प्रश्न १ - माझ्या मुलाला अधून मधून सर्दी-खोकल्याचा आणि जंतांचा त्रास होत असतो. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे त्याला फार प्रमाणात सर्दी होते आहे. हळद व आले घालून दूध दिल्याने त्याचा त्रास कमी होईल असे काही जण म्हणत आहेत. ते कसे व किती प्रमाणात द्यावे याचा कृपया मार्गदर्शन करावे. जंतांसाठीही काही उपाय असला तर नक्की सांगावा.
- प्रिया कुलकर्णी, जयसिंगपूर
उत्तर - लहान मुलांमध्ये जंताचा त्रास वरचेवर दिसतो. तुमच्या मुलाचे वय पत्रावरून कळलेले नाही, पण १२ वर्षांखालील मुलांना अर्धा ते एक चमचा व त्यावरच्या मुलांना एक ते दीड चमचा विडंगारिष्ट कोमट पाण्यात मिसळून दिवसातून दोनदा जेवणानंतर द्यावे. एक महिना विडंगारिष्ट दिल्यानंतर दोन महिन्यांनंतर परत विडंगारिष्ट द्यावे.
असे नियमित केल्याने जंतांचा त्रास कमी व्हायला मदत मिळेल, तसेच पावसाळ्यात हळद व सुंठ (आले नाही) घालून संकारित केलेले दूध घेणे उत्तम. यासाठी एक कप दुधात अर्धा कप पाणी घालावे, त्यात छोटा सुंठीचा तुकडा (चेचून) व एक सपाट चमचा हळद घालावी. पाणी उडून जाईपर्यंत उकळावे व फडक्याने वा बारीक गाळणीने गाळून घ्यावे. नंतर यात संतुलन चैतन्य कल्प घालून मुलाला प्यायला द्यावे. असे दूध मोठ्यांनी घेतले तरी चालते.