण्याची शक्यता अधिक असते. तंबाखूच्या धुराने दूरगामी परिणाम होतात.
लहान मुलांना कमीत कमी पहिले सहा महिने केवळ स्तन्यपान करून आणि सर्व मुलांना पौष्टिक आहार देऊन, त्यांचे संपूर्ण लसीकरण करून सर्व कुटुंबे न्युमोनियाला दूर ठेवू शकतात. स्तन्यपानाने मुलांचे रोगांपासून संरक्षण होते. हिरव्या पालेभाज्या व पिवळी केशरी रंगाची फळे यातून मिळणाऱ्या ‘अ’ जीवनसत्त्वामुळे न्युमोनियापासून रक्षण होण्यास मदत होते. मूल वर्षाचे होण्यापूर्वी त्याचे लसीकरण पूर्ण झाले पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.